– डॉ. माधवी वैद्य madhavivaidya@ymail.com

एक फार मजेशीर म्हण आहे. छोटय़ाशा म्हणीत नाद आणि लय तर आहेच, शिवाय एक मजेशीर वृत्तीही दडलेली आहे. एखादी व्यक्ती अशी असते, की आपण तिला म्हणतोदेखील, ‘अरे! कशाला लुडबुड करतोस? काही कळत तर नाही तुला, काहीतरी भलतंच करून ठेवतोस बघ.’ पण त्या माणसाला आपण सांगितलेले पटण्याची सुतराम शक्यता नसते. उलट त्याचा उत्साह आणि नाचानाच काही कमी होत नाही. इतका उत्साह ओसंडत असतो, की त्यावर नियंत्रण ठेवणे इतरांना जमत नाही. अशा व्यक्ती आपल्या आसपास किती तरी वेळा दिसतात. आमच्या घरातले बापूअण्णा असेच व्यक्तिमत्त्व! घरात एखादे कार्य असेल तर यांच्या उत्साहाला काही पारावारच राहायचा नाही. कामे करण्यात सदैव पुढे पुढे करणार! आपल्याला त्या कामातले काही कळते का, हा विचारच नाही. एकदा एका लग्नाच्या सोहळय़ात स्वागत समारंभात सुवासिक गजरे पाहिजे होते. म्हणाले, ‘काळजी करू नका! आत्ता आणतो.’ मुलीची आई म्हणालीच, ‘तुम्हाला काय कळतं हो गजऱ्यातलं? ब्रह्मचारी तुम्ही!’ बापूअण्णा म्हणाले, ‘म्हणून काय झालं? चांगले टपोऱ्या कळय़ांचे गजरे घेऊन येतो बघा.. हा गेलो आणि आलो!’ बापूअण्णा गेले आणि हाराभर गजरे घेऊन आले, पण ते गजरे मोगऱ्याचे नव्हते तर तगरीच्या कळय़ांचे होते. त्यासाठी अर्थात हाराभर बोलणीही खाल्ली त्यांनी. मुलीची आई म्हणालीच, ‘माहीतच होतं असं काही तरी होईल म्हणून! लांडे लुडबुडे आणि नाचे पुढे पुढे, तशातली गत आहे या बापूअण्णांची. झालं. आता माळा तगरीचे गजरे केसात आणि करा हौस पुरी’ हसावे की रडावे अशी परिस्थिती!