scorecardresearch

कुतूहल : जागतिक पाणी दिवस

भूगर्भातील पाणी अदृश्य आहे पण त्याचे परिणाम आपणास सर्वत्र दृश्य स्वरूपात पाहावयास मिळतात.

२२ मार्च हा प्रतिवर्षी जागतिक पाणी दिवस म्हणून युनोच्या माध्यमामधून जगभरात साजरा होतो. याचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे पिण्यास योग्य असलेल्या ताज्या स्वच्छ  पाण्याचे महत्त्व प्रत्येकास समजावे. २२ मार्च हा जागतिक पाणी दिवस असावा हा ठराव डिंसेबर १९९२च्या संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरणविषयक परिषदेत ‘रिओ द जानेरो’ या शहरात मांडला गेला, नंतर युनोच्या अधिवेशनात तो सर्व संमतीने मान्य करण्यात आला आणि १९९३ पासून अमलातसुद्धा आला. आपल्या पृथ्वीवर ९७ टक्के पाणी महासागरात साठलेले आहे. उरलेले तीन टक्के पाणी ताज्या रूपात असते त्यातील २ टक्के बर्फाच्या रूपात आहे आणि उरलेले १ टक्का पाणी भूगर्भात, ओल्या जमिनीत, वाहत्या नद्या, तलाव, विहिरी, धरणे यामध्ये उपलब्ध असते आणि यावरच आपले सर्व जीवन अवलंबून आहे. या ताज्या पाण्याचा सन्मान करावा, त्याचे प्रदूषण करू नये, प्रत्येक थेंब जपून वापरावा, पाण्याचा अपव्यय टाळावा हे समजावताना त्याचे समाजाच्या सर्व पातळीवर योग्य प्रबोधन आणि शिक्षण देऊन स्वच्छ पाण्याचे संवर्धन आणि संरक्षण कसे आवश्यक आहे यासाठी हा दिन साजरा होतो. प्रतिवर्षी २२ मार्चला त्या वर्षांचे पाण्याच्या संबंधामधील घोषवाक्य संयुक्त राष्ट्रातर्फे जाहीर होते. २०२० मधील घोषवाक्य होते ‘‘पाणी आणि वातावरण बदल’’ तर २०२१ ला ‘‘स्वच्छ पाण्याची किंमत’’ या घोषवाक्यावर जगभरामध्ये काम झाले. यावर्षी जागतिक पाणी दिवसाचे घोषवाक्य आहे ‘‘भूगर्भामधील पाणी: अदृश्य ते दृश्य’’. भूगर्भात हजारो वर्षांपासून साठलेले पाणी अतिशय मौल्यवान आहे, पण याच पाण्याचा अनावश्यक उपसा करून आपण त्यास कवडीमोल करत आहोत एवढेच नव्हे तर भविष्यामधील पिण्याच्या पाणी संकटास सामोरे जात आहोत. यावर्षी भूगर्भामधील पाण्याबद्दल जास्त जागृती या जागतिक पाणी दिवसापासून जगभर होणार आहे. भूगर्भातील पाणी अदृश्य आहे पण त्याचे परिणाम आपणास सर्वत्र दृश्य स्वरूपात पाहावयास मिळतात. वातावरण बदलाचे परिणाम जसजसे गंभीर होतील त्या प्रमाणात भूगर्भामधील पाण्याची परिस्थितीसुद्धा चिंताजनक होईल, म्हणून तर त्यास जपण्यासाठी आपण सर्वानी एकत्र येणे गरजेचे आहे.

आफ्रिकेमधील कोटय़वधी जनता भूगर्भामधील थेंब थेंब पाण्यासाठी आज झगडत आहे. तेथील लहान मुलांचे अशुद्ध पाण्यामुळे अकाली मृत्यू होतात याचेसुद्धा भान या दिवशी आपण सर्वानी ठेवणे गरजेचे आहे.

– डॉ. नागेश टेकाळे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta kutuhal world water day zws