निधी पटवर्धन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महिन्याचा पहिला दिवस उजाडला की अर्थातच आठवण होते ती पगाराची! आपण ‘मासिक वेतन’ असं न म्हणता सहजी ‘पगार’ म्हणून जातो. ठरावीक मुदतीच्या श्रमाबद्दल मिळणारा मेहनताना याबद्दल वापरला जाणारा पगार हा शब्द पोर्तुगीज आहे! पोर्तुगीज शब्द आहे पागा म्हणजे वेतन आणि पगार म्हणजे पैसे देणे.

पंधराव्या शतकाच्या आरंभी पोर्तुगीज भारतात आले आणि १९७० पर्यंत त्यांची गोमांतकावर सत्ता होती. त्यातून पुष्कळ पोर्तुगीज शब्द मराठीत आले. ख्रिस्ती धर्मोपदेशकांसाठीचा ‘पाद्री’ हा शब्द पोर्तुगीजच.

अत्यंत गोड असणारं, लहानथोरांचं आवडतं फळ म्हणजे पपई. पोर्तुगीजांनी हे फळ भारतात इसवी सन १४९५ मध्ये आणलं. तसंच त्यांनी आणलेलं दुसरं फळ म्हणजे अननस हे होय. पपया आणि अननस हे दोन शब्दही मराठीला पोर्तुगीजांनी दिले आहेत. चहा पिण्याची चिनी मातीची गोल ताटली एवढं वर्णन करून सांगण्यापेक्षा बशी म्हटलं की पटकन कळतं. हा शब्दही पोर्तुगीज बसिया या शब्दावरून मराठीत आला आहे. पोर्तुगीज पाँपा या शब्दावरून बंब हा शब्द आल्याचं सांगितलं जातं. पाणी गरम करण्यासाठी वापरलं जाणारं, पाणी भरण्याचं मोठं पिंप या अर्थानेच तो आपण वापरतो.

भारतात सर्वत्र पसंत असणारी एक प्रकारची तिखट वनस्पती, जी खाऊ नये तरीही मळली जाते, ती म्हणजे तंबाखू! हा मूळ शब्द नळी किंवा चिलीम असा होता, नंतर वनस्पती आणि नंतर त्यापासून येणारा कैफ असा झाला. ही वनस्पती परक्या देशातून भारतात आली. तंबाखूचा प्रवेश इसवी सन १६०४ च्या सुमाराचा आहे आणि हा शब्दही त्याच वेळेचा आहे. कोलंबसने आपल्याबरोबर ही वनस्पती आणि तिचं नाव अमेरिकेहून युरोपात आणलं. युरोपातून पोर्तुगीज खलाशामार्फत ही वनस्पती हिंदूस्थानात आली. आता हे शब्द इतके रुळलेले आहेत की त्यांना पर्यायी मराठी शब्द सुचविले तरी ते किती वापरात येतील ही शंकाच आहे!

nidheepatwardhan@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi terms derived from portuguese portuguese words use in marathi zws
First published on: 22-09-2022 at 04:27 IST