सूक्ष्मजंतूंमुळे होणारी लागण किंवा रोग यांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारे आणि रोगप्रतिकारशक्ती असणारे एक औषधी द्रव्य म्हणजे प्रतिजैविक. आज प्रतिजैविके ही मानवी जीवनाचे अविभाज्य अंग बनली आहेत. घसादुखीपासून ते शस्त्रक्रियेनंतरचा संसर्ग टाळण्यासाठी आपण प्रतिजैविकांचा वापर करत असतो.
प्रतिजैविके नैसर्गिक कार्बनी संयुगे असून जिवाणू आणि कवके यांच्या चयापचय क्रियेद्वारा निर्माण झालेले ते उत्सर्जित पदार्थ असतात. बहुसंख्य सजीवांना जगण्यासाठीचे घटक संघर्षांतूनच मिळवावे लागतात. प्रतिस्पर्ध्याशी नैसर्गिक संघर्ष करण्यासाठी प्रतिजैविके निर्माण करणाऱ्या जिवाणू व कवकांना, स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी यांचा फायदा होतो.




अलेक्झांडर फ्लेिमगला पेनिसिलीन या पहिल्या प्रतिजैविकाचा शोध लागला आणि रोगकारक सूक्ष्मजीव मारण्यासाठी प्रतिजैविके उपयुक्त आहेत हे मानवाला कळले. हॉवर्ड फ्लोरी आणि अर्न्स्ट चेन यांनी प्रतिजैविकांचे रेणू, स्थिर स्वरूपात वेगळे केले आणि नंतर असे सूक्ष्मजीव आधी प्रयोगशाळेत लहान प्रमाणात आणि नंतर कारखान्यात मोठय़ा प्रमाणात वाढवायला सुरुवात झाली.
मानवकल्याणासाठी औषधे म्हणून प्रतिजैविके वापरात आली. दुसऱ्या महायुद्धकाळात हजारो जखमी सैनिकांचे जीव पेनिसिलीन या एका प्रतिजैविकाने वाचवले. नंतरच्या ५० वर्षांत प्रतिजैविकांची घाऊक निर्मिती, सर्वदूर वितरण, सढळ वापर आणि व्यापार माणसे करू लागली.
प्रतिजैविके नैसर्गिकरीत्या पुरातन काळापासून निर्माण होतच होती. याचा स्पष्ट पुरावा म्हणजे आग्नेय आफ्रिकेत, ख्रिस्तपूर्व तीनशे वर्षांपूर्वीच्या मानवी हाडांत, अल्प प्रमाणात टेट्रासायक्लीन सापडले. ते नैसर्गिक आहारातूनच या आदिम लोकांत पोहोचले असणार.
प्रतिजैविके विविध प्रकारे रोगजंतूंचे नुकसान करतात. उदा. पेनिसिलीनमुळे रोगकारक सूक्ष्मजीव पेशीभित्तिका तयार करू शकत नाहीत. टेट्रासायक्लीन, अॅझिथ्रोमायसीन, निओस्पोरीन अशी प्रतिजैविके रोगकारक सूक्ष्मजीवांत डीएनए, आरएनए निर्मितीत वा त्यांच्या कामात अडथळे आणतात. इतर प्रतिजैविके प्रथिननिर्मितीत बाधा आणतात. प्रतिजैविके रोगकारक सूक्ष्मजीव निकामी करतात म्हणून रोगी, जखमी माणसांना जीवदान मिळते.
मात्र डॉक्टरांनी रोग्याला तपासून सांगितलेले प्रतिजैविक घेतले तरच गुण येतो. योग्य मात्रेत, ठरावीक दिवस, दिलेल्या सूचना पाळूनच प्रतिजैविके घेतली पाहिजेत. असे असूनसुद्धा प्रतिजैविकांना रोगकारक जंतूंचा विरोध वाढतच जातो आणि कालांतराने याचा परिणाम असा होतो की रोगजंतू देखील उत्परिवर्तित होतात आणि ती प्रतिजैविके निष्प्रभ ठरतात. याचे उदाहरण म्हणजे क्षय रोगाच्या नव्या व जुन्या प्रतिजैविकांना न जुमानणाऱ्या एमडीआर टीबी, एक्सडीआर टीबी यांसारख्या जहाल जाती निर्माण झाल्या आहेत. नव्या पिढीच्या प्रतिजैविकांचे सेवन करूनच असे रोगी बरे होऊ शकतात.
प्रतिजैविके ही अत्यावश्यक असल्यास आणि गरजेनुसार घेण्यासंबंधी जनजागृतीची आज गरज आहे.
– नारायण वाडदेकर
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org