हल्ली एक गोष्ट सतत आपल्या कानावर पडत असते ती म्हणजे-रक्त तपासणी! आधुनिक वैद्यकशास्त्रात चाळिशीनंतरचे लोकच नाही तर तरुण आणि लहान मुले यांनाही बर्‍याचदा रक्त तपासणी करून घ्यावी लागते. रक्त तपासण्यांचा एक त्रासदायक भाग म्हणजे बहुसंख्य रक्त तपासण्या या उपाशीपोटी केल्या जातात. रक्त तपासणीआधी साधारणत: दहा ते बारा तास माणूस उपाशी असावा अशी अपेक्षा केली जाते. ही अपेक्षा कितीही त्रासदायक वाटली तरी ती अपरिहार्य का आहे, हे कळण्यासाठी आपलं रक्त नक्की कशाचं बनलेलं असतं, ते आधी समजून घ्यावं लागेल.

आपल्या रक्तात ५५ टक्के प्लाझ्मा असतो. या प्लाझ्मामध्ये ९१ ते ९२ टक्के पाणी असतं, ७ टक्के प्रथिनं असतात आणि उरलेल्या १ टक्क्यात ग्लुकोज, फॅट्स, जीवनसत्त्वं आणि काही विकरं असे घटक असतात. प्लाझ्मा सोडून उरलेल्या ४५ टक्क्यांमध्ये पांढर्‍या पेशी, तांबड्या पेशी आणि प्लेटलेट्स असतात. यातल्या कोणत्याही घटकाचं प्रमाण थोडं जरी बदललं तरी आपण आजारी पडतो. यामुळेच रक्त तपासणी करावी लागते. ज्यावेळी आपण १० ते १२ तास उपाशी असतो त्यावेळी रक्तातल्या विविध घटकांची जी पातळी असते तिला ‘बेसलाइन’ किंवा ‘संदर्भ पातळी’ असं म्हटलं जातं.

आता समजा एखाद्या माणसाला मधुमेह झाला आहे अशी शंका आली तर त्याच्या रक्तातली साखर म्हणजेच ग्लुकोजचं प्रमाण किती आहे हे बघण्यासाठी रक्त तपासणी करण्याची गरज भासते. त्या माणसाने समजा दहा ते बारा तास उपाशी न राहता सकाळी सहा वाजता चहा आणि बिस्कीट खाल्लं आणि तो दहा वाजता रक्त तपासायला गेला तर अशा वेळी त्याने खाल्लेल्या अन्नातल्या कर्बोदकांचं विघटन होऊन त्यातून ग्लुकोज निर्माण होतं आणि ते आपल्या रक्तातल्या प्लाझ्मामध्ये शोषलं जातं.

त्यामुळे रक्तातली ग्लुकोजची पातळी वाढते. ही वाढलेली पातळीच त्या माणसाची ग्लुकोजची संदर्भ पातळी समजली जाईल आणि त्याला मधुमेह आहे असं चुकीचं निदान निघेल. हीच गोष्ट रक्तातले इतर घटक तपासतानाही होते. कोलेस्ट्रॉलसारखे घटक तपासताना तर १२ तासांहून अधिक काळ उपाशी राहावं लागतं. नाहीतर रक्त तपासणीचे निष्कर्ष चुकीचे ठरू शकतात. रक्त तपासण्या करण्याआधी साधं पाणी पिणं चालतं.

सर्व रक्त तपासण्या उपाशीपोटी कराव्या लागतात असं नाही. पण बर्‍याचदा तसं करावं लागत असल्यानं, आपल्या आजाराचं योग्य निदान व्हावं यासाठी रक्त तपासणी करून घेताना कितीही त्रास झाला तरी त्यासाठी ठरवलेल्या योग्य कालावधीत उपाशी राहून मगच रक्त तपासणी करणं हेच आपल्या फायद्याचं असतं. 

– डॉ. माधवी ठाकूर देसाई

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org