कुतूहल- तुती लागवड व रेशीम अळ्या

तुती हे रेशीम अळ्यांचे एकमेव खाद्य आहे. त्यामुळे तुतीच्या एकरी उत्पादनावर तसेच पानांच्या गुणवत्तेवर रेशीम शेतीचे यश अवलंबून आहे. तुतीची लागवड दोन प्रकारे करता येते. पहिल्या प्रकारात प्रथम रोपवाटिका तयार करून रोपे बनवली जातात. नंतर या रोपांची मुख्य शेतात पुनर्लागवड केली जाते. दुसऱ्या प्रकारात तुतीच्या झाडाच्या हिरवट फांद्यांपासून कांडय़ा तयार करून त्या शेतात लावल्या जातात.

तुती हे रेशीम अळ्यांचे एकमेव खाद्य आहे. त्यामुळे तुतीच्या एकरी उत्पादनावर तसेच पानांच्या गुणवत्तेवर रेशीम शेतीचे यश अवलंबून आहे. तुतीची लागवड दोन प्रकारे करता येते. पहिल्या प्रकारात प्रथम रोपवाटिका तयार करून रोपे बनवली जातात. नंतर या रोपांची मुख्य शेतात पुनर्लागवड केली जाते. दुसऱ्या प्रकारात तुतीच्या झाडाच्या हिरवट फांद्यांपासून कांडय़ा तयार करून त्या शेतात लावल्या जातात.
रोपवाटिका पद्धतीने केलेल्या तुती लागवडीत शेतकऱ्याला शेत तयार करण्यास पुरेसा वेळ मिळतो. तसेच सशक्त रोपांची निवड करून ती रोपेच मुख्य शेतात लावता येतात. जमिनीची मशागत, मातीचा पोत, वापरली जाणारी रासायनिक तसेच सेंद्रिय खते, तण व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, औषध फवारण्या या सर्व बाबींवर तुतीच्या पानांची गुणवत्ता आणि उत्पादन अवलंबून आहे. पानांच्या गुणवत्तेवर कोशांची गुणवत्ता अवलंबून आहे.
व्हिक्टरी-१(व्ही१), एस३६ ही तुतीची प्रचलित वाणे आहेत. रेशीम किडय़ाच्या जीवनक्रमात अंडी, अळी, कोश, फुलपाखरू अशा चार अवस्था असतात. पहिल्या तीन अवस्था पूर्ण होण्यास २६ ते २८ दिवसांचा कालावधी लागतो. कोशावस्था १० ते १५ दिवसांची असते. ती पूर्ण झाल्यावर कोशातून फुलपाखरू बाहेर पडते. मादी फुलपाखरू परत अंडी घालते.
एका रेशीम कीटक फुलपाखराने घातलेल्या अंडय़ांना ‘एक अंडीपुंज’ असे म्हणतात. एका अंडीपुंजात सुमारे ६०० अंडी असतात. अंडी खसखशीच्या दाण्याप्रमाणे असतात. रेशीम शेतीसाठी शासकीय रेशीम खाते अंडीपुंज उपलब्ध करून देते.
कोलार गोल्ड, सुवर्ण आंध्रा, सी.एस.आर., प्युअर सीड पर्पज अशा जातींच्या रेशीम कीटकांचे अंडीपुंज उपलब्ध आहेत. तुतीच्या बागेच्या आकारानुसार अंडीपुंज विकत घ्यावे लागतात. साधारणपणे एक एकर तुतीची बाग असेल तर जास्तीतजास्त २५० ते ३५० अंडीपुंज चालतात. अंडीपुंज उबवणे, त्यातून बाहेर आलेल्या अळ्यांना वाढवणे, त्यांची काळजी घेणे यासाठीचे तांत्रिक ज्ञान शासकीय रेशीम खाते शेतकऱ्यांना देते. अंडय़ातून बाहेर आलेली अळी अतिशय सूक्ष्म असते. ती वाढीच्या पाच अवस्था पूर्ण करते, म्हणजेच चार वेळा तापावर बसते, पक्व होते आणि स्वत:भोवती कोश निर्माण करते.

जे देखे रवी..  – लढा-८ (सुधीर जोशी)
‘त्या’ भूखंडावरचे आक्रमण आणि आक्रीत अब्दुल रेहमान अंतुले यांच्यामुळे संपले, असे मंत्रालयात ठरले असले तरी या भानगडी इतक्या सोप्या नसतात. अंतुले यांनी बोलाविलेल्या बैठकीत हिंदुजांनी आम्ही भूखंड अबाधित ठेवू, असे तोंडी म्हणणे म्हणजे दगडावरची रेघ नसते हे काही वर्षांनी कळायचे होते. पण सद्य:स्थितीत तो भूखंड हस्तांतरित करावा, अशा अर्थाचा प्रस्ताव महानगरपालिकेच्या सुधार समितीत पडून होता. सगळ्या राजकीय पक्षांचा पाठिंबा असलेला हा ठराव असा पडून कसा राहिला? याला ‘अर्थपूर्ण’ कारणे असतात हे तेव्हा खरोखरच माहीत नव्हते. पुढे अनेक वर्षांनी एका मंत्रालयातल्या ज्येष्ठ अधिकाऱ्याला मी विचारले की, ‘बोफोर्स तोफांच्या घोटाळ्यात हिंदुजांनी काय किंवा इतरांनी काय खरेच पैसे दिले का हो?’ तो अधिकारी माझ्याकडे बघतच राहिला. मला म्हणाला ‘हत्तीला सोंड असते का हो?’ हल्ली हल्लीपर्यंत माझे सगळे गुजराती मित्र पैसे खाण्याविषयी मला भरभरून वर्णने करीत शिकवतात, एवढेच नव्हे तर हर्षद मेहता हा सटोडिया निर्दोष होता. त्याला बँकेचे अधिकारी आणि मंत्र्यांनी फसवला, अशी नवलकथाही सांगतात. ‘खरेखुरे ईश्वर जाणे’ असेही मला म्हणता येत नाही. कारण ईश्वर या विषयात मला जरा कमीच गती आहे. वरचा महानगरपालिकेतला प्रस्ताव गुंडाळण्यात यावा म्हणून मी शिवसेनेच्या सुधीर जोशींना साकडे घातले. हा माणूस भल्यातला भला आहे. मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषेसाठी प्रखर प्रयत्न करणारा, लोकाधिकारशाहीचा प्रवर्तक त्या मुद्दय़ांवर वज्राहूनही कठोर होता. पण तो एक सुसंस्कृत, सभ्य, स्वच्छ, सरळ, सहृदय माणूस होता हे महत्त्वाचे. त्यांच्या हाताला एकदा जबर लागले होते तेव्हा मी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली होती. तेव्हाही या माणसाने कधी एक प्रबळ राजकारणी म्हणून कणभरही अरेरावी केली नव्हती. टिळक रुग्णालयातच शस्त्रक्रिया करून घेतली. हल्लीसारखे जेवढा माणूस मोठा तेवढे रुग्णालय पंचतारांकित असे त्यांनी काही केले नाही. महानगरपालिकेच्या समित्यांमध्ये ठराव पास तरी होतो, नापास होऊन बाहेर टाकला जातो किंवा केवळ नोंदला जाऊन बासनात गुंडाळला जातो. त्यातली तिसरी गोष्ट आपण करू या, असे त्यांनी मला सुचविले.
 स्वत:च्या गाडीने ते मला सुधार समितीच्या अध्यक्षांकडे घेऊन गेले. आपल्या पक्षाविरुद्ध उभे राहिले आणि तो प्रस्ताव बारगळलेल्यात जमा झाला. मागे म्हटले तसे शिवसेना महाराष्ट्रात सत्तेत आली तेव्हा सुधीरभाऊ जर मुख्यमंत्री झाले असते तर महाराष्ट्रावर आजची स्थिती आली नसती, असे माझे म्हणणे आहे. असो. हल्ली गाठी-भेटी कमी होतात. मात्र त्यांच्याकडे जावे असे सारखे वाटत राहते.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस  – हृद्रोग : भाग ३
अनुभविक उपचार – १) हृद्रोगाची निश्चिती झालेली असल्यास पण मधुमेह व रक्तदाब नसल्यास सुवर्णमाक्षिकादिवटी, शंृगभस्म, लाक्षादिगुग्गुळ प्र. ३ गोळ्या दोन वेळा व जेवणानंतर अर्जुनारिष्ट एवढी औषधे पुरी होतात. २) रक्तदाब असल्यास गोक्षुरादिगुग्गुळ, रसायनचूर्ण पांडुता असल्यास चंद्रप्रभा; मधुमेह असल्यास मधुमेहवटी; ‘फाफू’ होत असल्यास अभ्रकमिश्रण अशी औषधे तारतम्यानी द्यावी. ३) फाजील वजन असणाऱ्यांनी शंृग, सुमादि, लाक्षादि याबरोबर गोक्षुरादि व त्रिफळा गुग्गुळ ही जादा औषधे घ्यावीत. ४) रुग्णामध्ये फाजील चरबी नसल्यास व झडपेचा विकार निश्चित आहे, असे हिरवेनिळे होण्याच्या लक्षणावरून ठरले असता; अर्जुनसालीचे सिद्ध दूध घ्यावे. दहा ग्रॅम अर्जुनसाल, एक कप दूध, एक कप पाणी एकत्र आटवावे. पाणी आटवून दूध उरल्यावर दूध गाळून ते प्यावे. असे दिवसातून दोन वेळा करावे. ५) रोगी कृश, रूक्ष असा असल्यास अर्जुनसिद्धघृत सकाळ, सायंकाळ दोन दोन चमचे घ्यावे. ६) झोप येत नसल्यास किंवा खंडित असल्यास निद्राकरवटी सहा गोळ्या झोपताना व दोन्ही जेवणांनंतर सारस्वतारिष्ट चार चार चमचे समभाग पाण्याबरोबर घ्यावे. ७) रुग्ण लहान वयाचा असल्यास अर्जुनसाल व सांबरशिंगाचे गंध माफक प्रमाणात दुधाबरोबर घ्यावे. त्याचे २५-३० वेढे जोर करून उगाळावयास हवेत. ८) हृद्रोगात ताप, सर्दी ही लक्षणे वारंवार असल्यास ज्वरांकुश गोळ्या सकाळ, सायंकाळ सहा, सहा घ्याव्यात. ९) छातीत खूप दुखत असल्यास लाक्षादिगुग्गुळ व रक्तदाब विकाराचा त्रास असल्यास गोक्षुरादिगुग्गुळ प्र. तीन गोळ्या सुवर्णमाक्षिकादिवटी व शंृगभस्म तीन तीन गोळ्यांबरोबर घ्याव्या. १०) मलावरोध असल्यास व त्यामुळे वायू बिघडून श्वास लागत असल्यास, मलप्रवृत्ती साफ होण्याकरिता अवस्था बघून त्रिफळा किंवा गंधर्वहरितकी चूर्ण घ्यावे. फार क्षार असलेली औषधे घेऊ नयेत. ११) सदैव बारीक ताप, कडकी असल्यास ल. मा. वसंत, ज्वरांकुश प्र. ६ गोळ्या व सुवर्णमाक्षिकादि तीन गोळ्या सकाळ, सायंकाळ रिकाम्या पोटी घ्याव्यात.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत –  १० जुलै
१९०३> प्रवासवर्णनकार, समीक्षक रामचंद्र भिकाजी जोशी यांचा जन्म. मजल दरमजल, वाटचाल आदी त्यांची स्थलवर्णनात्मक पुस्तके. काचेचे कवच, झम्मत हे त्यांचे कथासंग्रह तर ‘वाताहत’ ही कादंबरी. ‘सोन्याचा उंबरठा’ हे व्यक्तिचित्रणपर पुस्तक तर ‘साठवणी’ हे स्वत:च्या जीवनातील आठवणींचे पुस्तक म्हणजे त्यांचे आत्मचरित्रच होय.
१९१३> कवयित्री पद्मा तथा पद्मावती विष्णू गोळे यांचा जन्म. ‘प्रीतिपथावर’ हा त्यांचा पहिला संग्रह. यानंतर नीहार, स्वप्नजा, आकाशवेडी, श्रावणमेध इ. काव्यसंग्रह. स्त्रीचे भावविश्व त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी आहे. याशिवाय ‘नवी जाणीव’, ‘स्वप्न’ या नाटिका, ‘वाळवंटातील वाट’ ही कादंबरी इ. साहित्य संपदा.
१९१८> कथाकार, एकांकिकाकार, समीक्षक चारुशीला बाळकृष्ण गुप्ते यांचा जन्म. ‘आजची मराठी कविता’, ‘मराठी साहित्यदर्शन’ ही पुस्तके त्यांच्या मराठी वाङ्मयीन अभ्यासाची साक्ष देतात.
१९६५> इतिहास संशोधक आनंदराव भाऊ फाळके यांचे निधन. शिंदेशाहीच्या इतिहासाची साधने हे फाळके यांचे महत्त्वाचे कार्य. यातून शिंदे राजघराण्याचा पत्रव्यवहार आठ खंडांत प्रसिद्ध केला.
– संजय वझरेकर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mulberry cultivation and silk larvae