scorecardresearch

कुतूहल : झुपकेदार शेपटीचा शास्त्रज्ञ

अ‍ॅमेझॉनच्या घनदाट जंगलामधील लाखो ब्राझील नटची झाडे या खारूताईमुळे तयार झाली आहेत.

शास्त्रज्ञांचा विसरभोळेपणा आणि त्यातून लागलेले विविध शोध विज्ञानास नवीन नाहीत पण एका चिमुकल्या प्राण्याच्या विसरभोळेपणामधून अ‍ॅमेझॉनचे घनदाट जंगल तयार झाले आहे. यावर तुमचा विश्वास बसत नाही ना? पण हे सत्य आहे आणि हे साध्य  झाले आहे आमच्या झुपकेदार शेपटीच्या खारूताईमुळे. वृक्षांची फळे गोळा करून त्यातील गर खाणे हा तिचा नित्याचाच उद्योग. पोट भरले की या बाईसाहेब ही कुरतडलेली फळे नंतर भूक लागली की निवांत खाऊ या म्हणून त्या वृक्षाच्या परिसरातच पण त्याच्या सावलीपासून दूर योग्य जागा शोधून तेथे पुरून ठेवतात आणि नंतर आपण तेथे काहीतरी ठेवले आहे हे विसरून जातात. धो धो पाऊस सुरू झाला की, या बिया रुजतात आणि कालांतराने या रोपटय़ाचे वृक्षात रूपांतर होते. अ‍ॅमेझॉनचे जंगल हे हजारो विविध प्रकारच्या वृक्षांचे माहेरघर आहे. त्यातील एक वृक्ष म्हणजे ब्राझील नट. या वृक्षाची फळे खारीला खूप आवडतात. अ‍ॅमेझॉनच्या घनदाट जंगलामधील लाखो ब्राझील नटची झाडे या खारूताईमुळे तयार झाली आहेत. 

शास्त्रज्ञ म्हणतात, खार ही निसर्गशास्त्रज्ञ आहे. आम्ही प्रयोगशाळेत तयार केलेली रोपे काही वेळा निसर्गात टिकणार नाहीत पण खारूताईने निवडलेले बीज आणि त्यापासून तयार झालेले रोप वृक्षात रूपांतरित होणारच. फळ आणि बीज जमिनीखाली पुरताना खार प्रथम खात्री करते की, ते निरोगीच असले पाहिजे, जी जागा निवडली जाते तीसुद्धा मोकळी, भुसभुशीत, थोडीशी ओलसर आणि किडामुंगीमुक्त असते. बीज पुरल्यावर त्यावर संरक्षणासाठी पालापाचोळा ढकलला जातो. शास्त्रज्ञ म्हणतात, हा प्राणी सर्वप्रथम खराब फळे, बिया खाऊन टाकतो आणि निरोगी फळे आणि बियाच जमिनीत, नंतर खाण्यासाठी पुरतो. बी पुरताना जमीन योग्य खोलीवरच, वृक्षापासून दूर, ज्या जमिनीमध्ये ह्युमिक आम्ल, आद्र्रता ४० टक्क्यांपर्यंत असते अशीच निवडली जाते. या घटकांचा शोध हा प्राणी माती उकरून श्वासाच्या साहाय्याने करतो. बी रुजवण्यासाठी जमिनीखाली आवश्यक तेवढाच प्रकाश, योग्य तापमान, प्राणवायू, सेंद्रिय कर्ब, आद्र्रता आणि योग्य खोलीची आवश्यकता असते हे विज्ञानाने विविध प्रयोगांद्वारे दोन शतकांपूर्वीच सिद्ध केले आहे, जे खारूताईने हजारो वर्षांपूर्वीच निसर्ग प्रयोगशाळेत प्रत्यक्ष प्रयोग करून घनदाट जंगल निर्मितीमधून दाखवले आहे. निसर्गाचाच एक घटक जेव्हा विज्ञान शिक्षकाच्या भूमिकेत जातो तेव्हाच लक्षात येते की विज्ञान येथेच तर लपलेले आहे.

– डॉ. नागेश टेकाळे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta kutuhal squirrels important to the environment zws