कुसुमाग्रज- काव्य

‘जीवनलहरी’ हा कुसुमाग्रजांचा पहिला काव्यसंग्रह १९३३ मध्ये प्रसिद्ध झाला.

वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज

‘जीवनलहरी’ हा कुसुमाग्रजांचा पहिला काव्यसंग्रह १९३३ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर ‘विशाखा’, समीधा, स्वगत, मराठी माती, तर १९८४ मध्ये मुक्तायन प्रसिद्ध झाला. ज्ञानपीठ पुरस्कारासाठी १९६७ ते १९८२ या काळातील साहित्य विचारात घेतले गेले आहे. या काळात ‘वादळवेळ’ (१९६९) आणि ‘छंदोमयी’ (१९८२) हे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले होते.

कुसुमाग्रजांच्या कवितेत राजकीय स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारी गर्जना आहे, तशीच सामाजिक विषमता, सामान्य माणसांची गांजणूक, पिळवणूक, दारिद्रय़ाने त्याची झालेली वाताहत, कर्मकांड, रूढी, जगण्याचा अधिकार हिसकावून घेतल्यामुळे पददलितांची झालेली वाताहत या विषयीची जाणीव प्रकट होताना दिसते.

म. गांधी, विनोबा भावे, विवेकानंद, बाबा आमटे (‘सन्त’ ही कविता), कर्ण, अश्वत्थामा, डॉ. आंबेडकर (‘अनावरण’ ही कविता)- अशा किती तरी लोकोत्तर व्यक्तींचे कार्य- हे त्यांच्या कवितेचे विषय झालेले दिसतात. बाबा आमटे यांना बुद्ध, ख्रिस्तासारखे एकाकीपण लाभले, पण परमेश्वर त्यांचा सांगाती आहे. कारण ते ‘संत’ आहेत या भावनेपाशी ती कविता मिटून जाते.

विलक्षण स्थितप्रज्ञ, तपस्वी वृत्तीचे कुसुमाग्रज त्यांच्या कवितेतूनही प्रकट होताना दिसतात-

‘विजयासाठी माझी कविता कधीच नव्हती

म्हणून तिजला भीती नव्हती पराजयाची-’

पण अशी अलिप्त वृत्ती म्हणावी तर १९६२ साली भारतावर चीनने आक्रमण केले. त्या वेळी खवळून उठलेले कविमन भारतीयत्वाची शिकवण देत म्हणते,

‘बर्फाचे तट पेटुनी उठले, सदन शिवाचे कोसळते

रक्त आपुल्या प्रिय आईचे, शुभ्र हिमावर ओघळते..

कोटि कोटि देहात आजला एक मनीषा जागतसे..

पिवळे जहरी सर्प ठेचणे, अन्य मना व्यवधान नसे

एक प्रतिज्ञा विजय मिळे तो, राहिल रण हे धगधगते..

रक्त आपल्या..

हौतात्म्य पत्करलेल्या अनाम वीरांविषयी ते लिहितात-

‘अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनान्त

स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली न वात..’

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

 

रेशीम धाग्याच्या गुणवत्ता कसोटय़ा

तुतीवर वाढवलेल्या रेशीम किडय़ाच्या रेशीम धाग्याच्या गुणवत्तामापनाच्या काही कसोटय़ा आहेत, त्या पाहू.  सर्व नसíगक तंतूंमध्ये रेशमाचे ताणबल सर्वाधिक (४४९५ किग्रॅ/चौसेमी) आहे. त्यामध्ये स्थितिस्थापकत्व हाही एक वैशिष्टय़पूर्ण गुणधर्म आढळतो. मर्यादित ताणाखाली याची स्थितिस्थापकता २० टक्के असते म्हणजे ताणले असता रेशमाची लांबी १/५ ने वाढते व ताण काढून घेतल्यावर त्याची लांबी पहिल्याइतकी होते. त्याची तन्यता दर डेनियरला ३.७५ ग्रॅम असते. कच्च्या रेशमाचे विशिष्ट गुरुत्व १.३३, तर प्रक्रिया केलेल्या पक्क्या रेशमाचे विशिष्ट गुरुत्व १.२५-१.२७ एवढे असते. रेशीम अत्यंत मंद विद्युतवाहक आहे. रेशमाचा ज्वलनांक १४० अंश सेल्सिअस असून ज्वालेत धरल्यास रेशीम वितळून त्याची गुठळी बनते, राख होते व प्रथिनांचा बनलेला असल्याने केस जळल्यासारखी दरुगधी येते. रेशीम ११० अंश सेल्सिअस तापमानाला १५ मिनिटे उकळल्यास ते पिवळट होते आणि १६७ अंश सेल्सिअसला त्यातील घटकद्रव्ये वेगळी होतात.

रेशमाची जलशोषण क्षमता चांगली आहे. ते स्वत:च्या वजनाच्या ३० टक्के वजनाएवढे पाणी शोषून घेते, त्यामुळे त्यावर रंग उत्तम बसतो. रेशीम ओले झाले तरी ते स्पर्शाला ओलसर लागत नाही, हे विशेष.

रेशीम कापडाची प्रत त्याच्या वजनावरून ठरते. त्यासाठी ‘मॉम वेट’ हा निकष लावतात. ब्रिटिश मापन पद्धतीत १०० वार ४५ इंच पन्ह्य़ाच्या कापडाचं पाऊंडातलं वजन म्हणजे ‘मॉम वेट’. वजन जेवढं जास्त व रेशीम जाड; तसा त्याचा भरणा वस्त्रात अधिक असतो. प्रमाणित कापडाचं वजन ५६ ग्रॅम असतं.

रेशमाला असलेली नसíगक झळाळी धाग्याच्या रचनेवरून ठरते. धाग्याचा काटछेद गोल टोकाच्या कोनमितीच्या लोलकाप्रमाणे असून कोनमितीमधून प्रकाश ज्या दिशेने जातो, त्याप्रमाणे त्याचं वक्रीभवन, संपूर्ण आंतरिक परावर्तन किंवा अपसरण होऊन रेशमाला झळाळी प्राप्त होते.

तुतीवर पाळलेल्या रेशीम किडय़ांच्या धाग्याची आणि जंगली रेशीम किडय़ांच्या धाग्याची रचना समान असली तरी, जंगली धाग्यात अतिसूक्ष्म छोटे तंतूही असतात. त्यात खनिज घटकांचं प्रमाण जास्त असतं. त्यातील सेरिसीन जास्त कणखर म्हणून झळाळीही कमी असते.  खनिज आम्लांचा, धातूंच्या लवणांचा व तीव्र आम्लारींचा रेशमावर वाईट परिणाम होतो; परंतु सेंद्रिय आम्लांचा वापर सुरक्षित ठरतो. त्यांच्या प्रक्रियेमुळे रेशमाची सळसळ वाढते. डाग काढण्यासाठी बेकिंग सोडा वापरावा; मात्र तो लगेच धुऊन टाकावा. रेशमावर सूक्ष्म जीव वा बुरशीचा फारसा परिणाम होत नाही; पण सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांमुळे रेशीम विटते व खराब होते.

डॉ. क. कृ. क्षीरसागर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Marathi articles on kusumagraj literature