इतिहासात आज दिनांक… ८ सप्टेंबर

१६४५ स्पॅनिश साहित्यिक द व्हिल्येगास फ्रांचीस्को गोमेथ दे केव्हेदो यांचे निधन. प्रभावी उपरोधकार, कवी या नात्यांनी त्यांनी स्पॅनिश साहित्यात महत्त्वाचे योगदान दिले.

१६४५ स्पॅनिश साहित्यिक द व्हिल्येगास फ्रांचीस्को गोमेथ दे केव्हेदो यांचे निधन.  प्रभावी उपरोधकार, कवी या नात्यांनी त्यांनी स्पॅनिश साहित्यात महत्त्वाचे योगदान दिले.
१७९० भारताचे १८४२ ते १८४४ या काळातील सर्वसत्ताधीश गव्हर्नर जनरल लॉर्ड एडवर्ड एलनबरो यांचा जन्म. गुलामगिरीच्या विरोधातील कायदा आणि बंगालमधील पोलीसदलात सुधारणा यामुळे ते गाजले.
१९३३ चतुरस्र पाश्र्वगायिका आशा भोसले यांचा जन्म. रसिकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या मंगेशकर भगिनींपैकी आशाताईंनी संगीताच्या क्षेत्रात स्वत:चे अजरामर स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या आवाजावर आजतागायत वयाचा परिणाम जाणवत नाही. मराठी भावगीतं, खटय़ाळ गीतं, मादक, उडत्या चालीची गीतं, आनंद आणि दु:खाचा शिडकाव करणारी गीतं त्या ज्या सहजतेने गातात त्याला तोड नाही. देशी-विदेशी भाषांमध्ये त्या गायलेल्या आहेत. शाळकरी वयातच त्यांनी मराठी चित्रपटासाठी गाणं गायलं तर १९४८ मध्ये हंसराज बहल यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली ‘चुनरिया’ चित्रपटासाठी गायन केलं. वैयक्तिक आयुष्यातील दुख, संघर्ष, प्रतिकूलता या कशाचीही पर्वा न करता त्यांनी परिश्रम, जिद्द, प्रतिभा यांच्या जोरावर यश खेचून आणलं. ओ.पी. नय्यर, आर.डी. बर्मन यांच्याकडे त्यांनी असंख्य गायलेली गाणी गाजली. भावगीत, नाटय़गीत, भजन, लावणी, कव्वाली, डिस्को,  विरहगीत, द्वंदगीत, गझल, रिमिक्स या सगळ्याच प्रकारांत त्यांनी स्वत:चा ठसा उमटविला. चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ त्यांना मिळाला आहे.
प्रा. गणेश राऊत  
ganeshraut@solaris.in

सफर काल-पर्वाची :
पीटरकन्या : कॅथरिन द ग्रेट
झार पीटर दि ग्रेटची दुसरी मुलगी एलिझाबेथ ही काही काळ रशियाची झारिना म्हणून कारभार पाहत होती. तिच्या मृत्यूनंतर तिचा भाचा पीटर तिसरा हा इ. स. १७६२ मध्ये राजेपदावर आला. हा डोक्याने अर्धवट, लहरी, व्यसनी होता. त्याची पत्नी कॅथेरिन ही एका जर्मन संस्थानाची राजकन्या होती. पीटरच्या काही निर्णयांमुळे सर्व उमराव आणि धर्मगुरू त्याच्याविरोधात गेले होते. पीटरची पत्नी कॅथेरिन चाणाक्ष होती. कॅथेरिन व तिचा प्रियकर एक झाले. पीटर बाहेरगावी गेला असता सर्व उमराव धर्मगुरूंना बोलावून स्वत:ला रशियाची झारिना म्हणून शपथविधी करवून घेतला. जुलै १७६२ मध्ये पती पीटर तिसरा याचा तिने खून करवून घेतला.
सत्तेवर आल्यावर दोन वर्षे सावधपणे तिने कारभार केला. आपल्याला सम्राज्ञी म्हणून मान्यता न देणाऱ्या देशांशी तिने राजनैतिक संबंध तोडले. राजकारणात पॅनिम व पोटोमकिन हे दोन मुत्सद्दी तिला सल्ला देत. रशियावर त्या काळात तीन देशांकडून आक्रमणे होत. त्यापैकी पीटर द ग्रेटने स्वीडनचा बीमोड केला होताच. कॅथरिनने तुर्कस्तानबरोबर युद्ध करून विजय मिळविला. त्यात तुर्काचा दक्षिण रशियातला प्रदेश, काळ्या समुद्रापर्यंतचा प्रदेश तिने घेतला. पोलंडबरोबर युद्ध करून लिथुनिया मिळविला. कॅथरिनच्या कामाचा झपाटा तिच्या जर्मन रक्ताला शोभेल असा होता. तिने वैद्यकीय महाविद्यालय स्थापन केले. कॅथरिनच्या कर्तबगारीमुळे तिला ‘कॅथरिन द ग्रेट’ असे नाव पडले, पण नुकत्याच झालेल्या फ्रेंच राज्यक्रांतीचा तिने धसका घेतला होता. क्रांतीचे लोण रशियातही येणार या भीतीने ती ग्रस्त झाली होती. कॅथरिन नवीन योजनांच्या कामातील प्रगतीची पाहणी करण्यास जाई. त्या वेळी पोटोंमकिन या अधिकाऱ्याला सर्व काही व्यवस्थित आहे, असे खोटे दाखविण्याचे तंत्र बरोबर जमले होते. त्यावरून अशा प्रकाराला जगभर पोटोमकिन योजना असे नाव पडले. तिचा मृत्यू १७९६ साली झाला.
सुनीत पोतनीस  
sunitpotnis@rediffmail.com

कुतूहल :
घरातील लहान मुले व वृद्ध
घरातील लोकांसाठी आपणच सुरक्षितता निर्माण करायची असते. घरात राहणाऱ्या लोकांचे वयोमानानुसार तीन गट पडतात. लहान मुले, मध्यमवयीन व ज्येष्ठ नागरिक. पाच वर्षांपर्यंतच्या मुलांत सर्व गोष्टींविषयी एक प्रकारचे कुतूहल असते. त्या गोष्टी समजून घ्यायची त्यांच्यात उत्सुकता असते. उदा. गरम गोष्टीला आपण ती  ‘हा’ आहे असे म्हणतो. पण मुलांना स्वत: हात लावल्याशिवाय गरम म्हणजे काय ते कळत नाही. त्यासाठी त्याला त्याचा हात कोमट गोष्टीला लावून दाखवावा. मूल चालताना, रांगताना पडणार हे अपेक्षित असते, पण त्याला कमीत कमी मार बसावा यासाठी फरशीवर गालिचा अंथरावा. लहान मूल रांगताना खाली पडलेल्या गोष्टी तोंडात घालणार म्हणून जमीन स्वच्छ ठेवावी. काचेच्या वस्तू खाली ठेवू नयेत. औषधाच्या गोळ्या खाली राहिल्यास ताबडतोब उचलाव्यात. मूल उभे राहण्यासाठी स्टूल वगरे गोष्टींचा आधार घेते, तेव्हा त्या गोष्टी स्थिर ठेवाव्यात. लहान मुलांप्रमाणेच ज्येष्ठ नागरिकांसाठीही विशेष काळजी घ्यावी लागते. या वयात त्यांची स्मरणशक्ती कमी होते. त्यांना खास सूचना देण्यासाठी घरात फळा ठेवावा. त्यावर मोठय़ा अक्षरात सूचना लिहून ठेवाव्यात. या वयात पुरुषांच्यात ऐकण्याची क्षमता कमी होते. त्यांच्यासाठी मोठय़ा आवाजात बोलावे. त्यांना कानाला लावण्यासाठी श्रवणयंत्र उपलब्ध करून द्यावे. म्हणजे त्यांना सर्वाबरोबर संभाषणात भाग घेता येऊन एकाकी पडल्याची भावना होणार नाही. त्यांना मानसिक सुरक्षितता मिळेल. टेलिफोनची, दारावरची घंटा वाजताना दिवाही लागेल अशी सोय करून घ्यावी. व्यक्तीचे वय वाढते तसे रक्तवाहिन्यात थर जमा होऊन त्या आकुंचन पावतात, त्यामुळे कानातील कर्णावर्तावर अनिष्ट परिणाम होऊन चक्कर येऊ लागते. या वेळी कानावर पंख्याचा मार बसूनही चक्कर येते. यासाठी कानात कापसाचे बोळे घालणे हा सुरक्षिततेचा चांगला उपाय आहे. तसेच चालताना तोल जाऊ नये म्हणून रबराचे कव्हर असलेली चार टोकांची काठी वापरावी. संडास-बाथरूममध्ये उठण्यासाठी कडय़ा अथवा दांडय़ा लावाव्यात व हे विधी करताना त्यांनी शक्यतो दार लावू नये म्हणजे तातडी निर्माण झाल्यास लगेच मदत मिळते.
डॉ. शशिकांत प्रधान
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी, मुंबई २२  
office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा..
सत्य आण्विक की मानसिक?
..जगबुडीची अथवा पृथ्वी नाशाची वेळ येऊन ठेपली अशा वेळी माणसानं गेल्या हजारो वर्षांत केलेल्या शास्त्रीय संशोधनाचं संचित म्हणून कोणतं वैज्ञानिक सत्य आगामी प्राण्यासाठी मागे सोडाल? असा प्रश्न अनेक शास्त्रज्ञांना विचारल्यावर रिचर्ड फेनमननं म्हटलं..
‘जगातील प्रत्येक वस्तू (सजीव अथवा निर्जीव, सूक्ष्मातिसूक्ष्म अणूंनी तयार झालेल्या आहेत’ हा आण्विक सिद्धांत (किंवा सत्य) मी मानवानं शोधलेलं सर्वात महत्त्वाचं सत्य म्हणून मागे सोडेन. ‘अणू म्हणजे सूक्ष्म कण सतत अति प्रचंड वेगाने (परपेच्युअल मोशन) गरगरत असतात. हे कण एकमेकांपासून किंचित अंतरावर असतात तेव्हा त्यांच्यामध्ये आकर्षण असतं; परंतु ते (अंतर तोडून) जवळ आले तर (तितक्याच जोराने) ते एकमेकांना दूर ढकलतात.’ (रिपेल इच अदर)
या चारदोन वाक्यांत ‘सिक्स इजीपिसेस’ पुस्तकावर जगाबद्दल प्रचंड माहिती भरलेली आहे. त्यावर विचार केला पाहिजे आणि ते समजण्यासाठी कल्पनाशक्ती लढविली पाहिजे.
जिवंत अथवा मृत वस्तू अनेक कणांनी तयार झालेली असते आणि त्यातल्या लहानातल्या लहान कणांमध्ये त्या प्रत्यक्ष वस्तूचे सर्व गुणधर्म मौजूद असले पाहिजेत, असा तत्त्ववेत्ते व शास्त्रज्ञांनी कयास केला होता; परंतु तो लहानातला लहान कण आणखी सूक्ष्म कणांनी बनलेला असतो व ते सूक्ष्म कण वेगवान असतात, त्यांच्या आकर्षण व अनाकर्षणांमध्ये ऊर्जा साठवलेली असते, हा वैज्ञानिक शोध लावण्याला अजून १०० वर्षे उलटायची आहेत; परंतु मित्रा फेनमनच्या उक्तीमधल्या दुसऱ्या भागातलं सत्य त्याहूनही स्फोटक आहे. कल्पनाशक्तीला किंचित ताण दिला तर ‘त्या’ दोन आण्विक कणामधल्या परस्पर संबंधातलं सत्य सर्वत्र लागू पडतं. विशेषकरून दोन माणसांच्या एकमेकांच्या संबंधाच्या बाबतीत ते खरंय.
पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी, मैत्रीमधली दोन माणसं, पालक आणि मुलं, बहीण-भावंडं, वरिष्ठ-कनिष्ठ अशा अनेक जोडय़ांबद्दल तेच सत्य लागू आहे.
परस्परांशी संबंध असलेल्या व्यक्ती काही अंतरावर असल्या, दूर असल्या की त्यांच्याविषयी जबरदस्त ओढ वाटते. दूर असल्यावर ती व्यक्ती जवळ असावी असं वाटत राहते, त्या आकर्षणाने आपण परस्परांकडे खेचले जातो; परंतु त्या दोन व्यक्तींमधील अंतर नष्ट झालं. त्या व्यक्ती एकमेकांच्या फार जवळ आल्या तर त्या आकर्षणाऐवजी त्या व्यक्तीपासून दूर होण्याची भावना निर्माण होते. अगदी साध्या भाषेत सांगायचं तर प्रिय व्यक्ती दूर असताना, तिच्या गुणांविषयी आकर्षण वाटतं आणि जवळ आल्यावर त्याच व्यक्तीचे दुर्गुण दिसतात आणि आकर्षण नाहीसं होतं, त्या व्यक्तीपासून दूर (किंचित का होईना) व्हावंसं वाटतं. आकर्षणात ही शक्ती असते आणि अनाकर्षणातही जोर असतो. म्हणून प्रियकर-प्रेयसी, पती-पत्नी, पालक व बालक यांच्यामध्ये सतत भांडणं होतात आणि एकमेकांपासून दूर गेल्यावर त्यांच्याशिवाय चैन पडत नाही. प्रेम दाटून येतं. प्रेम वाटतं म्हणून अति जवळीक होते आणि भांडण झालं की, दुरावा निर्माण होतो. या (विदारक) सत्याचा उपसिद्धांतदेखील आहे. कोणतीही रिलेशनशिप आनंदमय, यशस्वी आणि फलदायी करायची असेल तर त्यामध्ये समतोल असणं ‘बॅलन्स’ असणं आवश्यक असतं. अति जवळीक नको आणि दुरावाही नको. अंतरात अचूक बॅलन्स हवा. ही शिकवण निर्जीव वस्तूच आपल्याला देतात, त्या वस्तू तो अंतर्गत बॅलन्स टिकवतात म्हणून त्यांचा स्फोट होत नाही, त्या स्टेबल राहतात.
फेनमनसाहेब, पिसारा फुलवलात हो, ग्रेट सत्य!
डॉ. राजेंद्र बर्वे  
drrajendrabarve@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Navneet history todays date asha bhosle fans elizabeth

ताज्या बातम्या