बुध हा सूर्यमालेतील आकाराने सर्वात लहान आणि सूर्याला सर्वात जवळ असणारा ग्रह आहे. बुध सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो. त्याची कक्षगती सर्व ग्रहांमध्ये जास्त म्हणजे ४८ किलोमीटर प्रति सेकंद इतकी आहे. बुध सूर्याभोवती केवळ ८८ दिवसांत एक प्रदक्षिणा पूर्ण करतो पण स्वत:भोवती फिरताना मात्र त्याला ५९ दिवस लागतात. बुधाची इतर वैशिष्ट्ये म्हणजे त्याचा एक सौर दिन हा १७६ दिवसांचा असून त्याचे नक्षत्र वर्ष ८८ दिवसांचे आहे म्हणजेच सौर दिन हा नक्षत्रवर्षापेक्षा मोठा आहे. वर्षापेक्षा दिवस मोठा हा एक सृष्टी चमत्कार आहे.
बुधावर एखाद्या ठिकाणी पूर्वेला सूर्य उगवला की तो ८८ दिवसांनी पश्चिमेला मावळतो म्हणजेच ८८ दिवस सतत प्रकाश व पुन्हा ८८ दिवस सतत अंधार असे दिवस-रात्र बुधावर आहेत. बुध सूर्यापासून जवळ असला तरी; त्याची भ्रमणकक्षा दीर्घ वर्तुळाकृती असल्याने त्याच्या सूर्यापासूनच्या कमाल व किमान अंतरामध्ये जास्त तफावत दिसून येते. त्यामुळे बुधाच्या सूर्याकडील बाजूच्या व विरुद्ध बाजूच्या तापमानात मोठी तफावत असते; अशा टोकाच्या तापमानामुळे व वातावरणाच्या अभावामुळे बुधावर जीवसृष्टी नाही.
सूर्य आणि बुध यांच्या कोनीय गतीत असणाऱ्या फरकामुळे बुधावर होणाऱ्या सूर्योदय व सूर्यास्तात, पृथ्वीवर होणाऱ्या सूर्योदय व सूर्यास्तापेक्षा, मजेदार फरक दिसून येतो. बुधाच्या भ्रमण कक्षेवर उपसूर्य बिंदूच्या पुढे आणि मागे, सूर्य आणि बुधाची कोनीय गती समान असते. जोपर्यंत सूर्याची भासमान कोनीय गती बुधापेक्षा कमी असते तोवर सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे जात राहतो; जेव्हा सूर्याची कोनीय गती बुधापेक्षा जास्त होते तेव्हा सूर्य पश्चिमेकडून पुन्हा पूर्वेकडे जाऊ लागतो; हा प्रवास आठ दिवस सुरू राहतो. दोघांची कोनीय गती एकसारखी झाली की सूर्य पुन्हा पूर्वेकडून पश्चिमेकडे मार्गक्रमण करू लागतो.
उपसूर्यबिंदूपाशी बुधाचा जो रेखांश सूर्यासमोर असतो त्याच्या दोन्ही बाजूंना नव्वद अंशावर असणाऱ्या रेखांशापैकी एकावर सूर्योदय तर दुसऱ्यावर सूर्यास्त होणार असतो. पहिल्या रेखांशावर सूर्य पूर्वेला उगवतो; थोडा वर येऊन पुन्हा अचानक मागे फिरून अस्ताला जातो, पण थोड्याच वेळात परत एकदा सूर्योदय होतो. याउलट विरुद्ध बाजूच्या रेखांशावर आधी पश्चिमेला सूर्यास्त होतो पण थोड्याच वेळात पश्चिमेला पुन्हा सूर्य उगवतो. मग काही काळ सूर्य आकाशात दर्शन देत राहतो. नंतर मात्र तो पुन्हा अस्ताला जातो व पुन्हा ८८ दिवस उगवत नाही.
डॉ. योगिता पाटील
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org