फळे व भाजीपाल्याच्या काढणीनंतरच्या व्यवस्थापनामध्ये प्रतवारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. काढणीनंतर किडलेली, रोगट, दबलेली, फुटलेली, खरचटलेली, तडा गेलेली फळे व भाजीपाला वेगळा करावा. त्यानंतर त्यांचे वजन, रंग व आकारमानानुसार प्रतवारी करावी. प्रतवारी केल्यानंतर फळे व भाज्यांचे पॅकिंग करणे सोयीचे होते. एकसारख्या आकारमानामुळे पॅकिंग उघडल्यानंतर फळे व भाज्या आकर्षक दिसतात. त्यांना चांगला बाजारभाव मिळतो. अशा मालावर प्रक्रिया करताना संयंत्राचा वापर जास्त क्षमतेने करता येतो.
फळांचा ताजेपणा टिकवण्यासाठी कीटकनाशके, बुरशीनाशके, प्रतिजैविके, पॅकिंगमधील शोषके, संप्रेरके, मेण, बाष्परोधके इत्यादी रसायनांचा वापर करतात. त्यामुळे आपोआपच फळांची साठवण क्षमता वाढते.
काढणीनंतर पॅकिंगमुळे वाहतूक, साठवण, विक्री व्यवस्थेदरम्यान होणारी इजा टाळली जाते. फळांचा रोगजंतूंशी येणारा संपर्क टाळला जातो. आकर्षक पॅकिंगमुळे ग्राहक मालाकडे आकर्षति होतो. पॅकिंगसाठी लाकडी खोकी, बांबूच्या टोपल्या, कोरुगेटेड पेटय़ा, प्लॅस्टिकच्या पिशव्या, पुनेटस्, पी.एस.ट्रेज, िश्रकरॅिपग इत्यादींचा वापर केला जातो. पॅकिंग मजबूत, रसायनविरहीत, शीतगृहात साठवण्यायोग्य, सुरक्षित, पुनर्वापर करण्यायोग्य असावे.
काढणीच्या वेळी फळांतील उष्णता त्यांच्या गरजेनुसार ठरावीक तापमानाला आणि आद्र्रतेला काढून घ्यावी लागते. या पूर्वशीतकरणास विलंब झाल्यास फळांच्या साठवणुकीवर व प्रतिवर अनिष्ट परिणाम होतो. पूर्वशीतकरणामध्ये फळे व भाजीपाल्याच्या श्वसनाचा वेग कमी करतात. त्यामुळे फळे पिकण्याची क्रिया मंद होते. त्यांचे आयुष्य वाढते. त्यांची थंड तापमानाला साठवण करणे सुलभ होते. पूर्वशीतकरणासाठी थंड हवेचा झोत, हायड्रोकूलिंग, व्हॅक्यूमकूलिंग, आईसकूलिंग इत्यादी पद्धती वापरतात.
काढणीनंतर त्वरित प्रतवारी व पॅकिंग करून  फळांची वाहतूक केली पाहिजे. फळे व भाजीपाल्याचे आयुष्य वाढवण्यासाठी तात्पुरते शेड उभारून  तेथे फळे साठवावीत. सामान्यपणे २० अंश सेल्सियस तापमान असेल तर फळे नासण्याचे प्रमाण कमी होते. किडलेली, रोगट, खरचटलेली व खराब झालेली फळे चांगल्या फळांपासून वेगळी करावीत. साठवणीच्या ठिकाणी स्वच्छता राखावी.
– डॉ. विष्णू गरंडे (कोल्हापूर) मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

जे देखे रवी..   –  पुन्हा एकदा श्रीकृष्ण
मागे मे महिन्यात श्रीकृष्ण आणि स्त्रिया ह्य़ा विषयावर लिहिले तेव्हा तिखट प्रतिक्रिया उमटली होती. महाभारतातल्या स्त्रियांबद्दल लिहिले तेव्हाही असेच झाले. दोन्ही वेळा मी माफीवजा प्रतिवाद केला. श्रीकृष्णाचे एक बहारदार वर्णन ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात अनाहूतपणे गीतेमधल्या श्लोकाला सोडून ज्ञानेश्वर ओवीद्वारे सांगतात.
आइका, यश श्री औदार्य। ज्ञान वैराग्य ऐश्वर्य।
हे साही गुणवर्य। वसती जेथ।।
म्हणोनि तो भगवंतु। तो नि:संगाचा सांगातु।
तो म्हणे पार्था दत्तचित्तू। होई आता।
जो यश, श्री. औदार्य, ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्याने संपन्न आहे त्याला भगवंत म्हणतात. जो सगळ्या गोष्टीचा त्याग केलेल्याचा मित्र आहे तो श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना नीट लक्ष दे. यश = कीर्तिवान गौरवशाली प्रख्यात, श्री = धनवान, भरभराटीला आलेला. औदार्य =  उदार, ज्ञान = विश्वाचे गमक समजलेला, वैराग्य सगळ्यात राबत असून तटस्थ झालेला अशा तऱ्हेने खऱ्या ऐश्वर्याचा मालक म्हणजे श्रीकृष्ण. यातील पहिल्या दोन पायऱ्याही महत्त्वाच्या.
 ऐहिक लौकिक आयुष्यात हा आपले नाव करून आहे. हा भोगतो किंवा ह्य़ाचे भोगून झाले आहे. कर्तबगारी, सत्ता, अधिकार, व्यवहार ह्य़ा गोष्टींचे वावडे नसलेला हा आहे. पण ह्य़ातून अभिमान किंवा गर्व झालेला नाही तर ह्य़ा अनुभवातून हा अंत:करणानेच नव्हे तर लौकिक व्यवहारात उदार आहे. हा लोकांना समजून घेऊ शकतो. ‘जे जे भेट भूत ते ते मानिजे भगवंत’ अशी ओवी सांगणारा हा निराळा अवलिया आहे. ह्य़ातूनच तो ज्ञानी झाला आहे. स्वार्थ आणि द्वेष, मत्सर, लोभ ह्य़ा गोष्टी त्याला दिसतात एवढेच नव्हे तर त्या त्याने अनुभवल्या आहेत आणि त्या अनुभवताना त्यातून तो बाहेर पडला आहे, पडतो आहे. इतरांना तोच प्रयत्न करायला सांगतो आहे म्हणून तो ज्ञानाने मढला आहे. ज्ञानी आहे आणि हे सगळे कोळून प्यायलेला हा म्हणूनच खऱ्या अर्थाने ऐश्वर्यवान आहे असे ज्ञानेश्वर म्हणतात. नीटशे नावच जर्मन तत्त्ववेत्याने स्वत:च्या भावना आणि उर्मीवर काबू ठेऊन जो बुद्धीच्या जोरावर त्याच उर्मीच्या आधारे काहीतरी घडवतो त्याला Overman  म्हटले होते. त्याचे आपल्या परंपरेतले उदाहरण म्हणजे श्रीकृष्ण. सहाव्याची ज्ञानेश्वरांची प्रस्तावना अभूतपूर्व आहे. इथेच ते माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृतातेही पैजासी जिंके। अशी प्रतिज्ञा करतात आणि पुढे श्रीकृष्ण आणि अर्जुन हे द्वैत किंवा ही दोन माणसे जर ब्रह्ममय असूनही ब्रह्मविद्येबद्दल बोलणार असतील तर मग त्यांच्यामधले संभाषण हा एक तलम प्रेमाचा पडदा आहे अशी कल्पना मांडतात. एखादा माणूस श्रीकृष्णासारखा असूनही स्वत: भक्त होऊ शकतो का? त्या प्रश्नाच्या उत्तराची गोष्ट उद्या.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस   –  औषधांची अ‍ॅलर्जी, कल्चर टेस्ट : आयुर्वेदीय विचार
‘वैद्यबुवा, तुम्ही मला स्ट्राँग औषध देऊ नका. मला कोणताही गुग्गुळकल्प चालत नाही. उष्ण औषध नको. आरोग्यवर्धिनी घेतली की मला संडासला पळायला लागते, ३०-४० मनुका? अबब! जुलाब नाही का होणार? ज्वारी मला अजिबात चालत नाही, आले-सुंठ मला नको, ते गरम पडते, गरम पाणी पिण्याने माझे तोंड येते, काढे खूप स्ट्राँग असतात. त्यापेक्षा एखादे चूर्ण द्या ना!’ अशी गमतीदार चर्चा वैद्यांच्या दवाखान्यात सकाळ-संध्याकाळ रंगत असते. जाणकार, अनुभवी वैद्य रुग्णहिताकरिता योग्य ते औषध, पथ्यपाणी सुचवत असतो. काही ज्ञानी रुग्ण मंडळी आयुर्वेदात कल्चर टेस्ट नाही का? असे प्रश्न विचारून रास्त शंका, संबंधित औषधांबद्दल घेत असतात.
आधुनिक वैद्यकशास्त्राप्रमाणे  प्रयोगशाळेत औषधांच्या कल्चर टेस्ट केल्या जातात,  त्यानंतरच औषधे रुग्णाला लागू पडतात की नाही याबद्दल निष्कर्ष काढला जातो. अशीच औषधे द्यावी-घ्यावी असे डॉक्टर व रुग्णाला ज्ञान होते. माझ्या दीर्घकाळच्या वैद्यकीय व्यवसायात ‘रुग्णांचे कल्चर टेस्ट रिपोर्ट चार-आठ दिवसांत बदलतात; मग रुग्णाने काय करावे’ अशी विचारणा होते.
इथे रुग्णाची शंका अशी असते की, तुमच्या आयुर्वेदीय औषधात शाश्वत गुण आहेत का? तुमच्या औषधांची कल्चर अ‍ॅलर्जी टेस्ट घेता येते का? विचारी रुग्णांच्या अशा शंका रास्त असतात. त्याला थोडक्यात नेमके उत्तर पुढीलप्रमाणे :
कोणतेही द्रव्य, मग ते औषध असो आहारद्रव्य असो; त्याचे गुण शाश्वत असतात. ते गुण त्या द्रव्याची पांचभौतिक जडणघडण, त्या द्रव्यांचे मधूर, अम्ल, लवण, तिक्त, कटू, कषाय या सहा रसांवर अवलंबून असतात. ते जगाच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंत शाश्वत आहेत, शाश्वत राहणार! बदलते ते आसपासचे हवामान; तुमची आमची राहणी, खाण्या-पिण्याच्या, नोकरीच्या, झोपेच्या वेळा, अनाकलनीय मन! रुग्णमित्रांनो, तुमच्या वैद्य डॉक्टर मंडळींनी ‘पथ्याबाबत दिलेला सल्ला’ हा मात्र शाश्वत असतो.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत   –  १० डिसेंबर
१८८०> लेखक, प्राच्यविद्या संशोधक डॉ. श्रीपाद कृष्ण बेलवलकर यांचा जन्म. गीता व अभिज्ञान शांकुतल या ग्रंथासह महाभारतातील भीष्मपर्व व शांतिपर्व याचे संपादन त्यांनी केले.
१९३८> कथाकार सखा कलाल यांचा जन्म. ढग, सांज, पार्टी आदी कथासंग्रह प्रसिद्ध.
१९५५> गांधीवादाचे भाष्यकार व लोकशक्ती (वृत्तपत्र) आणि साधना साप्ताहिकाचे माजी संपादक शंकर दत्तात्रय जावडेकर यांचे निधन. लोकशाही, समाजवाद, अर्थशास्त्र आदी विषयांवर त्यांची ११ पुस्तके प्रसिद्ध झाली होती.
१९६४> सूचिकार शंकर गणेश दाते यांचे निधन. लोककथा (दोन खंड) व स्वत: २३ हजार ग्रंथ चाळून मराठी ग्रंथसूचीचे दोन खंड त्यांनी प्रसिद्ध केले. राष्ट्रीय ग्रंथसूचीतील मराठी विभागाची जबाबदारी त्यांनीच पार पाडली. मराठी नियतकालिक सूची मात्र त्यांच्या अकाली निधनाने अपूर्ण राहिली.
२००९ > संत तुकारामांना इंग्रजीत नेणारे कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचे निधन. ५ काव्यसंग्रह, दोन नाटके, चाव्या, शतकांचा संधिकाल असे महत्त्वाचे लेखसंग्रह, आदी पुस्तके आणि गोदाम हा दृश्यपट त्यांच्या नावावर आहे. उत्तरायुष्यात चित्रकार म्हणूनही त्यांची ओळख होती.
– संजय वझरेकर