डॉ. नीलिमा गुंडी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलौकिक पातळीशी निगडित काही वाक्प्रचार लौकिक ( व्यावहारिक) पातळीवरही वापरले जातात. त्यासाठी केवळ एखादा शब्द बदलणे किंवा बोलण्याचा नुसता सूर बदलणे पुरेसे ठरते. उदा. ब्रह्मानंदी टाळी लागणे, हा वाक्प्रचार पाहा. याचा अर्थ आहे, श्रेष्ठ अशा ध्यानमग्न स्थितीतील तल्लीनता अनुभवणे.

‘ब्रह्मानंदी लागता टाळी, कोण देहाते सांभाळी’ असे म्हणतात. मात्र हाच वाक्प्रचार ‘झोप लागणे’ या अर्थानेही व्यंग्यार्थाने वापरला जातो. कधी आपण फोन पटकन उचलला नाही, तर, ‘ब्रह्मानंदी टाळी लागली वाटतं!’ अशी प्रतिक्रिया ऐकून घ्यावी लागते!

अवतार घेणे, या वाक्प्रचाराचेही असेच आहे. काहींची श्रद्धा असते की परमेश्वर मानवी रूपात पृथ्वीतलावर अवतार घेतो. या वाक्प्रचाराभोवती असे अलौकिकतेचे वलय आहे. मात्र, ‘अवतार होणे’ या वाक्प्रचारात केवळ एक क्रियापद बदलले की अर्थाचा स्तर धपकन खाली घसरतो! एखाद्या व्यक्तीचे रूप हास्यास्पद झाले आहे, हे त्यातून कळते. त्यात उपहासाचा सूर असतो. उदा. उंचावरच्या पिठाच्या डब्याचे झाकण अनवधानाने उघडले आणि पीठ अंगावर सांडले , तर ‘काय अवतार झालाय!’ असे ऐकून घ्यावे लागते.

मोक्ष मिळणे, या वाक्प्रचाराला तत्त्वज्ञानात महत्त्व आहे. जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका, मुक्तीची श्रेष्ठ अवस्था , स्वर्गप्राप्तीचा आनंद अशा अलौकिक अर्थाचे वलय त्याला आहे. मात्र, कपाळमोक्ष होणे, या वाक्प्रचारात हे अर्थवलय अभिप्रेत नाही. तेथे रोकडा वाच्यार्थ अपेक्षित असतो. तो आहे, डोके फुटणे आणि मृत्यू होणे. त्यामुळे अपघातात एखाद्याचा कपाळमोक्ष झाल्याची बातमी हमखास ऐकू येते.

प्रसाद मिळणे म्हणजे दैवी कृपा लाभलेला खाद्यपदार्थ मिळणे. देवाला नैवेद्य दाखवून एखादा खाद्यपदार्थ सर्वाना वाटायची पद्धत असते. मात्र साधा बोलण्याचा सूर बदलला तरी याचा अर्थ बदलतो, कारण प्रसाद मिळणे या वाक्प्रचाराचा व्यंग्यार्थ आहे, मार बसणे. पूर्वी आईवडिलांच्या हातचा प्रसाद खोडकर मुलांना नेहमी मिळत असे!

वाक्प्रचारांमधला लौकिक-अलौकिक स्तर बदलण्याचा हा भाषेचा खेळ मोठा मनोवेधक आहे, नाही का?

nmgundi@gmail.com

More Stories onमराठीMarathi
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi language learning useful phrases in marathi zws 70
First published on: 06-07-2022 at 02:45 IST