कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तीन पायऱ्यांपैकी पहिली मर्यादित (नॅरो) बुद्धिमत्ता काय आहे हे आपण पाहिले. त्याच्या पुढची पायरी म्हणजे व्यापक कृत्रिम बुद्धिमत्ता. इंग्रजीमध्ये तिला आर्टिफिशिअल जनरल इंटेलिजन्स (एजीआय), म्हणजे माणसाच्या बुद्धिमत्तेइतकी व्यापक या अर्थाने ‘जनरल’ बुद्धिमत्ता म्हटले जाते.

गंमत म्हणजे सुरुवातीला यंत्रांना व्यापक बुद्धिमत्ता बहाल करण्याच्या कल्पनेने संशोधक झपाटलेले होते. मात्र कृत्रिम बुद्धिमत्तेचे संशोधन खासगी कंपन्यांकडे गेले तेव्हा लक्ष्य बदलले. विशिष्ट काम करण्याइतकी मर्यादित बुद्धिमत्ता पुरे असा विचार रुजला. त्यामुळे व्यापक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दिशेने चाललेले संशोधन थोडे संथ झाले.

हेही वाचा >>> कुतूहल : तंत्रज्ञानातील तत्त्वज्ञ माँटगोमेरी चर्चलँड

बुद्धिमत्तेचे अनेक पैलू असतात. भाषिक समज, गणिती क्षमता, इंद्रियज्ञान, निरीक्षण आणि तर्कसंगत विचार, मागचा-पुढचा संदर्भ समजून घेणे, उपलब्ध माहितीचे विश्लेषण करणे, कारणमीमांसा करता येणे, धोरण आखून नियोजन करणे, चुका ओळखणे, कोडी सोडवणे, निर्णयक्षमता, अनुभवावरून शिकणे आणि इतर अनेक. आपण आजूबाजूला पाहिले तर प्रत्येक माणसात या गोष्टी कमीजास्त प्रमाणात आढळतात. एकातच सारे पैलू एकवटले आहेत असे दिसत नाही. उलट व्यापक कृत्रिम बुद्धिमत्तेत एकच प्रणाली (प्रोग्राम) सर्व काही करू शकेल असा प्रयत्न असतो. चॅटजीपीटीमागची ओपन एआय कंपनी किंवा डीप माइंड ही गूगलची कंपनी यांना व्यापक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रत्यक्षात आणायची आहे. त्यातला एक प्रयत्न म्हणजे डीप माइंडची अल्फा गो प्रणाली.

गो हा एक चिनी बैठा खेळ. बुद्धिबळाप्रमाणे त्यात पुढच्या खेळींचा विचार करत आपली चाल खेळायची असते. अल्फा गो प्रणालीला संशोधकांनी सुरुवातीला गो खेळाचे नियम शिकवले. माणसांबरोबर खेळता खेळता ती आणखी शिकत गेली. तिची पुढची दर आवृत्ती शक्तिशाली होत गेली. इतकी, की अल्फा गो मास्टर आवृत्तीने माणसांना हरवण्यास सुरुवात केली.

हेही वाचा >>> कुतूहल : ही सारी चॅटबॉटची किमया!

संशोधकांनी पुढची आवृत्ती बनवली- अल्फा गो झीरो. ती तर आपली आपणच शिकू शकत होती. मग तिने पुढची पायरी गाठली- अल्फा झीरो. यातला गो शब्द का गेला? कारण अल्फा झीरो प्रणाली बुद्धिबळ आणि शोगीसारखे खेळही आपणहून शिकत होती. अवघ्या काही तासांमध्ये! त्यामुळे खेळाच्या बाबतीत ही प्रणाली व्यापक बुद्धिमत्तेकडे झुकते म्हणता येईल, पण फक्त या एका पैलूसाठी. आज नाही तर उद्या व्यापक कृत्रिम बुद्धिमत्तेची आस पूर्ण होईल का, यावर वेगाने संशोधन सुरू आहे.

डॉ. मेघश्री दळवी

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org