– सुनील सुळे

दरवर्षी १४ किंवा कधी कधी १५ जानेवारीला येणारा सण म्हणजे मकरसंक्रांत. महाराष्ट्रात जो दिवस ’मकरसंक्रांत’ म्हणून साजरा केला जातो, तोच इतर राज्यांमध्ये लोहडी, पोंगल, बिहू, खिचडी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. हिंदू सणांमध्ये हा एकच असा सण आहे की ज्याची तारीख इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे ठरते.

इंग्रजी म्हणजे ग्रेगोरियन कॅलेंडर हे सूर्याच्या हालचालींवर आधारित आहे. हिंदू आणि इतर काही धर्मांनी स्वीकारलेली कॅलेंडर्स किंवा पंचांगं ही चंद्राधारित असतात. सूर्य पृथ्वीपासून सुमारे पंधरा कोटी किलोमीटर दूर आहे, चंद्र त्या मानाने अगदी जवळ म्हणजे सुमारे पावणेचार लाख किलोमीटर अंतरावर आहे. सूर्य दूर असल्यामुळे सूर्याची आकाशातली मार्गक्रमणा जास्त नियमित आहे. उदाहरणार्थ, रोज जेव्हा स्थानिक वेळेनुसार दुपारचे १२ वाजतात तेव्हा जगातल्या कोणत्याही ठिकाणी सूर्य स्थानिक रेखांशरेषेवर, उत्तर-दक्षिण दिशेला येतो. चंद्राच्या बाबतीत मात्र उदय, अस्त आणि स्थानिक रेखांशरेषेवर येण्याच्या वेळा रोज बदलत असतात. या दोन आकाशस्थ गोलांच्या मार्गक्रमणेतल्या या फरकामुळे हिंदू सण इंग्लिश कॅलेंडरप्रमाणे वेगवेगळ्या महिन्यात येतात. उदा. होळी फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये, गणेशोत्सव ऑगस्ट किंवा सप्टेंबर आणि दिवाळी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये येते.

मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्याच्या उत्तरायणाला सुरुवात होते असं मानलं आहे. आजमितीस ते तितकंसं बरोबर नाही. सूर्याचं उत्तरायण आणि दक्षिणायन, हे सूर्याचं स्थान अवकाशीय विषुववृत्ताच्या उत्तरेला आहे की दक्षिणेला यावर ठरतं. सूर्याच्या अवकाशीय विषुववृत्तापासूनच्या कोनीय अंतराला ‘स्पष्टक्रांती’ किंवा ‘क्रांती’ म्हणतात. हे अंतर ज्या दिवशी सर्वात जास्त दक्षिणेपर्यंत म्हणजे सुमारे २३.५ अंश जाऊन सूर्याचा प्रवास पुन्हा उत्तरेकडे सुरू होतो त्या दिवसाला ‘उत्तरायण दिन’ म्हणतात. सामान्यत: २१ डिसेंबर किंवा काही वर्षी २२ डिसेंबर रोजी हा ‘अयन दिन’ येतो.

सुमारे सतराशे वर्षांपूर्वी उत्तरायणदिनीच सूर्य मकर राशीत प्रवेश करीत असे. त्यामुळे मकरसंक्रमण आणि उत्तरायण एकाच वेळी घडत असे. तेव्हापासून मकरसंक्रमणाला उत्तरायणाची सुरुवात होते हे मानण्याचा प्रघात पडला. पण या अयनबिंदूंचं आकाशातलं स्थान हळूहळू बदलत आहे. याचं कारण पृथ्वीचा अक्ष फिरणार्‍या भोवर्‍यासारखा हळूहळू आकाशातल्या एका निश्चित बिंदूभोवती फिरतो आहे. अशी एक प्रदक्षिणा सुमारे २६,५०० वर्षांमध्ये पूर्ण होते. यामुळे उत्तरायण दिन आणि मकरसंक्रमण या दोन घटनांमध्ये हिंदू पंचांग रूढ झाल्यापासूनच्या काळात सुमारे २४ दिवसांची फारकत झाली आहे. म्हणूनच २१ डिसेंबरपासून २४ दिवसांनी म्हणजे १४ जानेवारीला मकरसंक्रांत येते. २६,५०० वर्षांनंतर मात्र ती फारकत पुन्हा शून्यावर येईल.

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org