जगभर दरवर्षी ८ जून ‘जागतिक महासागर दिन’ म्हणून साजरा करतात. आपण व आपल्या पुढच्या पिढय़ा, जगाव्यात म्हणून महासागर आरोग्यपूर्ण असलेच पाहिजेत. का, कसे, याची आताच निकड काय हे स्वत: जाणून घेऊन, इतरांनाही समजावून सांगितले पाहिजे.
संयुक्त राष्ट्रसंघाने १९९२च्या रिओ-डी-जेनेरोतील ‘वसुंधरा परिषदेत’ मानवजातीच्या कल्याणासाठी काही उद्दिष्टे मांडली. शाश्वत विकासाची १७ उद्दिष्टे २०० देशांनी स्वीकारली. चौदावे उद्दिष्ट ‘पाण्याखालील जीवन- लाइफ बिलो वॉटर’ तर पंधरावे ‘जमिनीवरचे जीवन- लाइफ ऑन लँड’ आहे. हा नैसर्गिक क्रम योग्यच आहे. आपले पूर्वज आदिजीव समुद्रजलात निर्माण झाले. आपला रक्तद्रव आणि सागरी जल यामध्ये बरेच साम्य आहे. पाण्यातील जीव दलदलीत आणि नंतर जमिनीवर आले. मूळच्या जलीय जीवांनी




जमीन जिंकली. सर्व सजीवांना आपले माहेर समुद्र होते याची आठवण करून देण्याची वेळ आली आहे.
२०२३ साठी संयुक्त राष्ट्रसंघाने चौदाव्या उद्दिष्टाशी सुसंगत संकल्पना-सूत्र- ‘एकत्र काम करू, समुद्राला नवजीवन देऊ’ दिले आहे. हे कोरडे तत्त्वज्ञान नाही, तर जाणीव-जागृतीतून तत्काळ मोठय़ा प्रमाणात सर्व समाजासाठी कृती-निमंत्रण आहे. पृथ्वीवरील जमिनीच्या क्षेत्रफळाच्या दुपटीहून जास्त क्षेत्र व्यापणाऱ्या महासागरांतील हिरवे समुद्री जिवाणू, शैवाले आपल्याला लागणारा ५० टक्के ऑक्सिजन पुरवतात. जगातील ३० टक्के कार्बन-डायऑक्साइड शोषून महासागर तापमानवाढ रोखतात. महासागरांतील जिवाणू-विषाणूंमुळे कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरससारख्या मूलद्रव्यांची भूजलचक्रे अव्याहतपणे चालतात. त्याबदल्यात आपण समुद्राला काय देतो तर स्वार्थाने, अजाणतेपणे, लाखो किलोग्रॅम घातक रासायनिक प्रदूषके, मैला जो कालांतराने कुजतो पण ज्यात कॉलरासारख्या रोगाचे जिवाणू असतात. आपण समुद्रात प्लास्टिक, थर्मोकोलचा कचरा फेकतो जो २०० ते ७०० वर्षेदेखील विघटनाशिवाय राहू शकतो. प्रशांत महासागरातील ‘मारियाना ट्रेन्च’ या जगातील सर्वात खोल दरीत गेल्या चार वर्षांत प्लास्टिक पिशव्या, गोळय़ांची वेष्टने सापडली आहेत. ती कुजायला किती तरी शतके लागतील. समुद्र वाचविणे कठीण आहे, पण अशक्य नाही! आपल्यापैकी प्रत्येकाने त्यासाठी छोटेसे एक तरी काम करावे, इतरांना सांगावे.
– नारायण वाडदेकर
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org