– डॉ. नीलिमा गुंडी nmgundi@gmail.com

जगताना प्रत्येकाला नानाविध संकटांना तोंड द्यावे लागते. अशा वेळी प्रयत्नवाद मनावर बिंबवणारे वाक्प्रचार आठवतात. त्यांचे हे काही नमुने-

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
loksabha election 2024 Peoples issues banished from campaigning in Vidarbha
विदर्भात जनसामान्यांचे प्रश्न प्रचारातून हद्दपार
BJP using social media influencers for election campaign Lok Sabha elections 2024
निवडणूक प्रचारात इन्फ्लूएन्सर्सची एंट्री; भाजपाची काय आहे क्लृप्ती?
peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!

‘जंग जंग पछाडणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ आहे, अतिशय श्रम करणे, कमालीचे प्रयत्न करणे. जंग हा फारसी शब्द असून तो स्वतंत्रपणे फारसा वापरला जात नाही. जंगी तयारी, जंगी लढाई अशा शब्दप्रयोगांत ‘जोरदार’ या अर्थी तो शब्द येतो आणि पछाडणे म्हणजे पिच्छा पुरवणे, जेरीस आणणे. रमाबाई रानडे यांच्या आत्मचरित्रात त्यांच्या आजेसासूबाई (न्यायमूर्ती रानडे यांच्या पहिल्या पत्नीचे कौतुक करताना रमाबाईंना टोमणे मारत) एकदा म्हणतात, ‘तिला इंग्रजी शिकवण्याबद्दल त्यांनी जंग जंग पछाडले, पण त्या माऊलीने तिकडे लक्ष दिले नाही.’

जंग जंग पछाडले तरी कार्यभाग साधला नाही, की निराश न होता चंग बांधायचा असतो! चंग बांधणे म्हणजे कंबर कसणे, प्रतिज्ञा करणे. मुळात ‘पचंग’ असा शब्द होता. कालौघात ‘प’ हे अक्षर गळून गेले. पचंग म्हणजे पासोडी, कांबळे इत्यादी वस्त्र मानेपासून कंबरेपर्यंत पोट, पाठ झाकेल असे गुंडाळून गळय़ामागे गाठ बांधणे, अशा प्रकारे (पाच अंग म्हणजे पचंग) बांधून पुढे सरसावणे, सिद्ध होणे. चंग बांधणे या वाक्प्रचारातून प्रयत्न करताना आवश्यक असलेली आवेशपूर्णताही अचूकपणे व्यक्त होते.

प्रयत्नांची पराकाष्ठा करणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे, प्रयत्नांची हद्द गाठणे. काष्ठा म्हणजे शर्यतीच्या शेवटी मर्यादादर्शक म्हणून पुरलेले लाकूड. पराकाष्ठा म्हणजे शेवटची हद्द. त्यामुळे प्रयत्नांची पराकाष्ठा करणे म्हणजे प्रयत्न करताना जराही कमतरता न ठेवणे.

‘प्रयत्नांती परमेश्वर’ हा वाक्प्रचार आपल्या तोंडी सहज रुळलेला असतो, अगदी एखाद्या बोधवाक्याप्रमाणे! परमेश्वर ही काव्यात्म संकल्पना आहे. व्यावहारिक पातळीपेक्षा खूप उंचावरचे, श्रेयस स्वरूपातील ईप्सित त्यातून सुचवायचे असते. त्यामुळे प्रयत्न केल्यास परमेश्वरदेखील प्राप्त होईल, असा विश्वास देणारा हा वाक्प्रचार प्रयत्नांमुळे अप्राप्य तेही प्राप्त होऊ शकते, असा आशावाद जागवतो. असे हे वाक्प्रचार नक्कीच प्रेरणादायी ठरतात.