मैदानावर धावणारा खेळाडू असो किंवा एका जागी बसून बुद्धीचा खेळ खेळणारा खेळाडू; दोघांच्याही यशामागे आहाराची मोठी भूमिका असते. खरं तर आपल्या सर्वांच्याच जीवनात आहार, व्यायाम, विश्रांती आणि झोप या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य आहार! शरीराला लागणारी ऊर्जा, स्नायूंची ताकद आणि मेंदूची एकाग्रता, हे सगळं अन्नातूनच मिळतं.

आणि त्यातही खेळाडूंच्या आहारात सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे कर्बोदकं (कार्बोहायड्रेट्स)! हे शरीराचं मुख्य इंधन आहे. शरीर कर्बोदकांमध्ये असलेली ऊर्जा ‘ग्लायकोजन’ या स्वरूपात स्नायू आणि यकृतात साठवून ठेवतं. ही साठवण फक्त २४झ्र्४८ तास टिकते, खेळ सुरू केल्यानंतर साधारण ९० मिनिटांनी शरीरातलं ग्लायकोजन संपू लागतं. म्हणून खेळाडूंना रोज योग्य प्रमाणात कर्बोदके घ्यावीच लागतात. भात, चपाती, ज्वारीझ्र्बाजरीची भाकरी, बटाटा, भाजीपाला आणि फळं हळूहळू ऊर्जा देतात; याउलट साखर किंवा गोड पेये पटकन ऊर्जा देतात खरं, पण लगेच थकवाही आणतात. बैठे खेळ खेळणार्‍या खेळाडूंमध्येही मेंदू कर्बोदकांवरच चालतो. 

खेळताना खेळाडूंच्या स्नायूंमध्ये सूक्ष्म ताण येतो आणि त्यांची झीज होते. ही झीज भरून काढण्याचं काम प्रथिनं करतात. प्रथिनं म्हणजे फक्त स्नायू बळकट करणाराच नाही, तर स्नायू दुरुस्त करणारा घटकही आहे. पण शरीर एका वेळेस २५झ्र्३० ग्रॅमपेक्षा जास्त प्रथिनं वापरू शकत नाही. त्यामुळे दिवसातून थोडी प्रथिनं घेणं फायदेशीर ठरतं. दूध, दही, ताक, पनीर, डाळी, उसळी, अंडी, मासे आणि सोयाबीन हे प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत. 

फॅट्स  किंवा चरबी याबद्दल अनेक गैरसमज आहेत, पण प्रत्यक्षात योग्य प्रकारची चरबी खेळाडूंना आवश्यक असते. शरीर काही प्रमाणात चरबी जाळूनही ऊर्जा निर्माण करतं. चरबी असल्याशिवाय, अ, ड, ई आणि क, ही जीवनसत्त्वं शरीरात शोषलीच जाऊ शकत नाहीत. खेळाडूंच्या कामगिरीसाठी महत्त्वाची असणारी हार्मोन्स संतुलित ठेवायला चरबीच मदत करते. त्यामुळेच शेंगदाणे, तीळ, नारळ, बदाम, अक्रोड आणि थोडं तूप या चांगल्या प्रकारच्या चरबीचं खेळाडूंच्या आहारात महत्त्वाचं स्थान आहे. 

शेवटी, पाणी आणि क्षार हा आहाराचाच महत्त्वाचा भाग आहे. शरीरातील पाणी फक्त २ टक्के कमी झालं, तरी कामगिरीत लक्षणीय घट दिसते. म्हणून खेळाडूंनी पाणी, ताक किंवा लिंबू सरबत घेत राहणं आवश्यक असतं.

थोडक्यात सांगायचं तर खेळाडूंचा आहार म्हणजे काही वेगळा नसतो, तर योग्य अन्न योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेला घेण्याची शिस्त असते. हे खरं तर केवळ खेळाडूंसाठीच नाही तर सर्वांसाठीच लागू आहे.

– डॉ. निलेश कोदे 

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org