अमरावती: चांदूर बाजार तालुक्यातील सोनोरी गावात वाघिणीच्या हल्ल्यात एका १८ वर्षीय आदिवासी तरूणीचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर पंचक्रोशीत प्रचंड भीतीचे वातावरण आहे.‘त्या’ वाघिणीचा हेलिकॉप्टरने शोध घ्या, नवनीत राणा यांनी लावला थेट वनमंत्र्यांना फोनअमरावती: चांदूर बाजार तालुक्यातील सोनोरी गावात वाघिणीच्या हल्ल्यात एका १८ वर्षीय आदिवासी तरूणीचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर पंचक्रोशीत प्रचंड भीतीचे वातावरण आहे.

या घटनेने गावकरी संतप्त झाले आहेत. ग्रामस्थांनी वन विभागाच्या ढिसाळ कारभाराविरोधात तीव्र रोष व्यक्त केला आहे. दरम्यान, माजी खासदार आणि भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांनी सोमवारी सोनोरी गावाला भेट देऊन पीडित कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांनी लगेच वनमंत्री आणि वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून थेट संपर्क साधून वाघिणीच्या शोधमोहिमेसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्याची मागणी केली.

ड्रोन कॅमेराच्या मर्यादा उघड

वाघिणीने तरूणीवर हल्ला केल्यानंतर जनावरांनाही लक्ष्य केले असून ती मानवी वस्तीच्या जवळच फिरत असल्याचे नवनीत राणा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. पावसाळी वातावरणामुळे ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे शोध घेणे शक्य होत नसल्याचे सांगत मुख्य वनसंरक्षकांना शोधमोहिमेसाठी तत्काळ हेलिकॉप्टर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नवनीत राणा यांनी वनमंत्र्यांकडे केली. ‘आणखी एकाही नागरिकाचा जीव धोक्यात आला, तर परिस्थितीत हाताबाहेर जाईल,’ असा इशाराही त्यांनी दिला.

खर्चाची चिंता न करता शोधमोहीम राबवा

नवनीत राणा यांच्या मागणीची दखल घेत वनमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने निर्देश दिले. तंत्रज्ञानाच्या निकषांवर शक्य असल्यास आणि खासगी किंवा हवाई दलाच्या माध्यमातून हेलिकॉप्टर उपलब्ध होत असल्यास १०-२० लाख रुपयांच्या खर्चाची पर्वा न करता तत्काळ शोधमोहीम तीव्र गतीने राबवावी, अशा सूचना वनमंत्र्यांनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान, वाघिणीच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या उर्मिला इवने हिच्या कुटुंबीयांना तत्काळ शासकीय आर्थिक मदत देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

चांदूर बाजार तालुक्यातून मार्गक्रमण

मोर्शी तालुक्यानंतर आता ही वाघिण चांदूर बाजार तालुक्यातून मार्गक्रमण करीत आहे. मोर्शी तालुक्यातील भांबोरा येथे एका शेतकऱ्याचा बळी घेतल्यानंतर, सुमारे ५० किलोमीटरचा प्रवास करून या वाघिणीने दोन दिवसांपूर्वी रिद्धपूर येथील मौजा नजरपूर शेत शिवारात एका शेतकऱ्याच्या गायीवर हल्ला केला होता. रविवारी संध्याकाळी ४ च्या सुमारास, उर्मिला इवाने ही तरुणी शेतात चारा कापण्यासाठी गेली असताना तिच्यावर वाघिणीने हल्ला केला होता. चारा कापत असताना उर्मिलाला वाघीण आपल्या दिशेने येताना दिसली; तिने झाडावर चढण्याचा प्रयत्न केला, परंतु वाघिणीने तिला ओढत झुडपांमध्ये नेले. नंतर गावकऱ्यांना तिचा मृतदेह आढळला होता.