‘‘आज कुणी तरी माझी खूप आठवण काढतंय, म्हणूनच मला सारखी उचकी लागतेय!’’, असं आपण म्हणतो. पण खरंच उचकी लागण्यामागे कुणाची आठवण असते, की काही वैज्ञानिक कारण दडलेलं असतं? दैनंदिन जीवनातल्या अगदी छोट्या घटनांमागेही विज्ञान असतं, मग उचकीमागेही विज्ञान नसेल का?

आपली छाती आणि पोट यांमध्ये स्नायूंचा एक पडदा असतो. त्याला ‘श्वासपटल’ असं म्हणतात. या श्वासपटलाच्या लयबद्ध हालचालीमुळेच तर आपण श्वासोच्छवास करू शकतो. पण कधी तरी उबळ आल्यासारखी होऊन श्वासपटलाचे स्नायू आकुंचन पावतात, परिणामी आपल्या स्वरयंत्रावर क्षणिक दाब येतो आणि आपल्या तोंडातून ‘उच्’ किंवा ‘हिक’ असा आवाज बाहेर पडतो. ज्याला आपण ‘उचकी लागली’ असं म्हणतो. नेहमीच्या परिचयाची अगदी साधी वाटणारी ही उचकी, पण त्यामागे शरीरांतर्गत खूप गुंतागुंतीची जैविक क्रिया आहे.

उचकी लागणं ही पूर्णपणे अनैच्छिक प्रक्रिया म्हणजे मेंदूच्या आज्ञेची वाट न पाहता झपाट्याने होणारी एक स्वयंचलित क्रिया आहे. या प्रक्रियेत मुख्यत्वे मज्जासंस्था आणि श्वसनसंस्था सहभागी असतात. या प्रक्रियेत मेंदूच्या मुळाशी ज्याचं नियंत्रण आहे अशा, ‘फ्रेनिक नस’ आणि ‘व्हेगस नस’ या दोन महत्त्वाच्या नसांचा सहभाग असतो. 

छाती, फुप्फुस किंवा पोटातील संबंधित नसांमध्ये काही कारणांमुळे जळजळ किंवा दाह निर्माण होतो. असा संदेश मिळताच, मेंदूतलं ‘उचकी नियंत्रण केंद्र’, या फ्रेनिक आणि व्हेगस नसांना आदेश देतं. त्यामुळे श्वसनपटल अचानक आणि जोरात आकुंचन पावतं. परिणामी फुप्फुसात मोठ्या प्रमाणात हवा आत ओढली जाते. पण याच वेळी, अवघ्या ३० ते ३५ मिलिसेकंदांत, घशातल्या श्वासनलिकेवरची म्हणजे पर्यायाने स्वरयंत्रावरची झडप झटकन बंद होते. आत येणारी हवा थांबते आणि ‘हिक’ असा विशिष्ट आवाज निर्माण होतो. ही संपूर्ण प्रक्रिया इतकी झपाट्याने घडते की आपण तिला थांबवू शकत नाही.

शास्त्रज्ञांच्या मते उचकी ही ढेकर येण्याच्या मेंदूच्या संदेशाची सुधारित आवृत्ती मानली जाते. लहान बाळांमध्ये स्तनपान करताना पोटात गेलेली हवा बाहेर जाण्यासाठी ढेकर येते. त्याच स्वयंचलित क्रियेचा पुढचा टप्पा म्हणजे उचकी! म्हणूनच बाळांमध्ये उचकी लागण्याचे प्रमाण जरा जास्त असतं.

अतिजेवण, घाईघाईने खाणं, फार तिखट पदार्थ खाणं, अचानक फार थंड किंवा फार गरम पदार्थ खाणं, कार्बोनेटेड पेयं, ताणतणाव, भीती, अतिउत्साह, धूम्रपान आणि मद्यपान अशा अनेकविध कारणांमुळे, नसांमध्ये दाह निर्माण होतो आणि उचकी लागते.

काही वेळा उचकी हे एखादा गंभीर आजार दर्शवणारं लक्षणही असू शकतं. तेव्हा ठरावीक कालावधीमध्ये उचकी थांबली नाही तर डॉक्टरांकडे जाणं श्रेयस्कर!

डॉ. निलेश कोदे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org