जेव्हा काच फुटते, तेव्हा तीव्र पण मंजूळ असा ‘किणकिणाट’ होतो. काच फुटण्याच्या या विशिष्ट आवाजामागे पदार्थांचं अतिशय रंजक विज्ञान कारणीभूत असतं.

काच ही तशी ठिसूळ, म्हणजेच ती ना ताणली जात ना वाकत! जेव्हा काचेवरती कोणताही आघात होतो तेव्हा ती फुटतेच. काचेच्या पदार्थावर आघात झाला की त्या काचेत सूक्ष्म असे तडे तयार होतात. हे तडे अतिशय जलदगतीने वाढत जातात आणि संपूर्ण पदार्थात पसरतात. हे तडे पसरण्याच्या हालचालीमुळे एकदम खूप मोठी ऊर्जा बाहेर पडते. त्यातला बराचसा भाग हा ध्वनिऊर्जेचा असतो.

फुटण्याआधी काचेमध्ये ऊर्जा साठलेली असते. जेव्हा काच फुटते तेव्हा काचेमध्ये कंपनं निर्माण होतात. कोणतीही कंपनं आवाज निर्माण करतात. एका सेकंदात २० ते २० हजार कंपनं निर्माण करणारा आवाज ‘आपल्या’ म्हणजेच मानवी कानाला ऐकू येतो. एका सेकंदात २० पेक्षा कमी किंवा २० हजार कंपनांपेक्षा जास्त कंपनं होत असतील तर त्यातून निर्माण होणारा ध्वनी मानवी कानाला ऐकू येत नाही.

काच जेव्हा फुटते तेव्हा काचेच्या रचनेच्या गुणधर्मानुसार अतिशय जलद म्हणजे साधारणपणे सेकंदाला चारशे ते बाराशे कंपनं एवढी जलद कंपनं निर्माण होतात, ज्यायोगे अतिशय तीक्ष्ण पण मंजूळ असा ‘किणकिणाट’ आपल्या कानाला जाणवतो. पण त्यातही एक विलक्षण गोष्ट घडते.

काचेवर आघात झाला असता काचेच्या आत जे अतिसूक्ष्म तडे तयार होतात, ते सेकंदाला वीस हजारांपेक्षा किती तरी जास्त वेगाने कंपन पावत असतात. हा ‘हाय फ्रिक्वेन्सी’ असलेला म्हणजेच उच्च वारंवारिता असलेला नाद मानवी कानांना ऐकू येत नाही. जसजसा हा तडा वाढत आणि पसरत जातो तसतशी त्याच्या कंपनांची गती थोडी कमी होते. मग ती मानवी कानाच्या क्षमतेच्या टप्प्यात येते.

पण विशिष्ट उपकरण वापरून, काचेच्या आत तयार झालेल्या अतिसूक्ष्म तड्यांच्या नादाची नोंद करता येते, जेणेकरून काही काळातच काच फुटण्याची शक्यता आहे, अशी सावधगिरीची सूचना मिळू शकते. बँकेसारख्या काही महत्त्वाच्या ठिकाणी अशा प्रकारची ‘अलार्म’ व्यवस्था असते.

दुसरी गमतीची बाब अशी की काच फुटताना वेगवेगळ्या आकाराचे आणि घाटाचे तुकडे तयार होतात. या तुकड्यांतून निर्माण होणारी कंपनं वेगवेगळ्या गतींची असतात. त्यामुळे विविध तुकडे वेगवेगळे सूर निर्माण करतात. आणि या सर्व सुरांचा मिलाप होऊन अतिशय वेगळ्या प्रकारचा आवाज निर्माण होतो, ज्यालाच आपण ‘किणकिणाट’ म्हणतो. काचेच्या प्रकारानुसार हा ‘किणकिणाट’ थोडा वेगवेगळ्या प्रकारचा असतो.

– नीलम प्रभू

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org