marathi language phrases that contain word plant phrases related to the word plant zws 70 | Loksatta

भाषासूत्र : वाक्प्रचार आणि वनस्पती

देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवले होते.’

भाषासूत्र : वाक्प्रचार आणि वनस्पती

डॉ. नीलिमा गुंडी

सृष्टीतील विविध घटकांना स्वत:त सामावून घेणारी भाषा विविध वनस्पतींमुळेही सहजपणे बहरत असते. ‘तुळशीपत्र ठेवणे’, या वाक्प्रचाराचा अर्थ आहे हक्क सोडणे, अर्पण करणे. एखाद्या वस्तूवर तुळशीचे पान ठेवून ती वस्तू कृष्णार्पण करण्याची पद्धत आहे. उदा. ‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवले होते.’

‘हरभऱ्याच्या झाडावर चढवणे’ म्हणजे खोटी स्तुती करणे. हरभऱ्याचे झाड नाजूक असते, ही वस्तुस्थिती लक्षात घेतली की या वाक्प्रचारातील मर्म लक्षात येईल. आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवण्याचा उद्योग केला जातो. व्यक्ती चाणाक्ष असेल, तर ती त्या खोटय़ा स्तुतीला दाद देत नाही. म्हणजेच ती व्यक्ती हरभऱ्याच्या झाडावर चढत नाही!

‘विडा उचलणे’ या वाक्प्रचाराचा उपयोग ऐतिहासिक लेखनात आढळतो. विडा करण्यासाठी नागवेलीचे पान वापरतात. मुळात विडय़ांना आपल्याकडे ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्टय़ा महत्त्व आहे. पूर्वी दरबार बरखास्त करताना, मोहिमेवर जाणाऱ्यास निरोप देताना तबकात मांडलेले विडे देण्याची चाल असे. त्यातून विडा उचलणे हा वाक्प्रचार रूढ झाला. त्याचा अर्थ आहे कठीण आव्हान स्वीकारणे. पुढे प्रत्यक्ष तबकातील विडा न उचलताही या वाक्प्रचाराचा वापर सुरू राहिला. उदा. राम गणेश गडकरी यांनी ‘एकच प्याला’ या नाटकात या वाक्प्रचाराचा उपयोग करून श्लेष साधत विनोदनिर्मिती केली आहे, ती अशी : ‘अमका म्हणतो आजपासून चहा सोडला, तमक्यानं विडासुद्धा न खाण्याचा विडा उचलला!’

‘पळसाला पाने तीन’ हा वाक्प्रचार वस्तुस्थितीदर्शक आहे. लालभडक पाने असलेला पळसाचा वृक्ष त्याच्या तीन पानांच्या वैशिष्टय़पूर्ण रचनेमुळे उठून दिसतो. त्यामुळे स्थलकालनिरपेक्ष समान तत्त्व सांगण्यासाठी हा वाक्प्रचार वापरतात. कोकणात जास्त पाऊस पडतो, म्हणून तिथे पळसाला चार पाने फुटणार नाहीत ! ‘पळस गेला कोकणा, तीन पाने चुकेना’ असे म्हटले जाते.

असे अनेक वाक्प्रचार आढळतील. अंगणातल्या तुळशीपासून जंगलातल्या वृक्षांपर्यंत नाना वनस्पती आपापला स्वभाव व संदर्भविश्व उलगडत वाक्प्रचारांमध्ये रुजल्या आहेत.

nmgundi@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
कुतूहल :  स्वयंपूर्ण जलव्यवस्थापन  

संबंधित बातम्या

व्हिडिओ

ताज्या बातम्या
विश्लेषण : चीनने ‘शून्य कोविड धोरण’ शिथिल केल्यास काय होणार?
नाद कुणाचा करायचा! टायगर शार्कचा व्हिडीओ काढायला गेला अन् होत्याचं नव्हतं झालं, पाण्यातील थरारक Viral Video पाहाच
मधुमेहाच्या रुग्णांनी रोज ‘हे’ पदार्थ खाण्यास सुरुवात करा; रक्तातील साखरेची समस्या कायमची दूर होईल
या चित्रात असलेली चुक तुम्हाला दिसली का? तीक्ष्ण नजर असणाऱ्यांना पटकन येईल ओळखता
पुण्यातील तरुणाचा भन्नाट प्रयोग; चक्क कंटेनरमध्ये घेतले काश्मिरी ‘केशर’चे पीक