scorecardresearch

भाषासूत्र : उर्दू-मराठी तहजीब

भारतीय मनावर हिंदी चित्रपटांचा पगडा बऱ्याच अंशी आहे आणि त्यातील उर्दू मिश्रित गाणी सर्वाना विशेष भावतात.

भाषासूत्र : उर्दू-मराठी तहजीब
(संग्रहित छायाचित्र) photo source : loksatta file photo

निधी पटवर्धन  

कालौघात प्रत्येक भाषेत अन्य भाषांच्या संपर्कामुळे विविध शब्द सामावले जातात. त्यामुळे मूळ भाषेतील लोकांच्या अभिव्यक्तीचा स्तर उंचावतो. मराठीत एका विशिष्ट काळात फारसी- अरबी आणि नंतर इंग्रजी या भाषांतून विविध शब्द सक्तीने आल्यासारखे आले. त्याला विरोध म्हणून काही शब्द शोधले गेले, जातात. प्राप्त परिस्थितीत माणसाची अभिव्यक्ती खुरटी राहू नये म्हणून विविध पर्यायांची उपलब्धता असायला हवी.

भारतीय मनावर हिंदी चित्रपटांचा पगडा बऱ्याच अंशी आहे आणि त्यातील उर्दू मिश्रित गाणी सर्वाना विशेष भावतात. अनेक शब्द आपल्याला माहीत नसतात. ते आपण भाषक जाणकाराला विचारू लागतो जसे ‘इस अंजुमन मे आपको आना है बार-बार’ हे गाणे ऐकल्यावर आपण ‘अंजुमन’चा काय अर्थ असेल याची कल्पना करत राहतो. मूळ उर्दूतही आपल्याला अनोळखी ‘अंजुमन’चा अर्थ संस्था, सभा, समिती कधीतरी अनमानधपक्याने समजतो, तसे मराठीतल्या उर्दू प्रचलित शब्दांचे होऊ नये, म्हणून काही उदाहरणे बघू. अरबी-फारसी असलेल्या आणि पर्यायाने उर्दू झालेल्या काही शब्दांना मराठी प्रतिशब्द असे सांगता येतील.

अंदाजला अटकळ/ अनुमान म्हणू शकू. ‘गरजवंताला अक्कल नसते’ त्यातली मूळ अकल म्हणजे बुद्धी. काही तरी ‘अगर-मगर’ करू नकोस म्हणजे टाळाटाळ/ टालमटोल करू नकोस. ‘अजब तुझे सरकार’ यातले अजब म्हणजे विलक्षण/ अद्भुत/ अनोखे/ विचित्र राज्य!

अजीबच आहे ही गुहा! यात अजीब- विलक्षण/ अद्भुत/ विचित्र/ चमत्कारिक होऊ शकतो. ‘अफलातून’ हा शब्द आपण अनेकदा वापरतो, त्याचा अर्थ आताच्या काळात ‘फारच भारी’ असा साधारपणे घेतला जातो, पण कोशगत अर्थ मात्र ‘स्वत:ला फार शहाणा समजणारा’ किंवा ‘घमेंडखोर’ असा आहे. हाच शब्द सुप्रसिद्ध ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटो याच्यासाठी वापरला गेला होता, असेही एका कोशात वाचले. नसत्या ‘अफवा’ पिकवू नका- इथे ‘कंडी’/ ‘आवई’ वापरता येईल. तो ‘अय्याश’ आहे म्हणजे- ‘विलासी’ आहे, ‘अलबेला’ आहे म्हणजे ‘छानछोकीचा’, ‘मनमौजी’ आहे. ही चीज ‘असली’ आहे म्हणजे- ही वस्तू ‘खरी’ किंवा ‘मूळची’ आहे. एखादी गोष्ट घडायला हवी म्हणून ‘आमीन’ म्हणण्याऐवजी ‘तथास्तु’ म्हणू शकतो. आणखी काही शब्द पुढच्या भागात. 

nidheepatwardhan@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 03:36 IST

संबंधित बातम्या