घाम येणं ही शरीरातली एक नैसर्गिक व अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. जेव्हा जेव्हा शरीराचं तापमान वाढतं तेव्हा तेव्हा घाम येतो आणि शरीराची उष्णता कमी करून तो शरीराचं तापमान नियंत्रित ठेवतो. या प्रक्रियेला ‘तापमान नियमन’ असं म्हणतात. या प्रक्रियेत शरीर आपलं अंतर्गत तापमान, जे सामान्यत: ३७ अंश सेल्सियस असतं, ते स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करतं. घामामध्ये मुख्यत: पाणी, थोडं मीठ म्हणजेच सोडियम क्लोराईड आणि शरीराला अपायकारक काही द्रव्यं असतात. शरीराला नको असलेली अपायकारक द्रव्यं काही प्रमाणात शरीराबाहेर टाकून घाम शरीरातली अशुद्धता कमी करतो. घामामुळे शरीरातलं रक्ताभिसरण सुधारतं.

व्यायाम करताना आपण धावणं, चालणं, उड्या मारणं किंवा यासारख्या इतर अनेक हालचाली करतो. साहजिकच या हालचाली करताना आपल्या स्नायूंना काम करण्यासाठी जास्त ऊर्जेची आवश्यकता भासते. ही ऊर्जा अन्नातून मिळालेल्या ग्लुकोजच्या विघटनातून तयार होते. हे विघटन होताना शरीरात उष्णता निर्माण होऊन शरीराचं तापमान वाढू लागतं.

मूलत: मानवी शरीराचं सामान्य तापमान ३७ अंश सेल्सियस असतं. व्यायाम करताना वाढलेलं तापमान नियंत्रित ठेवणं आवश्यक असतं. जर तापमान खूप वाढलं तर शरीरातल्या अवयवांना हानी पोहोचू शकते. म्हणून शरीरात एक विशेष नियंत्रण व्यवस्था असते. मेंदूतला ‘हायपोथॅलेमस’ हा भाग शरीराचं तापमान नियंत्रित करण्याचं काम करतो. जेव्हा शरीराचं तापमान वाढतं, तेव्हा ‘हायपोथॅलेमस’ त्वचेतल्या स्वेदग्रंथींना म्हणजेच घामाच्या ग्रंथींना संदेश पाठवतो.

त्यानंतर या स्वेदग्रंथी शरीरातलं, मुख्यत: पाणी, थोडं मीठ आणि काही क्षार यांचं मिश्रण घामाच्या स्वरूपात त्वचेच्या छिद्रांमार्फत त्वचेच्या पृष्ठभागावर सोडतात. त्वचेवर आलेला घाम शरीरातली उष्णता शोषून घेतो आणि या उष्णतेच्या मदतीने त्याचं बाष्पीभवन होतं म्हणजेच बाष्पात रूपांतर होतं. या क्रियेत शरीरातली उष्णता बाहेर पडल्याने शरीर थंड होतं आणि शरीराचं तापमान संतुलित होतं. बाष्पीभवन होऊन घाम हवेत पूर्णपणे उडून गेला की आपल्याला शरीर थंड झाल्याचं जाणवतं.

व्यायाम जितका जास्त किंवा तीव्र असेल तितका अधिक घाम येतो. कारण शरीराला अधिक उष्णता बाहेर टाकावी लागते. या घामाचं प्रमाण हे हवेचं तापमान म्हणजेच उष्ण किंवा थंड हवामान, हवेची आर्द्रता, कपड्यांचा प्रकार आणि व्यक्तीची शारीरिक क्षमता यांवर अवलंबून असतं.

थोडक्यात घाम येणं ही शरीराला थंड ठेवण्यासाठी आणि तापमान नियंत्रित करण्यासाठी होणारी एक संरक्षणात्मक व उपयुक्त अशी शरीराला जैविक थंडावा देणारी प्रणाली आहे, म्हणजेच ‘कूलिंग सिस्टीम’ आहे. हिच्याअभावी शरीराचं तापमान धोकादायक पातळीपर्यंत वाढू शकतं. 

– प्रज्ञा नाडकर्णी

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org