नवदेशांचा उदयास्त : युक्रेनमधील मानवनिर्मित महादुष्काळ

जोसेफ स्टालिन रशियातल्या कम्युनिस्ट पक्षाचा सर्वोच्च नेता बनला आणि सोव्हिएत युनियनमधील इतर देशांप्रमाणे युक्रेनमधील सरकारची कार्यप्रणाली बदलली.

३० डिसेंबर १९२२ रोजी कम्युनिस्ट रशियाच्या नेतृत्वाखाली सोव्हिएत युनियन स्थापन झाले, यात युक्रेनी नेत्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. डिसेंबर १९२२ मध्ये युक्रेनियन सोव्हिएत साम्यवादी प्रजासत्ताक सरकार तिथे स्थापन झाले ते पुढे १९९१ साली सोव्हिएत युनियनचे विघटन होईपर्यंत टिकले. युक्रेनमधील कम्युनिस्ट सोव्हिएत सरकारने सुरुवातीला लोकांच्या वैद्यकीय सुविधा, गृहनिर्माण, रोजगार यात भरीव सुधारणा तर केल्याच परंतु त्याशिवाय युक्रेनियन संस्कृती जोपासण्यासाठीही प्रयत्न केले. परंतु पुढे १९३० मध्ये जोसेफ स्टालिन रशियातल्या कम्युनिस्ट पक्षाचा सर्वोच्च नेता बनला आणि सोव्हिएत युनियनमधील इतर देशांप्रमाणे युक्रेनमधील सरकारची कार्यप्रणाली बदलली.

स्टालिनने युक्रेनमधील औद्योगिकीकरण वेगाने वाढविले, परंतु त्याने पहिल्या पंचवार्षिक योजनेत शेतीचे सामूहिकीकरण लादल्यामुळे शेतकऱ्यांना मोठय़ा हलाखीच्या परिस्थितीला सामोरे जावे लागले. सामायिक शेतीचे तोटे लक्षात आल्यावर त्याला विरोध होऊ लागला. स्टालिनने हा विरोध दडपण्यासाठी त्यांच्यामागे गुप्त पोलिसांचा ससेमिरा लावला. त्याने सामायिक शेतीच्या सदस्यांना धान्योत्पादनाचे लक्ष्य अवाजवी प्रमाणात नेमून दिले. जे शेतकरी ते पुरे करणार नाहीत, त्यांना त्या शेतातला धान्याचा एकही दाणा मिळणार नाही असा कायदा केला. त्यामुळे बहुतांश युक्रेनी शेतकऱ्यांवर अतोनात कष्ट करून उपासमारीची वेळ आली. अशा शेतकऱ्यांवर दुसऱ्या कुठूनही खाद्यपदार्थ आणण्यावर बंदी घालून सैनिकांकरवी घरात शिल्लक असलेले धान्यही जप्त केले गेले. या उपासमारीमुळे १९३२, १९३३ या वर्षांमध्ये साधारणत: ७० लाख ते एक कोटी युक्रेनी शेतकरी मृत्यू पावले. हा अहवाल संयुक्त राष्ट्रांनी पुढे २००३ साली प्रसिद्ध केला. युक्रेनमधील या प्रचंड मोठय़ा नरसंहाराला युरोपात ‘होलोडोमर’ (उपासमार करून ठार मारणे) म्हणतात. बरेच लोक याला ‘मानवनिर्मित महादुष्काळ’ असेही म्हणतात. २०१० मध्ये कीव्ह येथील न्यायालयात, स्टालिनच्या मृत्युपश्चात या प्रकरणाची चौकशी होऊन त्यात स्टालिन आणि त्याच्या सहकाऱ्यांना दोषी सिद्ध करण्यात आले. ‘होलोडोमर’च्या स्मृत्यर्थ उपाशी शेतकरी मुलीचे हे शिल्प कीव्ह शहरात २००८ पासून उभे आहे – सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Man made famine in ukraine akp