आपण गाण्याचे कार्यक्रम ऐकताना वेगवेगळी वाद्यं वाजताना ऐकली आहेत. या प्रत्येक प्रकारच्या वाद्यातून वेगवेगळे आवाज येतात. हे आवाज किंवा नाद कसे निर्माण होतात? हे नाद वस्तूंच्या कंपनांमुळे तयार होतात. हवेच्या माध्यमातून या नादाच्या लहरी आपल्या कानांपर्यंत पोहोचल्या, की आपण म्हणतो आपल्याला त्या वाद्याचा आवाज ऐकू आला. सर्व प्रकारच्या वाद्यांमध्ये ही कंपनं निर्माण केली जातात.
वाद्यांचे तीन मूळ प्रकार आहेत; तंतुवाद्य, वायुवाद्य आणि चर्मवाद्य! या प्रत्येक प्रकारच्या वाद्यांसाठी, वेगवेगळं साहित्य वापरलं जातं. त्यामुळे प्रत्येक वाद्यामध्ये, कंपनांचा स्रोत आणि कंपनं निर्माण करण्याची पद्धत वेगवेगळी असते.
तंतुवाद्यामध्ये धातूच्या तारा कंप पावतात. उदा. गिटार, वीणा, सतार. यामध्ये तार जितकी घट्ट, लहान किंवा बारीक तितका आवाज वरच्या स्वराचा म्हणजे ‘हाय पिच’ येतो, पण तार जर सैल, लांब किंवा जाड असेल तर आवाज खालच्या स्वराचा म्हणजे ‘लो पिच’ येतो.
वायुवाद्याच्या आकारामुळे, वाद्याच्या आत तयार झालेला हवेचा स्तंभ कंप पावतो. उदा. बासरी, सनई. हे फुंकण्याची पद्धत आणि हवेच्या स्तंभाची लांबी बदलल्यामुळे नाद बदलतो.
चर्मवाद्यांमध्ये चामडयाच्या पडद्यावर आघात केल्यावर त्यामध्ये कंपनं निर्माण होतात. उदा. तबला, मृदंग, ढोलकी. पडद्यावर ताण जितका जास्त, तितका नाद उंच येतो. संगीत मैफील सुरू होण्यापूर्वी तबला वादक गायकाच्या आवाजाच्या पट्टीनुसार तबला लावताना सर्वांनी पाहिलं असेलच!
वेगवेगळ्या वाद्यांमध्ये नादाचा पोतही वेगळा असतो कारण वाद्यांमधून निघणार्या ध्वनिलहरींची रचना वेगवेगळी असते. ध्वनिलहरींना वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी असते आणि प्रत्येक प्रकारच्या नादाला विशिष्ट वारंवारता असते. शिवाय ज्या वेळी एखाद्या वाद्यामधून ध्वनिलहरी उत्पन्न होतात, त्या वेळी मूलभूत नादाबरोबर, काही सूक्ष्म नादही तयार होतात. वाद्याचे साहित्य आणि त्याची रचना यावर हे सूक्ष्म नाद कसे व किती उत्पन्न होतात, ते अवलंबून असतं. याचाच परिणाम असा होतो की प्रत्येक वाद्याला त्याचा वैशिष्ट्यपूर्ण आवाजाचा पोत मिळतो. म्हणूनच गिटार, वीणा, सतार ही सर्व तंतुवाद्यं असली तरी त्यातून आवाजाचे वेगवेगळे पोत निर्माण होतात. जलतरंग वाजवताना भांड्यातल्या पाण्याचं प्रमाण बदललं तर आवाज वेगळा येतो. तबला, मृदंग, ढोलकी ही तालवाद्यंही वेगवेगळे नादाचे पोत निर्माण करतात. बासरी आणि सनई वायुवाद्यं असूनही दोघांच्या आवाजात खूप फरक जाणवतो.
याचाच अर्थ असा की कंपनांचे स्रोत, मूलभूत व सूक्ष्म नादाचं मिश्रण अशी ध्वनिलहरींची अनोखी रचना आणि वाद्यांचे भौतिक गुणधर्म यामुळे प्रत्येक वाद्याचा नाद हा वेगळा असतो.
डॉ. मुग्धा पत्की
मराठी विज्ञान परिषद
