आपल्याला आकाश कधी निरभ्र दिसतं, तर कधी त्यात काही ढग, कापूस पिंजल्यासारखे इतस्तत: पसरलेले दिसतात. कधी काळेकुट्ट ढग आकाश व्यापून टाकतात. हे ढग म्हणजे काय बरं?

ढग म्हणजे आकाशात दिसणारे पाण्याच्या अतिशय सूक्ष्म थेंबांचे किंवा बर्फाच्या कणांचे मोठे समूह. ढग तयार होण्यामागे निसर्गातलं जलचक्र आहे. या जलचक्राचा पहिला टप्पा म्हणजे बाष्पीभवन! सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्र, नद्या, तलाव यातल्या पाण्याचं, जलबाष्पात म्हणजेच वाफेत रूपांतर होतं. ही गरम वाफ हलकी असल्यामुळे वरच्या थंड वातावरणात जाते. हा जलचक्राचा दुसरा टप्पा. वर जाताना वाफेचं तापमान कमी होतं. जलबाष्प लहान लहान पाण्याच्या थेंबांमध्ये किंवा बर्फाच्या स्फटिकांमध्ये बदलतं. या प्रक्रियेला ‘संघनन’ असं म्हणतात. हे सूक्ष्म थेंब हवेत तरंगणार्‍या धूलिकणांभोवती जमा होतात आणि ढग तयार होतात.

ढगांमध्ये पाण्याचे सूक्ष्म थेंब असतात. उंचावरच्या ढगांमध्ये बर्फाचे कणसुद्धा असतात. सूर्यप्रकाशातले सर्व रंग ढगातल्या पाण्याच्या थेंबांवरून परावर्तित होतात. त्यामुळे ढग पांढरे दिसतात. जर ढगातले पाण्याचे थेंब मोठे आणि जास्त प्रमाणात असतील, तर प्रकाश ढगाच्या आतपर्यंत जाऊ शकत नाही. त्यामुळे असे ढग गडद दिसतात. सामान्यपणे अशा ढगांमुळेच पाऊस पडतो. ढगांतले पाण्याचे थेंब एकमेकांवर आपटून एकत्र आणि मोठे होतात आणि त्यांचं वजन वाढतं. मग ते थेंब गुरुत्वाकर्षणामुळे खाली पडतात आणि पाऊस पडतो.

ढगांची उंची, आकार आणि त्यांचं कार्य यानुसार त्यांची वेगवेगळी नावं आहेत. ६००० मीटर्सपेक्षा उंचावर असलेल्या ढगांना ‘सिरस’ असं म्हणतात. हे पातळ, पिसासारखे आणि बर्फाच्या कणांनी तयार झालेले असतात. त्याच्याखालच्या मध्यम उंचीवरच्या ढगांना ‘अल्टोस्ट्रॅटस’ किंवा ‘अल्टोक्युम्युलस’ असं म्हणतात. हे पांढरे किंवा राखाडी रंगाचे असतात. त्याखालच्या ढगांना, ते वेगवेगळ्या थरांत असतील तर ‘स्ट्रॅटस’ आणि फुगीर व कापसासारखे असतील तर ‘क्युम्युलस’ असं संबोधतात. ज्या ढगांमुळे सतत पाऊस पडतो त्यांना ‘निंबोस्ट्रॅटस’ म्हणतात तर ज्या ढगांमुळे वादळ, वीज आणि मुसळधार पाऊस पडतो त्यांना ‘क्युम्युलोनिंबस’ असं म्हणतात.

ढग हे पाऊस पडण्यासाठी आवश्यक आहेत. ढगांच्या माध्यमातून पृथ्वीच्या तापमानाचं नियंत्रणसुद्धा केलं जातं. जेव्हा दिवस असतो, तेव्हा ढग सूर्यप्रकाश परावर्तित करून पृथ्वी थंड ठेवतात आणि जेव्हा रात्र असते, तेव्हा उष्णता अडकवून पृथ्वीला उबदार ठेवतात. जलचक्रात ढग महत्त्वाची भूमिका वठवतात. जलचक्राच्या माध्यमातून, समुद्राच्या पाण्याच्या बाष्पातून ढग, ढगातून पाऊस आणि पावसाच्या पाण्याचं जमिनीवरून समुद्रात वहन असा पाण्याचा प्रवास अव्याहत सुरूच असतो.

– विजया चौधरी

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org