इतिहासात आज दिनांक.. ११ सप्टेंबर

१८९३ अमेरिकेतील शिकागो येथील सर्वधर्मपरिषदेत स्वामी विवेकानंद यांनी भाषण केले आणि सभाजिंकली. जगातल्या सर्वाधिक गाजलेल्या भाषणांपैकी ते एक भाषण आहे.

१८९३ अमेरिकेतील शिकागो येथील सर्वधर्मपरिषदेत स्वामी विवेकानंद यांनी भाषण केले आणि सभाजिंकली. जगातल्या सर्वाधिक गाजलेल्या भाषणांपैकी ते एक भाषण आहे.
१८९५ आचार्य विनोबा भावे यांचा कोकणातील गागोदे येथे जन्म. ‘गांधीजींचे आध्यात्मिक वारसदार’ आणि ‘गांधी विचारांची प्रयोगशाळा’ अशी दोन विशेषणे विनोबांना लावण्यात येतात. गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रहासाठी पहिले सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली होती. गांधीजींच्या सत्याग्रहाचा विकास विनोबांनी सवरेदयात केला आणि ग्रामस्वराज्य कल्पना ग्रामदानापर्यंत आणली. जनतेच्या हृदयाला आवाहन करीत लाखो एकर जमीन भूमिहीनांना मिळवून देण्याचा ऐतिहासिक प्रयोग जगात फक्त विनोबाच करू शकले. भगवद्गीतेचे सार असलेल्या त्यांच्या ‘गीताई’ या पुस्तकाने विक्रीचे उच्चांक प्रस्थापित केले. कुराण, बायबल यांच्यावरील सारग्रंथही त्यांच्यातील प्रकांडपंडिताचे दर्शन घडवितात. भारतीय व पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा इतका गाढा अभ्यास असणारी व्यक्ती विरळाच! संयुक्त महाराष्ट्र चळवळी संदर्भातील विनोबांची भूमिका व आणीबाणीच्या संदर्भातील त्यांच्या भूमिकेचा करण्यात आलेला विपर्यास यामुळे जनतेचा व अनुयायांचा रोष ओढवूनही, स्वत:ला जे पटले त्याचेच आचरण करण्यात विनोबांनी कसूर केली नाही.
२०११ अमेरिकेतील ट्विन टॉवर्सवर हल्ला झाला. दहशतवाद्यांनी महासत्तेवर हल्ला करून मानवतेला काळिमा फासला.
प्रा. गणेश राऊत  
ganeshraut@solaris.in

सफर काल-पर्वाची : अजातशत्रू    
मगध साम्राज्याचा संस्थापक सम्राट बिंबिसार याचा मृत्यू इ. स. पूर्व ५५४ मध्ये झाला. त्याचा मृत्यू नैसर्गिक न होता त्याचा पुत्र अजातशत्रू याने बापाला कैदेत टाकून व नंतर ठार मारून मगधाची गादी बळकावली. बिंबिसारची पत्नी म्हणजेच कोसलच्या राजा प्रसेनजीतची कन्या हिने पतीच्या मृत्यूमुळे शोकग्रस्त होऊन देहत्याग केला. या घटनेमुळे कोसलचा राजा अजातशत्रूचा कट्टर शत्रू झाला. त्याने बिंबिसारला आंदण म्हणून दिलेले काशी हे शहर स्वत:कडे परत घेतले. त्यावरून अजातशत्रू व प्रसेनजीतमध्ये वारंवार युद्धे होऊ लागली.
प्रसेनजीतचा पुत्र बिदुडाभ याने बंड करून बापाला राज्याबाहेर घालवून दिल्याने प्रसेनजीत अजातशत्रूकडे आसरा मागायला येत असता मरण पावला. त्याचा अंत्यविधी अजातशत्रूने पार पाडला व स्वत:ला कोसल देशचा उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. या काळात अनेक लहान गणराज्ये विज्जी या गणराज्याच्या नेतृत्वाखाली एकत्र झाली होती. अजातशत्रू आणि बिज्जींच्या समूहातील संघर्षांचे मूळ कारण आर्थिक असावे, असे दिसते. गंगेच्या खोऱ्यातील व्यापारी क्षेत्र मगध आणि इतर गणराज्यांत पसरले होते. व्यापाऱ्यांना दोन्ही राज्यांत कर द्यावा लागे. अजातशत्रूने व्यापाऱ्यांचे कारण पुढे करून सर्व गणराज्यांवर चढाई करून गंगेच्या पूर्वेकडील सर्व व्यापारी क्षेत्र मगधाच्या अधिकारात आणले.
अवंतीचा राजा प्रद्योत मगधावर आक्रमण करण्याच्या तयारीत आहे, असे समजताच अजातशत्रूने आपली राजधानी सुरक्षित अशा पाटलीग्राम येथे हलवली. पुढे जवळजवळ एक हजार वर्षे मगधाची राजधानी पाटलीग्राम येथे होती. नंतरच्या काळात पाटलीग्रामचे नाव पाटलीपुत्र असे झाले. इ. स. पूर्व ४६१ मध्ये अजातशत्रूचा मृत्यू झाला. त्यानंतर र्हयक घराण्यातील पाच राजांनी राज्य केले; परंतु अराजक वाढल्याने बनारसच्या शिशुनाग याला लोकांनी राजा केले.
सुनीत पोतनीस  
sunitpotnis@rediffmail.com

कुतूहल : पेट्रोलपंप व सेल फोन
आग लागण्यासाठी तीन गोष्टींची गरज असते. ज्वलनशील तापमानापर्यंत पोहोचलेला पदार्थ, हवा (ऑक्सिजन वायू) आणि ज्वाला किंवा ठिणगी. एखाद्या पेट्रोलपंपावर तेथल्या परिसरातील हवेत पेट्रोलच्या वाफा मिसळून ज्वलनशील मिश्रण तयार होऊ शकते. कारण पेट्रोलचा भडकिबदू (फ्लॅश पॉइंट) हा शून्य डिग्री तापमानाच्या खाली असतो. हा भडकिबदू म्हणजेच ज्या कमीत कमी तापमानाला त्या त्या पदार्थाचे हवेतील ज्वलनशील मिश्रण ज्वाला किंवा ठिणगीच्या संपर्कात येऊन पहिला भडका उडतो. alt त्यानंतर तापमान वाढत गेले की आग लागते. अशा वेळी मोबाइल फोनवर कॉल आला नि आपण बटण दाबून तो फोन सुरू केला तर विद्युत ठिणगी उडू शकते व पेट्रोलपंपाच्या परिसरातील ज्वलनशील मिश्रण अचानक जळून भडका उडू शकतो, स्फोट होऊ शकतो. पेट्रोल हायड्रोकार्बन रसायनांचे मिश्रण असते व त्याचा उत्कलन बिंदू ३० ते २१० अंश सेल्सियसच्या दरम्यान असतो. त्यातील कमी तापमानाला बाष्पनशील होणारी हायड्रोकार्बन रसायने या अशा प्रकारच्या भडक्याला कारणीभूत ठरतात. स्वयंपाकघरातील गॅसच्या टाकीत जळती काडी टाकली तर तो ज्वलनशील वायू पेटणार नाही, कारण तेथे ऑक्सिजन वायू उपलब्ध नसतो. तोच वायू टाकीबाहेर पडून हवेत मिसळला की स्फोटक रूप धारण करू शकतो. स्फोटक पेट्रोलने भरलेल्या टाक्या पेट्रोलियम कंपन्यांच्या डेपोत असताना व बाहेरचे तापमान ४०-४५ अंश सेल्सियस असताना टाक्यातील ज्वलनशील पेट्रोल पेट का घेत नाही? तर पेट्रोलच्या वाफा तेथल्या आजूबाजूच्या वातावरणात भल्या पसरल्या असतील नि त्यांच्यामुळे हवेत पेट्रोल-ऑक्सिजनचे ज्वलनशील मिश्रण तयार झालेले असेल, पण आग लावणारा ठिणगीचा स्रोत तेथे नसल्यामुळे ज्वलनाची क्रिया सुरू होत नाही. म्हणून पेट्रोलजन्य पदार्थाचा साठा असलेल्या ठिकाणी प्रवेश करताना आगपेटी, लायटर आत घेऊन जाण्यास सक्त मनाई असते. आग लागली की जळत असलेल्या पदार्थावर पाणी, कार्बन-डाय-ऑक्साइड किंवा अग्निरोधक रसायनांचे फवारे मारून आगीचे तापमान कमी केले जाते किंवा आगीला ऑक्सिजनपासून वंचित करून आग विझवतात.
जोसेफ तुस्कानो
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी,
मुंबई २२  
office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा.. हात तुझा हातात
रोजच्या जीवनातल्या काही गोष्टी इतक्या सहज आणि आपसूकपणे घडतात की त्यांचं महत्त्व आपण जाणत नाही. त्या गोष्टीचा प्रतीकात्मक अर्थही लक्षात येत नाही. म्हणजे असे बघ मित्रा, रस्ता ओलांडताना आपण सहजपणे संगतीच्या प्रिय व्यक्तीचा (मुलं, जोडीदार, पालक, मित्र इ.) हात हातात घेतो. लगबगीने डावी-उजवीकडे बघून रस्ता ओलांडतो. आतापर्यंत हजारो वेळा आपण हातात हात घालून निसरडय़ा रस्त्यावरून चाललोय, अंधारात वाट शोधलीय. अनोळख्या जागी दिवसाउजेडी चाचपडतोय. होय की नाही? तू म्हणशील त्यात काय विशेष, प्रत्येकजण असंच करतो ना! खरंय तुझं म्हणणं; परंतु मित्रा, जरा alt विचार कर. रस्ता ओलांडताना आपण हातात हात धरून चाललो म्हणून ना अंतर कमी होत ना वाहनांचा वेग. अंधारात परस्परांचा हात हातात घेतला म्हणून तिथे उजेड पडत नाही आणि रस्ता शोधायला मार्गदर्शन होत नाही. निसरडय़ा वाटेवर अथवा ट्रेकिंग करताना, एकमेकांचा हात धरण्यापेक्षा मजबूत काठीचा आधार घ्या, अशी सूचना दिली जाते. रस्ता ओलांडताना हातात हात घेणं या गोष्टीला प्रतीकात्मक प्रतिक्षिप्त क्रिया एवढाच अर्थ उरतो. अर्थात वृद्ध पालक, सैरावैरा पळणारी मुलं आणि क्षीण मंडळींना शारीरिक आधार देण्यासाठी आपण हातात हात धरतो. त्या व्यक्तींनाही अधिक सुरक्षित वाटतं.
मित्रा, सहज हातात हात घेणं आणि असुरक्षित वाटल्यानं हात घट्ट धरणं यात बऱ्याच मानसिक गमतीजमती आहेत. कच-देवयानीच्या गोष्टीत देवयानी ‘पाणिग्रहण’चा विवाह असा अर्थ घेऊन कचबरोबरची रिलेशनशिप घट्ट धरून ठेवली.
बरोबरची व्यक्ती आपल्याला सोडून जाईल अशी भीती वाटते, त्या नात्यात आपल्याला इनसिक्युअर वाटते, तेव्हा आपण हातात हात घट्ट धरतो. प्रत्यक्षात जेव्हा आपण बरोबरच्या व्यक्तीचा हात घट्ट धरतो, ती व्यक्ती आपल्याला आधार देते, पण दुसऱ्यानं हात घट्ट धरला तर आपल्याला वेदना होते, इतकी जवळीक नकोशी वाटते. आपला ‘आधार’ म्हणून उपयोग केला जातोय ही भावना नकोशी वाटते. ‘तू घाबरत राहा, मी आधार देत राहतो’ अशा पायावर कायम राहणारी रिलेशनशिप कंटाळवाणी होते. आधार घेऊन आपण स्वावलंबी व्हायचं असतं हे काही लोकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे आधार घेणारी व्यक्ती, आधार देणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहू लागते. त्यातून भावनिक शोषण निर्माण होतं. आधार देणाऱ्या व्यक्तीलादेखील आधार घेणाऱ्या व्यक्तीने आपल्यावर कायम अवलंबून राहावं असंही वाटू लागतं.
म्हणून ‘हातात हात’ घेण्याचा अर्थ समजला पाहिजे. त्या क्रियेतली प्रतीकात्मकता समजली की आपण निरोगी नि आनंदमयी रिलेशनशिप जोपासू शकतो.
जेन्टली हातात हात घेणं म्हणजे रिलेशनशिप सांभाळणं ही गोष्ट एक कला आहे, असं वाटतं. रस्ता ओलांडताना आपण हातात हात घेतल्यामुळे चालण्याचं अंतर कमी होत नाही, सिग्नल बदलत नाही की वाहनांचा वेग मंदावत नाही, तरी हातात हात घालून रस्ता ओलांडायला मजा येते. जीवनाच्या रस्त्यावरही अनेक अडथळे ओलांडावे लागतात. अंगावर संकटं धावून येतात, परिस्थितीत अनुकूल बदल व्हायचे तेव्हा होतात. अशा वेळी जोडीदार, मित्राचा, पालकांचा किंवा मुलांचा हात हातात असला तरी बरं वाटतं, धीर येतो आणि मजाही येते. अशा कठीण प्रसंगी फक्त एकमेकांना म्हणावे, हात तुझा हातात..
डॉ. राजेंद्र बर्वे 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Navneet kutuhal itihas vivekanand vinoba bhave manmoracha pisara safar kal parvachi

ताज्या बातम्या