पृथ्वीचा ७० टक्के भाग ज्या महासागराने व्यापला आहे त्यावर हवामान बदलाचे परिणाम दिसू लागले आहेत. एक तर महासागर हा पृथ्वीचा कार्बन शोषक म्हणून कार्य करतो आणि आपल्याला मोठय़ा प्रमाणात ऑक्सिजन देतो. जागतिक तापमानवाढीतील अतिरिक्त ९० टक्के उष्णता महासागरच शोषून घेत आहेत. सागर नसता तर वातावरणाचे तापमान ५६ अंश सेल्सिअस होऊन एव्हाना मानव प्रजाती संपली असती. सागराच्या या संरक्षक भूमिकेमुळे त्याच्या उदरातील असंख्य जीव संकटात आहेत. प्रवाळ भित्तिका पांढुरकी पडत असल्याने त्यावर अवलंबून असणारी सागरी जैवविविधतादेखील संपुष्टात येईल. सागरी मत्स्यप्रजातींचे वेडेवाकडे स्थलांतर होत आहे. मुंबईच्या आसपास आढळणारा बोंबील आता गुजरातच्या दिशेने सरकल्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या मच्छीमारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सगळय़ाच मासळीच्या किमती अवाच्या सवा वाढल्या आहेत. पाण्याचे तापमान वाढल्यामुळे माशांची वाढ आणि विकास यावरही घातक परिणाम होत आहेत. काही वर्षांपूर्वी गिरगाव चौपाटीवर आलेली जेलीफिशची पिल्ले आणि पाकट-पिल्ले अशीच चुकून, मानवाच्या सणासुदीच्या वहिवाटीत आली होती.
समुद्री हिम वितळल्याने समुद्रजल पातळी वाढत आहे. ध्रुवीय अस्वल, सील, पेंग्विन, वॉलरस, व्हेल अशा प्राण्यांना जगणे मुश्कील झाले आहे. क्रीलचे कमी उत्पादन आणि शैवालाचा तुटवडा यामुळे मोठय़ा भक्षकांना अन्न मिळत नाही. वाढलेल्या जलपातळीमुळे किनाऱ्यावर वास्तव्य करणाऱ्या प्राण्यांच्या अन्नग्रहण आणि प्रजनन प्रकियेत अडथळा येतो.




समुद्राच्या प्रवाहातील बदल, कमी दाबाचे पट्टे निर्माण होणे आणि चक्रीवादळासारखी संकटे वारंवार आणि अधिक तीव्रतेने येणे यामुळे भारतात गेल्या पाच-सहा वर्षांत अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या. याचे सामाजिक, आर्थिक आणि मानसिक परिणाम झाले. प्रवाह बदलामुळे पृथ्वीवरील हवामान आणि पर्जन्यमान यात मोठा बदल होतो. मान्सूनची बिघडलेली शिस्त, अवकाळी पाऊस, ओला नाही तर कोरडा दुष्काळ या साऱ्याचा संपूर्ण देशावर, जनतेवर, अन्नधान्य उत्पादनावर परिणाम होतो.
हवामान बदलाचा सागरावर होणारा आणखी एक परिणाम म्हणजे समुद्रजलाचे आम्लीकरण. वातावरणातील ३० टक्के मानवनिर्मित कार्बन डायऑक्साइड सागरजलात मिसळून काबरेनिक आम्ल तयार होते. त्यामुळे सागरी जीवांचे शंख-शिंपले, कवच इत्यादी कॅल्शियम काबरेनेटने तयार झालेले भाग विरघळू लागतात. सागरी अन्नसाखळीत अडथळे येतात. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न गरजेचे आहेत.
– डॉ. नंदिनी वि. देशमुख
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org