– हेमंत साने

शेगडीवर स्वयंपाक करतात, तेव्हा धातूची भांडी वापरतात. पण मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये मात्र धातूची भांडी अजिबात वापरत नाहीत. एरवी शेगडीवर, धगधगीत आग सोसणारी धातूची भांडी, मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये उपयोगाची ठरत नाहीत. उपयोग तर सोडाच, मायक्रोवेव्हसाठी धातूची भांडी चक्क अपायकारक ठरतात. तेव्हा या ओव्हनसाठी फक्त काचेची, चिनी मातीची आणि काही खास प्रकारच्या प्लास्टिकची अशी ‘मायक्रोवेव्ह सुरक्षित’ भांडीच वापरतात.

मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये, विद्युत ऊर्जेचं सूक्ष्म विद्युतचुंबकीय लहरींमध्ये रूपांतर करणारं ‘मॅग्नेट्रॉन’ नावाचं उपकरण असतं. या उपकरणातून साधारणपणे २.४५ गिगाहर्ट्झ, म्हणजे एका सेकंदात २.४५ अब्ज कंपनं इतक्या कंपनसंख्येच्या विद्युतचुंबकीय लहरी निर्माण होतात. धातूंमध्ये, मुक्त इलेक्ट्रॉन्स मोठ्या प्रमाणावर असतात. यामुळे धातूंमध्ये फारशी रिकामी जागा नसते. मुक्त इलेक्ट्रॉन्स या लहरींना धातूंच्या आरपार जाण्यास अटकाव करतात.

जर अन्न शिजवण्यासाठी धातूचं भांडं वापरलं, तर उच्च कंपनसंख्या असलेल्या विद्युतचुंबकीय लहरी, धातूच्या पृष्ठभागावर आपटून मागे जातात आणि परत परत भांड्यावर आपटत राहतात. या त्यांच्या सततच्या आपटण्यामुळे, भांड्यावर विद्युतभार जमा होतो. काही क्षणांतच तो इतका वाढतो की, ठिणग्या पडायला लागतात. त्यामुळे प्रसंगी आगसुद्धा लागू शकते, मॅग्नेट्रॉनसारख्या मायक्रोवेव्ह ओव्हनच्या अंतर्गत भागांचं नुकसान होऊ शकतं.
म्हणून मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये वापरण्यासाठी, विशिष्ट प्रकारची भांडी असतात. काच व चिनी मातीपासून ही विशेष भांडी तयार करतात. ही भांडी ज्या पदार्थापासून बनली जातात, त्यात ‘मुक्त’ इलेक्ट्रॉन्स जवळजवळ नसतातच. त्यामुळे अशा पदार्थांमध्ये असलेल्या पोकळीतून विद्युतचुंबकीय लहरी सहजी आरपार जाऊ शकतात.

मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये वापरता यावीत, म्हणून काच आणि मातीसारखी, विशिष्ट प्रकारच्या प्लास्टिकची भांडीसुद्धा असतात. ज्या भांड्यांवर ‘मायक्रोवेव्ह सेफ’ असं इंग्रजीत लिहिलेलं असेल. तीच भांडी मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये वापरावीत.

‘मायक्रोवेव्ह सेफ’ म्हणजेच ‘मायक्रोवेव्ह सुरक्षित’ भांडी मायक्रोवेव्हमधल्या लहरींमुळे वितळत नाहीत, त्यांच्या आकारात काहीही बदल होत नाही. शिवाय मायक्रोवेव्ह लहरींमुळे, त्यांच्यातून कुठलाही रासायनिक पदार्थ बाहेर पडत नाही आणि ती या लहरींना सहजी आरपार जाऊ देतात. या गुणधर्मांमुळे, अशा भांड्यात ठेवलेलं अन्न गरम होतं पण दूषित होत नाही. शिवाय भांडी आणि ओव्हनही सुरक्षित राहतात.

कागदाचे कप किंवा त्यासारखी कागदी भांडी वापरू नयेत; कारण अति तापल्यामुळे, ती पेट घेऊ शकतात. त्यांच्यावरचं प्लास्टिकचं पातळ आवरण वितळून ते अन्नपदार्थात मिसळू शकतं. इतकंच नव्हे तर, एखाद्या काचेच्या भांड्यावर धातू वापरून काढलेली नक्षी असली, तरी ते भांडं मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये वापरून चालत नाही.

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org