भारतात ईस्ट इंडिया कंपनीची राजवट होती तेव्हा खडकांच्या अभ्यासाची आवड असणारे, आणि त्यासाठी भटकंती करणारे, कॅप्टन डेंजरफील्ड नावाचे एक इंग्रज लष्करी अधिकारी होते. मध्य भारतातील धार संस्थानात बाघ नावाच्या गावाच्या अवतीभवती भ्रमंती करत असताना त्यांना काही आगळय़ावेगळय़ा गोष्टी आढळल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाघपासून जवळच वालुकाश्माचे (सँडस्टोनचे) डोंगर असून त्यात काही गुंफा आहेत, असे कॅप्टन डेंजरफील्ड यांच्या निदर्शनास आले. गुंफांमधे काही मूर्ती कोरलेल्या होत्या; तसेच गुंफांच्या भितींवर पुराणकथांवर आधारित चित्रे होती. त्या गुंफांना ‘पाँच पांडू गुफाएँ’ म्हणतात अशी माहिती आजूबाजूच्या रहिवाशांनी डेंजरफील्ड यांना दिली. त्या वालुकाश्मांच्या प्रस्तरांवर चुनखडकांचे (लाइमस्टोन) प्रस्तरही होते. विशेष म्हणजे चुनखडकांच्या प्रस्तरांमध्ये जीवाश्म होते. या साऱ्या निरीक्षणांवर आधारित त्यांचा लेख १८१८ मध्ये ‘ट्रान्झॅक्शन्स ऑफ द लिटररी सोसायटी ऑफ बॉम्बे’ या नियतकालिकात छापून आला.

त्यानंतर पर्यटनाची आवड असणारे एक इंग्रज नागरिक जेम्स फ्रेसर यांनी दिल्ली ते मुंबई असा प्रवास केला. प्रवासात कुठे कुठे कोणते कोणते खडक आढळले त्या खडकांची वर्णने त्यांनी लिहून काढली. ते त्यांचे लेखन लंडनच्या एका नियतकालिकात शोधनिबंधाच्या स्वरूपात १८२२ मध्ये छापून आले. त्या शोधनिबंधात त्यांनी इंदूरच्या र्नैऋत्येला ८० किलोमीटरवर असणाऱ्या मांडवगडातील ऐतिहासिक इमारतींचे बांधकाम एका विशिष्ट चुनखडकाने केल्याचे म्हटले आहे. पण मांडवगडाच्या जवळपास चुनखडक मिळत नाही, तेव्हा गडावरच्या बांधकामांसाठी चुनखडक कुठून आणला, याची माहिती मिळाली नाही असेही फ्रेसर यांनी नमूद केले आहे.

या कहाणीचे पुढचे प्रकरण १८५४ मध्ये घडले. तेव्हा डॉ. कार्टर नावाचे गृहस्थ मुंबईचे सिव्हिल सर्जन होते. पेशाने डॉक्टर असलेल्या डॉ कार्टर यांचा प्रस्तरविज्ञानाचाही व्यासंग होता. १८५४ मध्ये भारतातील पाषाणसमूहांवरील त्यांचे एक माहितीपूर्ण पुस्तक प्रकाशित झाले. भारताच्या द्वीपकल्पातील खडकांविषयी तोपर्यंत उजेडात आलेली समग्र माहिती त्यांनी त्या पुस्तकात संकलित केली होती.

या पुस्तकात डॉ. कार्टर यांनी धार जिल्ह्यातील खडकांसंबंधी ऊहापोह केला आहे. डेंजरफील्ड यांना बाघ लेण्यांच्या वालुकाश्माच्या वर आणि मान नदीच्या खोऱ्यात सापडलेला चुनखडकच फ्रेसर यांनी पाहिलेल्या मांडवगडावरच्या ऐतिहासिक इमारतीच्या बांधकामासाठी वापरला होता, हे त्यांनी स्पष्ट केले. अशा रीतीने १८२२ मध्ये फ्रेसर यांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर १८५४ मध्ये मिळाले. निसर्ग आणि विज्ञान यांचा हा अनोखा संगमच म्हणावा लागेल.- डॉ. कांतिमती कुलकर्णी मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : : http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mandavgad reign of the east india company in india captain dangerfield english military officers amy
First published on: 05-07-2022 at 00:01 IST