loksatta kutuhal ocean tides ebb of ocean waters high tides in ocean zws 70 | Loksatta

कुतूहल : भरती आणि ओहोटी

भरतीचे ठिकाण जसेजसे चंद्रासमोरून पुढे सरकते तसतसा गुरुत्वीय बलाचा प्रभाव कमी होतो व पाण्याचा फुगवटा ओसरू लागतो.

loksatta kutuhal ocean tides ebb of ocean waters
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

भरती-ओहोटी म्हणजेच चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे समुद्रात येणाऱ्या प्रदीर्घ आवर्ताच्या लाटा. चंद्र व सूर्याचे गुरुत्वाकर्षण आणि पृथ्वीचे परिवलन भरती-ओहोटीसाठी कारणीभूत ठरते. पृथ्वी २४ तासांत एक स्वपरिक्रमा पूर्ण करीत असल्याने दर २४ तास ५४ मिनिटांनी तिचा प्रत्येक भाग पुन:पुन्हा चंद्रासमोर येतो. चंद्राच्या गुरुत्वीय बलामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वस्तू खेचल्या जातात. जमीन घनरूप असल्याने गुरुत्वाकर्षणाचा परिणाम तुलनेने कमी होतो. परंतु पाणी चंद्राकडे ओढले गेल्याने फुगवटा येऊन पाणीपातळी वाढते, म्हणजेच भरती येते.

पाणी संपूर्ण चढल्यानंतर १२ मिनिटे स्थिर राहते. या स्थितीला ‘समा’ म्हणतात. भरतीचे ठिकाण जसेजसे चंद्रासमोरून पुढे सरकते तसतसा गुरुत्वीय बलाचा प्रभाव कमी होतो व पाण्याचा फुगवटा ओसरू लागतो. यालाच आपण ‘ओहोटी लागणे’ असे म्हणतो. पाणी संपूर्ण उतरल्यानंतरही १२ मिनिटे स्थिर राहते. या स्थितीला ‘निखार’ म्हणतात. भरती-ओहोटीमध्ये सरासरी ६ तास १२ मिनिटांचा अवधी असतो. दोन भरती किंवा दोन ओहोटीच्या वेळांमध्ये सरासरी १२ तास २५ मिनिटांचा कालावधी असतो.

सूर्य पृथ्वीपासून दूर असल्याने त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा भरती-ओहोटीवर कमी परिणाम होतो. याउलट चंद्र आकाराने लहान असूनही पृथ्वीच्या जवळ असल्याने चंद्राचे गुरुत्वाकर्षण भरती-ओहोटीवर अधिक परिणाम करते. पृथ्वी व चंद्राच्या गतीप्रमाणे रोज भरती-ओहोटीची वेळ आणि कक्षादेखील कमी-अधिक होते. पौर्णिमा व अमावास्येला चंद्र, सूर्य व पृथ्वीपासून सरळ रेषेत असल्याने त्यांची गुरुत्वीय बले समुद्राच्या पाण्यावर एकत्र कार्य करतात. त्यामुळे येणारी भरती सरासरीपेक्षा मोठी व ओहोटी सरासरीपेक्षा कमी असते, तिला ‘उधाणाची भरती’ म्हणतात. महिन्यातून दोनदा, शुक्ल व कृष्ण अष्टमीला चंद्र व सूर्याच्या गुरुत्वाकर्षण कक्षा एकमेकांशी काटकोन करतात. त्यांची गुरुत्वीय बले एकमेकांच्या विरुद्ध कार्य करतात. त्या दिवशी सरासरीपेक्षा लहान भरती येते तर ओहोटीची पातळी सरासरीपेक्षा उंच असते. तिला ‘भांगाची भरती’ म्हणतात.

दररोज भरतीची वेळ ५० मिनिटांनी पुढे जाते. तसेच विषुववृत्तावर पृथ्वी व चंद्राच्या कक्षा समांतर असल्याने भरती-ओहोटी मोठी असते तर ध्रुवाजवळ ती जवळजवळ आढळतच नाही. भरतीच्या वेळी मासेमारीसाठी दूर जावे लागत नाही तसेच मीठ उत्पादन आणि विद्युतनिर्मितीदेखील केली जाते.

– अदिती जोगळेकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 02:53 IST
Next Story
कुतूहल : समुद्री लाटा व त्यांचे प्रकार