सना नावाची ‘इंडिया टुडे’ची बातम्या देणारी मानवी अवतारातील एक यांत्रव आहे. सनासारखीच लिसा ही ‘ओडिशा टीव्ही’ वाहिनीची बातम्या सांगणारी यांत्रव आहे. ‘ए आय कौर’ ही ‘न्यूज १८ पंजाब / हरियाणा’ची आणखी एक यांत्रव असून, सौंदर्या ही कर्नाटक टीव्हीच्या कन्नड वाहिनीची सखी आहे. बातम्या देणाऱ्या अशा अनेक यांत्रव सौंदर्यवती भारतातील अनेक वाहिन्यांवर दिसू लागल्या आहेत. मानवी चेहरा असलेल्या या ललना कृत्रिम बुद्धिमत्ताआधारित तंत्रज्ञान वापरून ‘टेक्स्ट टु स्पीच’ तंत्राच्या साहाय्याने बातम्या देतात. वृत्तनिवेदनाच्या विश्वात ही क्रांती म्हणावी का? सौंदर्याला हा प्रश्न विचारण्यात आला असता ती म्हणाली, ‘‘कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वच क्षेत्रांत आपला ठसा उमटवत आहे. मग दूरचित्रवाणीचे क्षेत्र कसे मागे राहील?’’ पण बातम्या देण्याच्या क्षेत्रात खरेच क्रांती घडली आहे का? यावर मतभिन्नता असू शकते. एक खरे की कालांतराने हे घडून येणारच होते, असे या क्षेत्रातील काही तज्ज्ञांचे मत आहे. का? असा प्रश्न विचारता उत्तर आले, ‘‘याला कारणीभूत आहे जनरेटिव्ह एआय’’. २०२२ च्या नोव्हेंबर महिन्यात चॅटजीपीटी उदयाला आले आणि हा करिष्मा घडला. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित बातम्या प्रसारित करण्यास चालना मिळाली. याचा अर्थ असा तर नव्हे की मनुष्याने बातम्या देण्याचा काळ संपला? याची सुरुवात चीनने केली. त्यांच्या ‘शिनुआ’ या वृत्तसंस्थेने २०१८ सालीच झँग झॅओ नावाच्या यांत्रिक वृत्तनिवेदकाला दूरचित्रवाणीवर आणले होते. २०२२ साली चीनमध्ये झालेल्या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एक आभासी प्रस्तुतकर्ता फक्त हावभाव दाखवत विवेचन करताना दिसला होता. रशियाचा ‘स्नेहझाना तुमानोवा’ हा यांत्रव तसेच ‘फेधा’ हा कुवेतचा आभासी निवेदक २०२३ साली त्या त्या देशाच्या टीव्ही वाहिनीवर बातम्या देताना तसेच हवामान वृत्त देताना दिसला. हे सर्व पाहिल्यानंतर अनेकांना एका नव्या पर्वाची सुरुवात झाली असे नक्कीच वाटले असणार. यंत्रे इतक्या शिताफीने बातम्या कशा देत असतील याचे कुतूहल तर खासच वाटले असणार? मुळात एक यंत्र बातमी वाचते, त्याच वेळी त्याला अपेक्षित चित्रेही ते व्यवस्थित दाखवते हेच मुळी आश्चर्याचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विशाल भाषा प्रारूपाचा आधार घेऊन हा मेळ तसेच ही अचूकता साधली जाते.