– हेमंत चोपडे

मोबाइलचा कॅमेरा हा प्रकाश, इलेक्ट्रॉनिक्स व संगणक या तीनही शास्त्रांचा सुंदर संगम आहे. तो अत्यंत वेगाने आणि अचूकपणे प्रकाशाचं डिजिटल प्रतिमेत रूपांतर करतो. मोबाइल कॅमेरा हा प्रत्यक्षात एक सूक्ष्म डिजिटल प्रकाशग्रहण प्रणालीच आहे.

जेव्हा आपण मोबाइलने फोटो काढतो, तेव्हा वस्तूवरून परावर्तित झालेली प्रकाशकिरणं मोबाइलच्या लेन्सवर म्हणजे भिंगावर पडतात. मोबाइलमध्ये अनेक सूक्ष्म भिंगांचा संच असतो, जो या किरणांना एकत्रित करून एका ठिकाणी केंद्रित करतो. भिंगाच्या मागे एक ‘इमेज सेन्सर’ असतो. या सेन्सरवर लाखो लहान-लहान बिंदू असतात, ज्यांना ‘पिक्सल्स’ असं म्हणतात. उदाहरणार्थ ५० मेगापिक्सलच्या कॅमेर्‍याच्या सेन्सरवर ५ कोटी पिक्सल्स असतात. हे पिक्सल्स त्यांच्यावर पडणारा प्रकाश मोजतात. प्रकाश जितका जास्त, तितकी तिथे जास्त वीज तयार होते. सोप्या भाषेत, हा सेन्सर प्रकाशाचं रूपांतर इलेक्ट्रॉनिक सिग्नलमध्ये करतो. पण या टप्प्यावर फोटोला रंग नसतात, तो फक्त काळा-पांढर्‍या फोटोचा डेटा असतो. या काळ्या पांढर्‍या फोटोला रंग देण्यासाठी सेन्सरच्या वर एक ‘कलर फिल्टर’ बसवलेला असतो. हा फिल्टर फक्त लाल, हिरवा आणि निळा इतकेच रंग ओळखतो. या तीन मुख्य रंगांच्या मिश्रणातून जगभरातले कोट्यवधी रंग तयार होतात. कोणता पिक्सल किती प्रमाणात कोणता रंग घेतोय, याची नोंद केली जाते.

आतापर्यंत मिळालेला डेटा हा केवळ शून्य आणि एकच्या स्वरूपातील असतो. हा डेटा मोबाइलच्या मुख्य प्रोसेसरमधील ‘इमेज सिग्नल प्रोसेसर’कडे पाठवला जातो. हा प्रोसेसर कॅमेर्‍याचा ‘मेंदू’ असतो. हा या कच्च्या डेटावर प्रक्रिया करतो. फोटोमधील अंधुक भाग उजळवणं, रंगांचा समतोल साधणं, चेहरा ओळखणं आणि फोटो सुधारणं ही सर्व कामं हा मेंदू करतो.

आजकालच्या फोनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तासुद्धा वापरली जाते. या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्यानं क्षणार्धात फोटो अधिक सुंदर बनवला जातो. उदाहरणार्थ आकाशाचा रंग जास्त निळा केला जातो किंवा फोटोत चेहर्‍यावर पडलेली सावली काढली जाते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तो डेटा ‘जेपेग’ किंवा इतर इमेज फाइलमध्ये बदलला जातो आणि मोबाइलच्या गॅलरीमध्ये एक सुंदर फोटो साठवला जातो. काही वेळा तो फोटो त्याच क्षणी दूर क्लाउडवरसुद्धा पाठवून साठवला जातो. असं केल्यानं अगदी फोन जरी हरवला तरी फोटो सुरक्षित राहतो. थोडक्यात, मोबाइल कॅमेरा प्रकाशाला इलेक्ट्रॉनिक सिग्नलमध्ये बदलतो आणि त्या सिग्नलला इतर काही माहितीच्या मदतीनं गणिताचं साहाय्य घेऊन एका फोटोचं स्वरूप देतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही सगळी प्रक्रिया अगदी क्षणार्धात पार पडते.