सकाळची न्याहारी मी आणि बोकी एकत्रच घेतो. तिचा ब्रेकफास्ट झालेला असतो. ती मला कंपनी देण्यासाठी उन्हाच्या कवडशात खिडकीत बसते. तिची सकाळची आंघोळ करत. उजव्या पायानं नि जिभेनं ती शक्य तितकं अंग चाटूनपुसून साफ करते. उन्हाकडे डोळे किलकिले करून बघते आणि मग बसून डुलकी घेते. माझ्याकडे तिचं लक्ष असतं, कारण मी उठलो की ती टुणकन उडी मारून माझ्या पायाशी येते, जरा पायात लुडबुडते, अंग घासते नि पुन्हा झोपायला उन्हात जाते.
तिचा हा दिनक्रम छकुली आणि बकुली अशा दोन पिलांना जन्म दिल्यावर बदलला. भूकही वाढली आणि अर्थात माझ्यापेक्षा पिलांकडे लक्ष द्यायला लागली. तिच्या चेहऱ्यावर आणि आविर्भावात पोक्तपणा दिसायला लागला. तरी माझ्या न्याहारीच्या वेळी ती आसपास घुटमळत असे.
पण गेले चार-पाच दिवस तिचा हा नेमदेखील चुकला. मला चुकल्याचुकल्यासारखं वाटलं. तिला हाक मारली तरी येईना. मग जरा शोध घेतल्यावर पाहिलं तर तिघीजणी अंगणात खेळत होत्या. छकुली नि बकुली दोघींना नुकताच धावपळीचा शोध लागल्यानं, त्यांची मस्ती चालू होती. तशी बोकी आपली करडी नजर ठेवून होती. इतक्यात ती त्यांच्या खेळात सामील झाली. एकमेकांशी कुस्ती, मारामारी, चावल्याचा आविर्भाव करीत जमिनीवर मस्त लोळंपट्टी चालू होती.
खेळता खेळता, बोकीचा पवित्रा एकदम बदलला. ती एके जागी स्थिर झाली. नजर रोखलेली होती, कान तीक्ष्णपणे उभे होते. शेपटी ताठ होती. तिचं टोक किंचित हलत होतं. पाच-दहा क्षण अशा रीतीने स्थिर राहून तिने अचानक समोर हल्ला केला. तो अचूकपणे एका काळपटलेल्या कागदाच्या बोळ्यावर होता. त्या गोष्टीशी ती थोडा वेळ झगडली आणि बाजूला जाऊन बसली. छकुली नि बकुली यांच्याकडे तिने इशारा केला.
आधी छकुली नि मग बकुलीने त्याच बोळ्यावर तसाच हल्ला केला. अर्थात दोघींचं टार्गेट चुकलं. त्यांच्या हालचालीत सफाई नव्हती, फक्त खेळकरपणा होता.
बोकीनं पुन्हा त्यांच्याकडे पाहिलं आणि तशीच अधीर पण स्थिर पोज घेऊन त्यांच्यावरच हल्ला केला. दोघीजणी जरा बावरल्याच.
मग पुन्हा तोच खेळ सुरू. हल्ला करण्याचा. मलाही छंद लागला, त्यांची ही मस्ती आणि खेळाचा तास बघण्याचा.
घरी आल्यावर तिघी खाण्यावर तुटून पडल्या.
बोकीला म्हटलं, ‘अगं तू छकुली नि बकुलीला उंदीर पकडायचे धडे शिकवत होतीस तर म्याव, म्यावच्या भाषेत थोडं समजवायला पाहिजे होतंस ना!
‘हंऽऽ! असं म्हणून बोकीनं तुच्छतापूर्वक माझ्याकडे पाहिलं. संस्कारांच्या नावाने बडबड करण्याची आमच्यात रीत नाही. संस्कार संस्कार म्हणून तुम्ही किती कल्ला करता. प्रत्यक्षात तसे वागता की नाही, मला नाही ठाऊक. हे बघ, पिलांना संस्काराची भाषणं ठोकण्यापेक्षा, ‘आम्ही प्रत्यक्ष योग्य तसं वागतो. छकुली नि बकुली माझ्या चलाख वागण्यावरून धडे गिरवतात! मी बोलते त्यापेक्षा प्रत्यक्ष कशी सचोटीनं जगते.. त्यावरून संस्कार.. चला गं छकुली, बकुली या माझ्या कुशीत.. हं. इथे उन्हात, देऊ ताणून, दमलात ना!
कुतूहल: वंगणतेलातील रासायनिक पूरके  
विज्ञानाच्या प्रगतीसोबतच वाहनांच्या तसेच उद्योग-धंद्यातील यंत्रभागांची क्लिष्टता वाढत गेली. या अत्याधुनिक यंत्रांना नवनव्या प्रकारच्या वंगणतेलांची गरज भासू लागली. खनिज तेलाच्या निर्वात ऊध्र्वपातनाने (व्हॅक्युम डिस्टिलेशन) मिळणाऱ्या जाडसर तेलापासून (बेस ऑइल्स) ही गरज प्रारंभी भागवली जात असे. हळूहळू त्यात रासायनिक पूरके वापरली जाऊ लागली. वंगणतेलात वापरल्या जाणाऱ्या या रासायनिक पूरकांची मुख्य काय्रे यंत्रभागातील घर्षण कमी करणे, यंत्रभागात निर्माण होणारी उष्णता शोषणे, केरकचरा व मळीची विल्हेवाट लावणे, वंगणाला थंड तापमानाला गोठू न देणे अशा प्रकारची असतात. व्हिस्कोसिटी इंडेक्स इम्प्रूव्हर (व्ही.आय.आय.) ही रसायने लांबलचक रेणूंनी बनलेली असतात. पॉलिमिथाईल अक्रिलेट, ऑलिफीन कोपोलिमर, स्टिरीनची संयुगे हे त्यांचे रासायनिक स्वरूप होय. तापमान वाढले असताना हे रेणू फुगतात व तेलाचा जाडसरपणा टिकवून ठेवतात.
पोअर पॉइंट डिप्रेसंट (पी.पी.डी.) हीदेखील पॉलिमिथाईल अक्रिलेट, ऑलिफीन कोपोलिमर्स या रसायनांनी युक्त असतात. थंड तापमानाला ती वंगणतेलाचा घट्टपणा रोखतात. रस्ट इनहिबिटर प्रकारची पूरके सकसिनिक आम्लांची संयुगे, अमाईन फॉस्फेट्स या रसायनांची असतात व ते यंत्रभागाचे धुळीकणांपासून रक्षण करतात. डिटर्जेट्स ही फिनेट, सल्फोनेट, सॅलिसिलेट आणि फॉस्फरसच्या संयुगांनी बनलेली असतात व ते यंत्रभाग मळीपासून स्वच्छ ठेवतात.
अल्केनिल साक्सिनामाईड्स आणि साक्सिनेट इस्टर संयुगे पसरवण्याचे (डिस्र्पसट्सचे) कार्य करतात व यंत्रभागातील मळीला वंगणतेलात समप्रमाणात पसरवून तरंगती ठेवतात. फिनोलिक संयुगे, सल्फुराईज्ड इस्टर संयुगे, िझक डायोथायोफॉस्फेट ही अँटी-ऑक्सिडंट रसायने वंगणतेलाचा उच्च तापमानाला विघटनापासून बचाव करतात. अँटी-फोम पूरके सिलिकोंस, ऑरगॅनिक पॉलिमर्सपासून बनलेली असतात व ती यंत्रभागात घुसळणाऱ्या वंगणतेलातील बुडबुडे निपटून टाकतात. गिअरतेलातील एक्स्ट्रिम प्रेशरपूरके फॉस्फरस व सल्फरयुक्त रसायनांनी युक्त असतात आणि दाब व उष्णता शोषतात. अँटी-फाऊलंट पूरके क्लोरिनेटेड हायड्रोकार्बन्सनी तयार केलेली असतात. स्कूटर-रिक्षाचे (टू स्ट्रोक) इंजिन साफ ठेवण्यास ती साहाय्यभूत ठरतात. अशा प्रकारे विविध ठिकाणी वापरायच्या वंगणतेलांसंबंधित रसायनांचा गोतावळा असतो हे लक्षात येते.
जोसेफ तुस्कानो (वसई), मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org
प्रबोधन पर्व: आत्मोन्नतीकडून परोन्नतीकडे..
‘‘गहन प्रश्नांचीं उत्तरें समाधानकारक मिळालीं नाहींत – अर्थात् त्यांविषयीचीं कायमचीं मतें बनलेलीं नसलीं, तरी मनुष्यानें आपणाला समजूं लागण्याबरोबर आपल्या आचरणाचा मार्ग आंखला पाहिजे. आधीं मी या प्रश्नांचा निकाल लावीन आणि मग आपल्या आचरणाचा मार्ग ठरवीन असें म्हणून चालावयाचें नाहीं. मनुष्यानें जर बुद्धिपुर:सर आपल्या आचरणाचा मार्ग आंखला नाहीं, तर यदृच्छेनें त्याचें आचरण कसें तरी होत राहील, व त्याला न कळत त्याच्या आचरमाचे मार्ग ठरून जातील. बहुतेक मनुष्यांची अशीच स्थिति होत असते व तीं आपल्या आचरणाला वळण लावण्याचा यत्न करीत नाहींत. आचरणाला दिशा लावण्याचा मुळीं प्रयत्नच न करणें वेगळें, आणि तसा प्रयत्न करीत असतां आगंतुक कारणांनीं अगर मनोविकारांच्या तावडींत सांपडल्यामुळे आपल्या हातून चुका घडणें हें वेगळें. मनुष्य आस्तिक असो अगर नास्तिक असो, त्याचें या जगांतील जीवित ही एक अमोलिक चीज आहे व तिचा उपयोग फार दूरदर्शीपणाने व शहाणपणानें केला पाहिजे, अशा प्रकारची जाणीव उत्पन्न होऊन आपल्या आचरणाला दिशा लावण्याचा प्रयत्न मनुष्य करूं लागला म्हणजे त्याला नवजीवन प्राप्त झालें, असें मी समजतों.’’ महर्षि धोंडो केशव कर्वे माणसांनी कसा विचार करावा हे सांगत आत्मोन्नती आणि परोन्नतीचे संतुलन मानवी जीवनाचे सार्थक्य करणारे असते, हेही सांगतात- ‘‘मीं काय केलें असतां माझ्या जन्माचें सार्थक होईल, हा विचार मनुष्याच्या श्रेष्ठ मनोवृत्तीचा दर्शक आहे. हा विचार केव्हांना केव्हां तरी मनुष्याच्या अंत:करणात उद्भवतोच. स्वत:च्या कल्याणासाठीं झटत असतां दुसऱ्यांच्याहि कल्याणाची काळजी बाळगून त्यासाठीं धडपड केली असतां माझ्या जन्माचें सार्थक होईल, असें या प्रश्नाचें उत्तर पुष्कळांच्या मनांत आलें आहे व तें आचरणांत आणण्याचा त्यांनीं यत्न केला आहे. केवळ स्वार्थापलीकडे ज्यांची नजर कधीं गेली नसेल, असे मनुष्य कितीहि धार्मिक दिसत असले तरी ते खरे धार्मिक नव्हत. आत्मोन्नतीसाठी तळमळ उत्पन्न होणें हें मनुष्यपणाचें पहिलें चिन्ह होय, व परोन्नतीच्या द्वारें आत्मोन्नति साधण्यासाठीं धडपडणें ही त्याच्यावरची पायरी होय. ’’