नवदेशांचा उदयास्त : मंगोलांचे ताजिकिस्तान

सातव्या शतकाच्या अखेरीस या प्रदेशात व्यापारामुळे अरबांचा संपर्क वाढून त्यांनी येथे इस्लाम रुजविला.

मंगोल सम्राट चेंगिजखान याने तेराव्या शतकाच्या सुरुवातीस ताजिकिस्तानचा प्रदेश ताब्यात घेतला.

– सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com

इसवी सनाच्या दुसऱ्या तिसऱ्या शतकात ताजिकिस्तानच्या प्रदेशात बौद्ध धर्माचा प्रसार झाला होता आणि काही ज्यू कुटुंबेसुद्धा येथे स्थायिक झाली होती. पुढे सातव्या शतकाच्या अखेरीस या प्रदेशात व्यापारामुळे अरबांचा संपर्क वाढून त्यांनी येथे इस्लाम रुजविला. पुढे नवव्या आणि दहाव्या शतकात या प्रदेशात इराणच्या सामानी साम्राज्याची सत्ता राहिली. इराणचाच एक भाग झालेल्या ताजिकिस्तानच्या प्रदेशात सामानी सुलतानांनी शहरांचा चांगला विकास केला, यामध्ये समरकंद आणि बुखारा ही दोन शहरे भरभराटीला आली. सध्या ही शहरे उझबेकिस्तानात आहेत. तेराव्या शतकाच्या सुरुवातीस मंगोल सम्राट चेंगिजखान याने मध्य आशियातील अनेक प्रदेशांवर आक्रमण करून त्याच्या अमलाखाली आणले. ताजिकिस्तानचा प्रदेश ताब्यात घेऊन त्याने तेथील समरकंद, बुखारासारखी वैभवशाली शहरे लुटली, शेकडो ताजिकी लोकांची कत्तल केली.

मंगोल सम्राट चेंगिज खान याचा मुलगा चुगताई खानच्या सैन्यात असलेल्या तैमुरलंग ऊर्फ तैमूर याने पुढे इ.स. १३७० साली किर्गिजस्तानचा बराच प्रदेश त्याच्या अमलाखाली आणला. तैमूरच्या घराण्याची सत्ता या प्रदेशावर पुढे सव्वाशे वर्षे टिकली. त्यांचा सर्व प्रदेश १५०६ मध्ये उझबेक सुलतान मुहम्मद शायबानी खान या तुर्की वंशाच्या राज्यकर्त्यांने घेतला. तैमूरच्या मंगोल वंशाचा जहीर-उद्-द्दीन बाबर हा फरगाना प्रांताचा शासक शायबानी खानाच्या हल्ल्यातून कसाबसा जीव वाचवून तेथून पळून भारतीय प्रदेशात आला. पुढे १५२६ मध्ये बाबराने भारतात स्थापन केलेले राज्य हे पुढे मोगल साम्राज्य या नावाने विस्तार पावले.

सोळाव्या शतकाच्या अखेरीस शायबानी घराण्याच्या सत्तेचा अस्त होऊन ताजिकी प्रदेशात बुखारा, कोकांद, जानीद वगैरे खानेतमध्ये सत्ता विभागली गेली. या सर्व खानेतपैकी बुखाराची आमिरात हे सर्वात प्रबळ आणि सर्वाधिक मोठे राज्यक्षेत्र होते. बुखारा हे शहर आणि परिसर पुढे उझबेकिस्तानात समाविष्ट झाले. एकोणिसाव्या शतकाच्या साधारणत: मध्यावर रशियाच्या झार साम्राज्याने मध्य आशियातील प्रदेशांवर आक्रमण करून आपल्या राज्यक्षेत्राचा विस्तार करायला सुरुवात केली, आणि १८६४ ते १८८५ या काळात त्यांनी बराच मोठा प्रदेश रशियन साम्राज्यात सामील केला. या नव्या विस्तारित प्रदेशाला त्याकाळी रशियात ‘रशियन तुर्कस्तान’ असे संबोधले जाई.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mongol rule in tajikistan history of tajikistan zws

Next Story
इतिहासात आज दिनांक.. ११ सप्टेंबर
ताज्या बातम्या