scorecardresearch

कुतूहल : वाळवीचे वारूळ आणि शॉपिंग मॉल

वाळवीच्या वसाहती असलेले वारूळ वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखले जाते.

वाळवीचे वारूळ आणि हरित-वास्तुशिल्पघर बांधण्याची कल्पना आदिमानवाने पक्ष्यांकडून आणि किडे-मुंग्यांकडून घेतली असणार. कारण वन्यप्राणी असले उद्योग करत नाहीत!

निसर्गाच्या उत्कृष्ट वास्तुशिल्पज्ञांपैकी एक म्हणजे किडा वर्गातील वाळवी. वाळवीच्या वसाहती असलेले वारूळ वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखले जाते. आफ्रिका, दक्षिण अमेरिका, आशिया, ऑस्ट्रेलिया इत्यादी ठिकाणी प्रचंड आकाराची वारुळे पाहायला मिळतात. ही वारुळे अनेक वर्षे टिकतात. वाळवी जमिनीखाली असलेल्या मुख्य घरटय़ावर माती, पाणी आणि लाळेचा उपयोग करून छोटय़ा गोलाकार विटा तयार करते आणि टेकडीसारखा भाग बांधते. या टेकडीसारख्या भागाचे दोन थर असतात. आतल्या थराची भिंत मजबूत आणि एकसंध असते तर बाहेरचा थर सूक्ष्म छिद्रांचा, जाळीदार असतो. या छिद्रांपासून तयार झालेल्या छोटय़ा बोगद्यांचे जाळे वारुळात सर्वत्र पसरलेले असते. काही वारुळांच्या वर धुरांडी असतात. काही बोगदे गरजेनुसार बंद केले जातात, तर काही नवीन बांधले जातात. खालच्या छिद्रांतून हवा आत खेचली जाते. ही हवा बाहेरच्या तापमानानुसार उष्ण होत वर ढकलली जाते आणि सरतेशेवटी वरच्या धुरांडय़ातून बाहेर फेकली जाते. परत ताजी हवा तळातून आत येते, त्यामुळे वारुळाच्या आतील तापमान कायम राखले जाते. वाळवीचे प्रमुख खाद्य असलेल्या बुरशीची लागवड, वारुळाच्या भिंतीच्या आतल्या बाजूवर केली जाते. त्यासाठी आतील तापमान नियंत्रित ठेवणे अत्यंत आवश्यक असते. 

या वारुळांपासून प्रेरणा घेऊन वास्तुविशारद मिक पिअर्स यांनी तयार केलेल्या आराखडय़ानुसार बांधलेले, झिम्बाब्वेतील हरारे येथील ‘ईस्टगेट सेंटर’ हे हरित-वास्तुशिल्पाचा उत्तम नमुना आहे. जास्त उष्माधारकता असलेल्या साहित्यापासून बांधलेल्या दोन इमारती अणि काचेने आच्छादलेल्या इमारतींमधील प्रांगण अशी या संकुलाची रचना आहे. इमारतींची बाहेरील भिंत काहीशी खडबडीत आहे. काही जागी छोटी झुडपेही ठेवलेली दिसतात. यामुळे िभती बरीचशी उष्णता शोषून घेतात आणि आतील तापमान फारसे बदलत नाही. तळाशी असलेले पंखे बाहेरची थंड हवा आत खेचून वर ढकलतात. इमारतीत असलेल्या नलिकांमधून ही हवा इमारतभर फिरत आजूबाजूची उष्णता शोषून घेत मध्यभागी असलेल्या मुख्य नलिकेमधून धुरांडय़ाद्वारे बाहेर ढकलली जाते. कुठल्याही कृत्रिम साधनाचा वापर न करता इमारतीच्या तापमानाचे नियंत्रण होते. ‘ईस्टगेट सेंटर’ त्याच आकारमानाच्या इतर इमारतींपेक्षा १० टक्के कमी ऊर्जा वापरते.

 – डॉ. सुभगा कार्लेकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta kutuhal termite mound termite zws