बर्‍याच जणांना असं वाटतं की पाण्याची वाफ आणि उकळणारं पाणी, या दोन्हीमुळे सारख्याच तीव्रतेची जखम व्हायला हवी. कारण दोन्हींचं तापमान तसं बघायला गेलं तर समानच म्हणजे १०० अंश सेल्सियस असतं. पण खरी गोष्ट अशी आहे की वाफ आणि उकळणारं पाणी, या दोन्हीचं तापमान जरी सारखं असलं तरीही वाफेमुळे होणारी जखम ही जास्त खोल आणि वेदनादायक असते.

जेव्हा पाणी उकळतं तेव्हा त्याची वाफ होऊ लागते. वाफ होत असताना पाणी खूप मोठ्या प्रमाणावर उष्णता शोषून घेतं. ही उष्णता पाणी धरून ठेवतं. पण ही प्रक्रिया शंभर अंश सेल्सियसलाच होते. म्हणजे तापमापकावर जरी १०० अंश सेल्सियस तापमान दिसलं तरी वाफेमध्ये साठवली गेलेली ही अतिरिक्त म्हणजे जास्तीची उष्णता ऊर्जा ‘गुप्त’ (लेटंट हिट) किंवा ‘अप्रकट’ स्वरूपात राहते.

आता जेव्हा खूप उष्णता ऊर्जा धरून ठेवलेली वाफ आपल्या त्वचेला स्पर्श करते तेव्हा काही महत्त्वाच्या गोष्टी घडतात. ही वाफ त्वचेला स्पर्श केल्याबरोबर थंड होते आणि तिचं परत पाण्यात रूपांतर होतं. वाफेचं परत पाण्यात रूपांतर होण्याच्या क्रियेला ‘संघनन’ असं म्हणतात. पाण्याच्या वाफेचं परत पाण्यात रूपांतर होत असताना, वाफ तिच्यामध्ये साठवलेली ‘संपूर्ण अप्रकट उष्णता’ ऊर्जा एकदम सोडून देते. ही सोडून दिलेली ऊर्जा आपल्या त्वचेवर पसरते. म्हणजेच आपल्या त्वचेला फक्त स्पर्श केलेल्या वाफेचीच उष्णता लागते असं नाही तर त्या वाफेमध्ये साठवलेली संपूर्ण अतिरिक्त ऊर्जाही स्पर्श करते.

याउलट जेव्हा उकळलेल्या पाण्याचा थेंब आपल्या त्वचेला स्पर्श करतो, तेव्हा तो फक्त शंभर अंश सेल्सियस एवढ्या तापमानाचाच स्पर्श घडवतो. पाण्याच्या थेंबांमध्ये अतिरिक्त साठवलेली अप्रकट ऊर्जा नसल्यामुळे वाफेने सोडून दिलेल्या ऊर्जेपेक्षा ही ऊर्जा खूप कमी असते. वाफ आणि उकळलेलं पाणी यांचं तापमान जरी सारखं असलं तरी त्यांच्यात साठवल्या गेलेल्या ‘अप्रकट’ उष्णतेचा मोठा फरक असतो.

वाफेमुळे त्वचा जास्त भाजण्याचं आणखी एक कारण आहे. ते म्हणजे वाफ चटकन पसरते. वाफ ही वायुरूपात असते. त्यामुळे सहजी तिचं वहन होतं आणि म्हणून त्वचेच्या जास्त भागावर ती चटकन पसरते. एवढंच नव्हे तर कपड्याच्या छिद्रातून आणि त्वचेच्याही छिद्रातून ती खोलवर सहजी प्रवास करू शकते. त्यामुळे जेव्हा वाफ आपल्या त्वचेला स्पर्श करते तेव्हा खोलवर खूप जास्त प्रमाणात जखम होऊ शकते. वाफेने झालेल्या जखमा या अत्यंत खोलवर आणि तीव्र असल्यामुळे त्या वेदनादायी असतात आणि त्यांची खूप काळजी घ्यावी लागते.

नीलम प्रभू

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org