शिरवाडकरांचे नाटय़लेखन

कुसुमाग्रजांच्या प्रेमकविता वैशिष्टय़पूर्ण आहेत.

कुसुमाग्रजांच्या प्रेमकविता वैशिष्टय़पूर्ण आहेत. कवितेत येणारा निसर्ग कवितेशी एकजीव झाल्यावर एक वेगळेच सौंदर्य प्रतीत होते. उदा. ‘पृथ्वीचे प्रेमगीत’. दोघांच्या मीलनाच्या स्वप्नांची समाप्ती होणार आहे- हे सांगणारा दु:खद अनुभव व्यक्त करताना ते म्हणतात-

‘काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात

दिवसाच्या क्षितिजावर उभे दिवसाचे दूत।’

‘छंदोमयी’ हा काव्यसंग्रह लक्षात राहतो तो त्यातील सुप्रसिद्ध ‘प्रेमयोग’ या सुंदर कवितेमुळे.. ‘प्रेम कुणावर करावं?’ या सनातन प्रश्नाला ‘कुणावरही करावं’ हे तितकंच सनातन उत्तर कवितेच्या सुरुवातीलाच कुसुमाग्रज देऊन टाकतात.

कुसुमाग्रजांच्या कवितेतील ओळी सुभाषितासारख्या वापरल्या जातात. ‘विशाखा’मधील ‘कोलंबसाचे गर्वगीत’ या कवितेच्या शेवटी ते म्हणतात-

‘अनंत आमुची ध्येयासक्ती अन् अनंत आशा

किनारा तुला पामराला।’

उत्कट जीवननिष्ठा आणि मानवावरील अपार श्रद्धा, अन्यायाचा धिक्कार, सत्याचा, न्यायाचा पाठपुरावा- हे त्यांच्या लेखनाचे विशेष त्यांच्या काव्यातही दिसतात.

१९४६ मध्ये ऑस्कर वाइल्डच्या ‘अ‍ॅन आयडियल हजबंड’ या नाटकाचे रूपांतर ‘दूरचे दिवे’ या नावाने करून शिरवाडकरांनी आपल्या नाटय़लेखनाला सुरुवात केली. त्यांच्या नाटय़लेखनाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांच्या नाटकाच्या केंद्रस्थानी एखादे जबरदस्त व्यक्तित्व असते. उदा. कर्ण, झाशीची राणी, बाजीराव, ययाती इ.

१९४६ ते १९९६ मधील ‘किमयागार’ या नाटकासह शिरवाडकरांनी स्वतंत्र, भाषांतरित, रूपांतरित, आधारित अशी १९ नाटके लिहिली आहेत. ‘दूरचे दिवे’ या रूपांतरित नाटकानंतर १९४७ मध्ये त्यांनी ‘दुसरा पेशवा’ हे पूर्णपणे स्वतंत्र स्वरूपाचे नाटक लिहिले. पेशवा बाजीराव आणि मस्तानी यांच्या ऐतिहासिक नातेसंबंधावरची ही शोकांतिका आहे. १९५३ मध्ये ‘कौंतेय’ हे नाटक त्यांनी लिहिले. महाभारतातील कुंती आणि कर्ण या दोन मोठय़ा व्यक्तिरेखांच्या नातेसंबंधावर हे नाटक आधारित आहे. माता आणि पुत्र यांच्यातला भावनिक ताण नाटकाच्या केंद्रस्थानी आहे. मराठी रंगभूमीवर अवतरलेली ही एकमेवाद्वितीय अशी शोकांतिका आहे.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

 

कार्ल फॉन फ्रिश

सामूहिक जीवन जगणाऱ्या मधमाशांच्या वर्तनवैशिष्टय़ांचा सखोल अभ्यास करून त्याच्या रंग, रूप, गंध, चव, स्पर्श अशा संवेदनाग्रहण क्षमतेचा परिचय करून देणारा व त्यासाठी नोबेल पुरस्कार (सन १९७३) मिळवणारा शास्त्रज्ञ म्हणजे ‘कार्ल रिटर फॉन फ्रिश’.

प्राण्यांच्या वर्तनशास्त्राच्या या अभ्यासकाचा जन्म २० नोव्हेंबर १८८६ रोजी व्हिएन्ना (ऑस्ट्रिया, हंगेरी) येथे झाला. त्यांचे शिक्षण व्हिएन्नामध्ये हान्स लिओ प्रा. प्रिझब्राम यांच्या मार्गदर्शनाखाली व नंतर म्युनिक येथे प्रा. रिचर्ड फोन हॉटविग यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. प्रथम त्यांचा विषय वैद्यक हा होता; परंतु नंतर त्यांनी निसर्गविज्ञानाचा अभ्यास केला. १९१० मध्ये डॉक्टरेट पदवी मिळवून त्यांनी म्युनिक विद्यापीठात प्राणिशास्त्र विभागात अध्यापन केले.

१९३३ मध्ये नाझी धोरणामुळे त्यांना ज्यू समजून त्यांच्यावर खूप अन्याय झाला. त्यांची प्राणिशास्त्र संशोधन संस्थाही दुसऱ्या महायुद्धात नष्ट करण्यात आली.  तरीही त्यांनी मधमाशांवरील संशोधन चालूच ठेवले. मधमाशांचे रोग, व्याधी आणि वर्तन यांवर लक्ष केंद्रित केले. ते निवृत्त झाले; तरीही त्यांच्या संशोधनात खंड पडला नाही.

नृत्यभाषेसाठी मधमाशा आकाशातील तत्कालीन सूर्याचं स्थान, फुलोरा आणि मोहोळ हे संदर्भिबदू वापरतात हे त्यांनी सिद्ध केलं. मध व परागकणांची गुणवत्ता, फुलोऱ्यांचं अंतर, जमिनीपासूनची उंची, दिशा, वाऱ्यांचा अनुकूल वा प्रतिकूल प्रवाह इत्यादी घटकांचा संदर्भ त्या नृत्यातून आविष्कारित करतात, हे दाखवून दिलं.

मधमाशांचा वर्तनस्वभाव त्यांच्या सामूहिक जीवनपद्धतीसाठी पायाभूत ठरतो, हे त्यांनी सिद्ध केलं. मधमाशांची रंगओळख, गंध व चव ओळख क्षमता आणि दिशा व स्थानबोध क्षमता यांवरील त्यांचं मूळ स्वरूपी संशोधन सर्वमान्य झालं. मधमाशांच्या संवेदनाग्रहण क्षमतेबरोबरच त्यांच्या नृत्यसंवाद भाषेचा अचूक अर्थ लावण्यासाठी त्यांना नोबेल पुरस्कार दिला गेला. त्यांचे निष्कर्ष १९२७च्या त्यांच्या मूळ जर्मन पुस्तकात व नंतरच्या ‘ऊंल्ल्रूल्लॠ इी२’ या इंग्रजी पुस्तकातून प्रसिद्ध झाले.  प्रथम त्यावर कोणी विश्वास ठेवला नाही, परंतु नृत्यांचे शास्त्रीय विश्लेषण झाल्यावर फार उशिरा त्यांना मान्यता मिळाली.  वयाच्या ९५व्या वर्षी १२ जून १९८२ रोजी जर्मनीत म्युनिक येथे त्यांचे निधन झाले.

डॉ. क. कृ. क्षीरसागर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Marathi articles on kusumagraj theatrical writing