माणूस जसा वैज्ञानिक प्रगती करत गेला तसतशी भौतिक सुखं हात जोडून त्याच्यासमोर उभी राहू लागली. उदाहरणार्थ कपडे धुण्याचं यंत्र! पूर्वी लोक नदीवर किंवा विहिरीतलं पाणी काढून हाताने कपडे धूत असत. घरात नळ आल्यावर घरातच ब्रशने घासून कपडे स्वच्छ धुतले जाऊ लागले. यात शारीरिक श्रम भरपूर आणि वेळही जास्त जात असे; पण जशी धुलाई यंत्राची निर्मिती झाली, तसे श्रम आणि वेळ या दोन्हीचीही बचत होऊ लागली.
पण कपडे धुण्याचे यंत्र काही एका झटक्यात तयार केले गेले नाही, तर प्रथम माणूस कल्पकतेने, फिरणारा ड्रम आणि विजेची मोटर वापरून कपडे धुऊ लागला. त्यानंतर हळूहळू त्यात सुधारणा होत गेली. कपडे-धुलाई यंत्रात मुख्यत: दोन गोल ड्रम्स असतात. बाहेरचा ड्रम त्यातून पाणी बाहेर पडू न देणारा असतो म्हणजे ‘वॉटर टाइट’ असतो; तर त्याच्या आतला ड्रम सच्छिद्र असतो.
पाणी आणि साबण आतल्या ड्रममध्ये भरून त्यात धुण्याचे कपडे घातले जातात आणि विजेच्या साहाय्याने मोटर वापरून ड्रम घुसळले जातात. नंतर आतल्या ड्रमच्या छिद्रांतून पाणी बाहेर फेकलं जातं. त्यामुळे कपडे ओलसर राहतात पण पाणीविरहित होतात. पण अशी स्वच्छता होताना कपडे जंतुविरहित कसे होतील, यावर वैज्ञानिकांनी विचार केला. चांदी ही सूक्ष्मजीवांना मारते. हा चांदीचा गुणधर्म लक्षात घेऊन कपडे-धुलाईयंत्रात चांदीचा वापर करण्यास सुरुवात केली.
काही धुलाईयंत्रांत चांदीच्या प्लेट्स किंवा स्फटिक वापरतात. जिथून पाणी यंत्रामध्ये आत जातं, तिथे या चांदीच्या पट्ट्या लावतात. पाणी ड्रममध्ये जायला लागल्यावर विद्युत प्रवाहामुळे, पाण्याचं विद्युत अपघटन होऊन, चांदीचंही विघटन होऊन सूक्ष्म चांदीचे अब्जावधी आयन तयार होतात आणि पाण्याबरोबर यंत्रात जातात. काही यंत्रांमध्ये तर धुण्याचा ड्रम किंवा पल्सेटर म्हणजे मशीनच्या आतल्या ड्रममध्ये किंवा तळाशी असणार्या फिरत्या भागावर चांदीचा मुलामा दिला जातो.
चांदीचे धन आयन, प्रभावी जंतुनाशक, बुरशीविरोधी असून, कपड्यांची घामामुळे येणारी दुर्गंधी काढून, ते कपडे निर्जंतुक करतात. असे कपडे ३० दिवसांपर्यंत स्वच्छ राहतात. हे आयन थंड पाण्यातही निर्जंतुकीकरण करत असल्यामुळे गरम पाण्याची गरज भासत नाही. विजेचीही बचत होते. शिवाय धुतलेले कपडे आक्रसतही नाहीत.
चांदीचे धन आयन पाण्यात गेल्यानंतर जिवाणू, बुरशी यांची पुनरुत्पादन क्षमताही थांबवतात. हे आयन जिवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करणारं अदृश्य असं कवच निर्माण करत असल्यामुळे, धुऊन वाळलेले कपडे कपाटातही बराच काळ स्वच्छ राहू शकतात.
– उर्मिला फडके
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org
