१९४१ साली किंगडम ऑफ युगोस्लाव्हियाचा कब्जा नाझी जर्मनी आणि फॅसिस्ट इटलीने घेऊन युगोस्लाव्हियातल्या क्रोएशिया, बोस्नियाचा मिळून क्रोएशिया हा एक स्वतंत्र देश स्थापन केला. स्वतंत्र क्रोएशियाचे हे सरकार अर्थातच जर्मनांच्या हातातले बाहुले होते! या सरकारने क्रोएशियातल्या भिन्न वांशिक समाजांसाठी भिन्न वांशिक कायदे लागू केले. विशेषत: ज्यू, सर्ब आणि रोमा जमातीच्या लोकांचा संहार सुरू केला. जेसनोव्हॅक येथे या लोकांसाठी खास श्रमछावणी (कॉन्सन्ट्रेशन कॅम्प) उभारली गेली. त्याचप्रमाणे नाझी सरकारला विरोध करणाऱ्यांना पकडून इटलीव्याप्त क्रोएशियात बांधलेल्या छावण्यांमध्ये टाकण्यात आले. कम्युनिस्ट नेता मार्शल टिटो यांनी नाझींना नमविण्यासाठी गुप्तपणे सोशालिस्ट रिपब्लिक ऑफ युगोस्लाव्हिया स्थापन केला. विशेष म्हणजे २२ जून १९४१ रोजी जर्मनीने सोव्हिएत युनियनवर आक्रमण केले; त्याच दिवशी क्रोएशियातल्या नाझीविरोधी चळवळीने आपले सशस्त्र सैनिकांचे पथक ‘सिसाक पार्टिझन डिटॅचमेंट’ स्थापन केले. सुरुवातीला या पथकात ८० कट्टर नाझीविरोधी क्रोएट सैनिक होते. २२ जून हा दिवस दरवर्षी क्रोएशियात हुकूमशाहीविरोधी लढादिन म्हणून साजरा केला जातो. मार्शल टिटोंनी सुरू केलेली ही चळवळ चांगलीच फोफावून तिला दोस्तराष्ट्रांचाही पाठिंबा आणि मदत मिळू लागली. पुढे दोस्तराष्ट्रांच्या शस्त्र सामग्रीच्या आणि सोव्हिएत रशियाच्या लष्करी मदतीने जर्मन सैन्यावर १९४४ मध्ये टिटोंच्या सिसाक पार्टिझन फौजेने बेलग्रेड येथे मोठा विजय मिळवला. या युद्धात जर्मनीव्याप्त स्वतंत्र क्रोएशियामधील जर्मन सैनिक आणि जर्मनवंशीय लोक मोठ्या संख्येने मारले गेले. या युद्धात टिटोंच्या कम्युनिस्ट आघाडीतले सैनिक तसेच सामान्य क्रोएशियन, सर्बियन, ज्यू आणि रोमा नागरिकही तीन लाखांच्या जवळपास संख्येने मारले गेले.

दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर क्रोएशियामध्ये कम्युनिस्टांचे एकपक्षीय सरकार बनले. पुढे २९ नोव्हेंबर १९४५ रोजी क्रोएशियाच्या पुढाकाराने क्रोएशिया, बोस्निया, मॅसेडोनिया, माँटेनेग्रो, सर्बिया आणि स्लोव्हेनिया या राज्यांनी एकत्र येऊन सोशालिस्ट फेडरल रिपब्लिक ऑफ युगोस्लाव्हिया हे संघराज्य स्थापले. या संघराज्यातील घटकराज्यांना काही प्रमाणात स्वायत्तता होती, परंतु वर्चस्व टिटोंचे होते. – सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com