जेव्हा आपण चहा कपातून बशीत ओततो, तेव्हा तो अधिक लवकर थंड होतो. हे विज्ञानातल्या ‘उष्मावहन’ या संकल्पनेचं एक महत्त्वाचं आणि सोपं उदाहरण आहे.

सर्वप्रथम आपण चहाच्या पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाचा विचार करू या. कपामध्ये चहा अधिक खोलीपर्यंत असतो आणि त्याचा हवेच्या संपर्कात असलेला पृष्ठभाग कमी असतो. आपण जेव्हा बशीमध्ये चहा ओततो तेव्हा चहा पसरतो आणि त्याचा एक पातळ थर तयार होतो. यामुळे हवेच्या संपर्कात येणारं त्याच्या पृष्ठभागाचं क्षेत्रफळ अधिक जास्त किंवा रुंद होतं. जास्त क्षेत्रफळ म्हणजेच उष्णतेला निघून जाण्यासाठी अधिक वाव! म्हणून बशीमधला चहा लवकर उष्णता सोडून देतो.

याशिवाय ‘बाष्पीभवना’ची प्रक्रिया चालूच असते. कोणताही पदार्थ थंड होणं म्हणजे त्यातली उष्णता हवेमध्ये निघून जाणं एवढंच नसतं तर काही प्रमाणात गरम द्रव पदार्थाची वाफ होत असते. बशीमध्ये चहा पसरला गेल्यामुळे चहाचे काही रेणू वाफ होऊन हवेमध्ये सरकत असतात. ही बाष्पीभवनाची क्रिया होत असताना, चहातून जलदगतीने बाहेर पडणारे रेणू त्यांच्या गतीसाठीची ऊर्जा चहातूनच घेतात. साहजिकच चहा थंड होत जातो.

हवेची हालचाल यात महत्त्वाची भूमिका बजावते. रुंद पृष्ठभागाचं क्षेत्रफळ आणि उथळ आकार असलेली बशी ही हवेच्या हालचालीला वाव देते. म्हणजे बशीमधल्या चहाच्या पृष्ठभागावरून हवा सहज वाहती होते. अशी वाहणारी हवा चहातली उष्णता सक्षमपणाने स्वत:बरोबर वाहून नेते. याउलट कपामध्ये चहाच्या पृष्ठभागावर असलेली हवा थोडीशी गरम होते, पण ती फारशी वाहती नसल्यामुळे किंवा तिथेच काही क्षण थांबत असल्यामुळे कपामधल्या चहाचा थंड होण्याचा वेग मंदावतो.

चहाची खोली कितपत आहे यावरही हे थंड होणं अवलंबून असतं. कपामध्ये चहाची खोली जास्त असल्यामुळे चहाच्या खालच्या थरांमधून प्रवास करत वरती येऊन मग हवेत निघून जाण्यासाठी उष्णतेला थोडा वेळ लागतो पण बशी उथळ असल्यामुळे बशीत ही हालचाल लवकर होऊ शकते.

थोडक्यात काय तर बशीतला चहा लवकर थंड होण्यामागे पृष्ठभागाचं अधिक क्षेत्रफळ, बाष्पीभवनाचा वेग, हवेच्या रेणूंच्या हालचालींना मिळणारा वाव आणि द्रवाची म्हणजे चहाची खोली या चार गोष्टी कारणीभूत होतात. त्यातही जर बशीत ओतलेला चहा खूपच गरम असेल आणि आपल्याला अगदीच घाई असेल तर आपण त्यावर फुंकरही घालतो. फुंकर घातल्यामुळे, पृष्ठभागावरची हवा आणि बशीतला चहा दोन्ही हलतात. त्यामुळे हवेच्या रेणूंच्या हालचालीही जलद होतात आणि चहाच्याही! या हालचाली जलद झाल्यामुळे चहा लवकर थंड होण्यास मदत होते.

नीलम प्रभू

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org