scorecardresearch

कुतूहल : पाणथळींचे संवर्धन ही काळाची गरज

जगभर नुकताच ‘पाणथळ भूमी दिन’ साजरा झाला. त्यातून अशा जागांचे संरक्षण, संवर्धन करण्याची गरज लोकांना पटवली जाते

ramsar convention on wetlands
पाणथळींचे संवर्धन

जगभर नुकताच ‘पाणथळ भूमी दिन’ साजरा झाला. त्यातून अशा जागांचे संरक्षण, संवर्धन करण्याची गरज लोकांना पटवली जाते. २ फेब्रुवारी १९७१ला इराणच्या रामसर शहरात एका जागतिक परिषदेत पाणथळ जागांचे रक्षण, संवर्धन करण्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी या दिवसाची निवड झाली. भारतासह अनेक देशांनी हा करार मान्य केला. संयुक्त-राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत ३० ऑगस्ट २०२१ला ठराव क्र. ७५/३१७ संमत होऊन जगभर २ फेब्रुवारी हा दिवस ‘पाणथळ भूमी दिन’ म्हणून साजरा करण्याची अधिकृत घोषणा झाली. रामसर करार मान्य असणारे देश १९९७ सालापासूनच पाणथळ भूमी दिन साजरा करत आहेत.

डबकी, तलाव, नद्या, खाडय़ा, धरणे, शेततळी या पाणथळ जागा अशा एकेका परिसंस्थेतून शेकडो जातींचे लहान-मोठे प्राणी, पक्षी, मासे, कीटक, कृमी, जिवाणू, शैवाल, झुडपे, वृक्ष पोसले जातात. हा एकच मुद्दा पाणथळ जागांच्या जैववविविधतेचे महत्त्व दाखवतो. पाणथळ जागा पावसाचे पाणी अडवतात, शोषतात आणि भूगर्भातील पाण्याची पातळी टिकवतात. निसर्गरम्य वातावरण निर्माण करून हवा थंड ठेवतात. शिवाय गावांना पाणी आणि रोजगारही पुरवतात.

पाणथळ जागा कचराकुंडय़ा आहेत, अशी अनेकांची समजूत आहे. काही लोकांच्या विध्वंसक वृत्तीमुळे आणि बहुसंख्यांच्या दुर्लक्ष करण्याने ९० टक्के पाणथळ जागांची हानी  झाली आहे. त्या लवकर पूर्ववत आरोग्यपूर्ण स्थितीत आणल्या पाहिजेत, हा विचार मध्यवर्ती ठेवून ‘पाणथळ भूमी अधिवेशना’च्या सचिवालयाने २०२३ या वर्षांसाठी जागतिक पाणथळ भूमी दिन मोहिमेचे आयोजन केले आहे. पाणथळ भूमी दिन जनतेत जाणीवजागृती करण्याची संधी सुजाण संस्था व कार्यकर्त्यांना देतो. पाणथळ जागा आरोग्यपूर्ण स्थितीत आणणे हे प्रत्येकाचे काम आहे. ते केले नाही तर पूर, दुष्काळ, अतिवृष्टी, पुराचे पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळून होणारे साथीचे रोग, अशा आपत्ती प्रत्येकाला भोगाव्या लागतील.      

केवळ सरकार, स्वयंसेवी संस्था, मूठभर चळवळे लोक यांच्यावर हे काम सोडून चालणार नाही. समुद्रापेक्षा विहिरी आणि तलाव खूपच लहान असल्यामुळे लगेच प्रदूषित होतात. इमारत दुरुस्तीचा कचरा तळय़ांत भराव म्हणून टाकू नये. घराजवळच्या पाणथळ जागेत शिजलेले अन्न दयाबुद्धीने पशू-पक्ष्यांना देऊ नये. आपण देतो ते त्यांचे नैसर्गिक खाद्य नसते. विहिरी-तलावांचे झरे बंद झाले असतील तर गाळ उपसून ते जगवावेत. या दिवसाच्या निमित्ताने जनजागृती करणे गरजेचे आहे.

– नारायण वाडदेकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 04:28 IST
ताज्या बातम्या