कंटकीचर्मी संघातील प्राणी फक्त सागरी पाण्यातच आढळतात! विशिष्ट शरीररचना, बहुरंगी बाह्यांग लाभलेले हे जीव, अंत:कंकालातील काटेरी प्रक्षेपांमुळे प्रचलित नावाने ओळखले जातात. प्रगत अवयवप्रणाली प्रथमच कंटकीचर्मीमध्ये विकसित झालेली आहे. बाह्य, मध्य व अंत:त्वचा असे त्रिस्तरीय कंकाल असून चलन-वलन, श्वसन व पोषक-उत्सर्जक पदार्थ वहन, या तीनही क्रियांसाठी ‘नलिका-पाद’ हे वैशिष्टय़पूर्ण अवयव असतात. हे ‘जल संवहनी’ कार्य केवळ या गटातील प्राण्यांसाठी असते.
हे सजीव दंडगोलाकार, तारकाकृती वा चेंडूसारखे गोलाकार असतात. अॅस्टरॉईडी (समुद्रतारे- सी स्टार), क्रिनॉईडी (समुद्रलिली), होलोथुरॉईडी (समुद्रकाकडी), इकिनॉईडी (समुद्रसाळींदर- सीअर्चिन) व ऑफियुरॉईडी (भंगुरतारे-ब्रिटल स्टार) अशा पाच उप-वर्गात विभागले आहेत. यापैकी पहिल्या गटातील तारामाशासारखे अनेक जीव स्वच्छंदपणे विहरणारे असतात तर बाकी उप-वर्गातील प्राणी आधात्रीला चिकटलेले असतात.




समुद्र-सािळदर व समुद्र-काकडी चवदार अन्न म्हणून जपान-फ्रान्समध्ये प्रसिद्ध आहेत. विशेषत: दुसरा गट हा पेय (सूप) म्हणून वापरतात तर समुद्र-सािळदराचे (सी-अर्चिन) अंडाशय (गाभोळी) चविष्ट मानतात. चिनी औषधांत या प्राण्यांच्या भागांचा उपयोग केला जातो असे मानतात. या संघातील बहुतांश सजीवांच्या अंत:कंकालातील चुनखडी शेतीच्या कामात उपयुक्त ठरते. तारामासा व तत्सम अनेक कंटकीचर्मी ही समुद्रातील भक्षकांचे भक्ष्य असल्याने अन्नसाखळीतील महत्त्वाचा दुवा आहेत.
मृत्यूनंतर त्यांचे अंत:कंकाल समुद्रातील तळ राखण्यात आणि खडक व दगडांची झीज भरून काढण्यात उपयुक्त ठरत असल्याने भू-विज्ञानात यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशा प्रकारे हे प्राणी मानवी खाद्य, औषधी उपयोग, संशोधन, चुनखडीचा स्रोत, इ. अनेकविध मार्गानी मौल्यवान ठरतात. काही समुद्र तारे प्रवाळे खाऊन नष्ट करतात, त्यामुळे प्रवाळ क्षेत्रात समुद्र तारे आढळल्यास ही प्रवाळासाठी धोक्याची सूचना असते.
समुद्रातील प्रदूषणामुळे आणि आर्थिक फायद्यासाठी कंटकचर्मी सजीव मोठय़ा संख्येने काढल्यामुळे, तसेच यांत्रिक नौकांनी समुद्र-तळ खरवडल्याने त्यांची संख्या कमी झाली. अशामुळे सागरी परिसंस्था धोक्यात येऊन पर्यायाने मानवाचा तोटा होत आहे. कंटकीचर्मीना संरक्षण दिल्यास माणूस व एकूण पर्यावरण टिकून राहील.
– डॉ. प्रसाद कर्णिक
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org