प्रोटोकॉर्डेटा ही संज्ञा, युरोकॉर्डेटा (पुच्छसमपृष्ठरज्जू, उदा. डोलीयोलम, हर्डमानिया) आणि सेफॅलोकॉर्डेटा (शीर्षसमपृष्ठरज्जू, उदा. अॅम्फिऑक्सस) या दोन उपसंघांना देण्यात येते. या गटात अर्धसमपृष्ठरज्जू (उदा. बॅलॅनोग्लॉसस) संघाचासुद्धा समावेश केला जात असे. परंतु या प्राण्यांचे साधम्र्य अपृष्ठवंशीय प्राण्यांशी जास्त असल्याने त्यांना वेगळे केले. हे सर्व सजीव सुमारे ५४ कोटी वर्षांपूर्वी उदयास आले. उत्क्रांतीच्या शिडीच्या अगदी खालच्या स्तरावर हे असून संपूर्णत: सागरी अधिवासात त्यांचे अस्तित्व टिकून आहे. युरोकॉर्डेटा आणि सेफॅलोकॉर्डेटा हे आपले आद्य पूर्वज. अपृष्ठवंशीय प्राण्यांनंतर उत्क्रांत होत पृष्ठवंशीय प्राणी तयार होत असताना हा मधला थांबा. त्यांच्या शरीरातील पृष्ठरज्जू (नोटोकोर्ड) आणि कल्ला विदरांमुळे हे जीव पृष्ठवंशीय प्राण्यांशी साधम्र्य दर्शवतात. मात्र पृष्ठरज्जूचे रूपांतर नंतर पाठीच्या कण्यात होत नाही. युरोकॉर्डेट उपसंघातील प्रजातींना टय़ुनिकेट म्हणतात, कारण यांचे शरीर टय़ुनिसीन या जटिल कबरेदक पदार्थापासून आणि प्रथिनापासून बनलेल्या ‘टय़ुनिक’ या आवरणात बंदिस्त असते. प्राणी जसजसा वाढतो तसे ते वाढत जाते. सेफॅलोकॉर्डेट प्रजाती मात्र माशासारख्या लांबट शरीराच्या असतात. सुमारे ५ सेंटीमीटर लांबीचे हे जीव मातीत अंग खुपसून असल्याने सहज नजरेस पडत नाहीत.
तमिळनाडूच्या मंडपमजवळ क्रुसाडी बेटांवर या जीवांची रेलचेल होती. युरोकॉर्डेटांपासून डायडेम्नीन हे कर्करोगप्रतिबंधक, विषाणूनिर्मूलन करणारे आणि इम्युनोसप्रेसंट ‘प्रतिक्षमता दमन’ करणारी अशी रासायनिक संयुगे मिळवली जातात. अप्लीडेईन या संयुगाचा वापर कोविड-१९ च्या औषधोपचारांत झाला आहे आणि ट्राबेक्टेडीन कर्करोगावर परिणामकारक असल्याचे आढळले आहे. या प्राण्यांमध्ये स्वत:च्या पेशींच्या विकृती दुरुस्त करण्याची क्षमता असल्यामुळे त्या मानवाच्या कल्याणासाठी वापरण्याचा प्रयत्न होत आहे. कोरिया, चिली, जपान अशा देशांत काही टय़ुनिकेटचा वापर खाद्य म्हणूनही होतो, मात्र आपल्याकडे नाही.
टय़ुनिकच्या आवरणात सेल्युलोज असल्याने त्याच्या विघटनाने ‘इथेनॉल’ हे जैवइंधन बनवण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यांच्या शरीरापासून मत्स्यखाद्य बनवले जाते. यासाठी या प्राण्यांची अॅक्वाकल्चर-शेती देखील केली जाते. काही प्रजाती जीनोम अभ्यासासाठी वापरल्या जातात. आपले इतके प्राचीन पूर्वज प्रदूषणाच्या विळख्यात नष्ट होऊ देणे योग्य नाही.
– डॉ. नंदिनी वि. देशमुख
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org