scorecardresearch

भाषासूत्र : चित्रपटविषयक शब्दांची व्युत्पत्ती

दिवसाचा बराच वेळ तेथील काम बघत असताना सगळय़ांच्या तोंडी इंग्रजी शब्द असल्याचे सावरकरांच्या लक्षात आले व ते त्यांना खटकले.

-भानू काळे bhanukale@gmail.com

भारतात चित्रपट आले तेव्हा त्या व्यवसायाशी संबंधित बहुतेक सर्वच शब्द इंग्रजी होते. आज मात्र चित्रपटविषयक लेखनात अनेक मराठी शब्द वापरले जातात, पण ते आले कुठून आणि कसे हे मात्र खूप जणांना ठाऊक नसते. यांतील अनेक शब्दांचे जनक स्वातंत्र्यवीर सावरकर हे आहेत. अंदमानातून १९२४ साली सुटका झाल्यावर सावरकर १३ वर्षे रत्नागिरीला स्थानबद्ध होते. मे १९३७ मध्ये ते निर्बंधमुक्त झाल्यावर त्यांच्या मुक्ततेसाठी झटणारे अनंत हरी गद्रे त्यांना भेटण्यासाठी निघाले. वाटेत कोल्हापूरला त्यांनी सत्यवादीकार बाळासाहेब पाटील यांची भेट घेतली. तेव्हा त्यांना समजले की आचार्य अत्रे हेदेखील त्या वेळी कोल्हापुरात आहेत. अत्रे यांचीही सावरकरांना भेटायची इच्छा होती. दुसऱ्याच दिवशी दोघे रत्नागिरीला गेले. तीन दिवस दोघांनी सावरकरांच्या घरीच मुक्काम केला आणि मुक्ततेनंतरचा सावरकरांचा पहिला दौरा दोघांनी कोल्हापूर येथेच आयोजित केला.अत्रे त्या वेळी मास्टर विनायक यांच्या हंस पिक्चर्सच्या स्टुडिओत राहून तिथेच आपल्या ‘प्रेमवीर’ चित्रपटाचे चित्रण करत होते. सावरकरदेखील त्याच स्टुडिओमध्ये राहिले. दिवसाचा बराच वेळ तेथील काम बघत असताना सगळय़ांच्या तोंडी इंग्रजी शब्द असल्याचे सावरकरांच्या लक्षात आले व ते त्यांना खटकले. आपल्या ‘कऱ्हेचे पाणी’ या आत्मकथनात अत्रेंनी लिहिलेल्या आठवणींनुसार त्यावेळी सावरकरांनी पटापट अनेक इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द घडवले. फोटोग्राफीला छायाचित्रण, टॉकिजला बोलपट, रेकॉर्डिगला ध्वनिमुद्रण इत्यादी. चित्रपट, निर्माता, दिग्दर्शक, नेपथ्य, मध्यंतर, बाह्यचित्रण, पटकथा, ध्वनिमुद्रिका हेही सावरकरांचेच शब्द. पुढे सावरकरांनीच कार्यालय, सचिवालय, संसद, विधिमंडळ, महापालिका, महापौर, नगरपालिका, नगरसेवक, सेवानिवृत्त, निवृत्तिवेतन, परिपत्रक, कोषाध्यक्ष, नभोवाणी, हुतात्मा, दिनांक असे इतरही असंख्य शब्द घडवले आणि ते इतके सहजसोपे होते की ते आपण सर्वच सर्रास वापरत असतो. आज मात्र शासकीय पत्रकांमधील मराठीत इतके क्लिष्ट शब्द असतात की एका मुख्यमंत्र्यांनी ‘‘याचे मराठीत भाषांतर करून मिळेल का?’’ हा प्रश्न आपल्या सचिवांना गमतीने विचारला होता! 

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi words given for movie by vinayak damodar savarkar zws

ताज्या बातम्या