मानवी समाजाची ऊर्जेची गरज दिवसेंदिवस वाढतच आहे. खाणीतून कोळसा आणि तेल काढून ही गरज भागविली जात आहे. परंतु हे स्रोत मर्यादित आहेत. याहीपेक्षा मोठा प्रश्न आहे प्रदूषणाचा. खनिज इंधनाच्या ज्वलनाने हरितगृह वायू तयार होतात. या वायूमुळे पृथ्वीचे तापमान वाढत चालले आहे, म्हणून हरितगृह वायू निर्माण न करणाऱ्या या इंधनाचा शोध सुरू झाला. यात अर्थातच पसंती मिळाली ती हायड्रोजनला. हा वायू असा आहे की त्याचे संपूर्ण ज्वलन होऊन चांगली उष्णता मिळते. या वायूच्या ज्वलनाने कोणत्याही प्रदूषकाची निर्मिती होत नाही. या सगळय़ा चांगल्या गोष्टी असल्या तरी मोठय़ा प्रमाणावर हे इंधन मिळविणे हे जिकिरीचे तसेच खर्चाचे काम आहे. पाण्याचे पृथक्करण करून किंवा मिथेन वायूचे विघटन करून हा वायू मिळवतात. या दोन्ही प्रक्रिया करायला ऊर्जा लागते. हायड्रोजन वायूचा मोठा साठा सापडल्याशिवाय या समस्येवर तोडगा काढता येणार नाही.

अलीकडे केलेल्या काही खोदकामातून असे लक्षात आले की पृथ्वीच्या पोटात जसा नैसर्गिक वायूचा साठा आहे तसाच नैसर्गिक हायड्रोजनचादेखील साठा आहे. माली बेटावर विहीर खोदत असताना ही बाब लक्षात आली. विहिरीला पाणी लागले नाही, परंतु एक वायू मात्र बाहेर पडू लागला. या वायूचा अभ्यास केल्यावर तो ९६ टक्के शुद्ध हायड्रोजन असल्याचे लक्षात आले. तेथे हायड्रोजन वापरून वीजनिर्मिती करणारे केंद्र उभारण्यात आले. ते मागील पाच वर्षे अविरत चालू आहे. भूगर्भात हायड्रोजन वायूचा साठा असण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर असे साठे आणखी कोठे आहेत याचा शोध घेणे सुरू झाले. काही ठिकाणी जमिनीवर साठे आहेत. परंतु मोठे साठे समुद्रात असल्याचे लक्षात आले. तेथील हायड्रोजन कसा मिळवायचा या विवंचनेत सध्या तंत्रज्ञ आहेत.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
moong dal scrub for glowing skin
Skin Care Tips: मुग डाळीचा असा वापर कराल तर खऱ्या वयापेक्षा दिसाल लहान व तरुण; सुरकुत्या, पिंपल्सही होतील दूर!
How to Identify Chemically Injected Watermelon FSSAI Suggestion
कलिंगड सुया टोचून, पावडर घालून पिकवलाय का हे एका झटक्यात ओळखा; ‘या’ खुणा पाहूनच करा खरेदी
What Is Sugar Made Of Milk Honey Table Sugar
साखर हे पांढरं विष? दूध, मध, साध्या साखरेत नेमकं असतं काय? १० दिवस साखर खाल्ली नाही तर कसं बदलेल शरीर?

हायड्रोजन हे अतिशय क्रियाशील मूलद्रव्य आहे. तो स्वतंत्र स्वरूपात भूगर्भात कसा काय आढळतो, हा वैज्ञानिकांना पडलेला एक महत्त्वाचा प्रश्न आहे. यांची दोन कारणे संभवतात. एक तर धातू क्षारांची पाण्याबरोबर अभिक्रिया होते, यात तयार झालेला हायड्रोजन दगडाच्या फटीत जमा होऊन राहतो. दुसरे कारण म्हणजे किरणोत्सारी पदार्थाचे विघटन. या विघटनानंतर हायड्रोजन वायू निर्माण होतो व दगडात साठून राहतो. पृथ्वीच्या पोटातील हायड्रोजनचे हे साठे आपली स्वच्छ इंधनाची गरज पूर्ण करतील हे चित्र खरोखरच आशादायी आहे.

– डॉ. सुधाकर आगरकर

मराठी विज्ञान परिषद

संकेतस्थळ : http://www.mavipa.org    

ईमेल : office@mavipa.org