नवदेशांचा उदयास्त : कालव्याचे स्वामित्व पनामाकडे…

पनामा कालव्याच्या रूपाने आपण स्वातंत्र्याची जबरदस्त किंमत मोजली आहे.

अमेरिकेच्या पाठबळावर पनामाने कोलंबियापासून स्वातंत्र्य मिळविले व त्या बदल्यात पनामा कालवा क्षेत्रावरचे नियंत्रण अमेरिकेला दिले. १९०३ साली हे घडले आणि पुढच्या दहा वर्षांत अमेरिकेने पनामा कालवा बांधून पूर्ण केला. तत्कालीन तंत्रज्ञानावर आधारलेला हा प्रकल्प ८२ कि.मी. लांबीचा आणि सरासरी ५५ मीटर रुंदीचा आहे. कालव्याच्या दोन्ही बाजूंना पूर्ण लांबीत सात कि.मी.चा पट्टा या कालवा क्षेत्रासाठी राखीव आहे. कालवा बांधून त्यातील मालवाहतूक सुरू झाल्यावर पनामावासीयांच्या ध्यानात आले की, पनामा कालव्याच्या रूपाने आपण स्वातंत्र्याची जबरदस्त किंमत मोजली आहे. कराचे उत्पन्न पूर्णपणे लाटून अमेरिकेने कालव्याची मालकीही आपल्याला दिली नाही, ही खंत पनामाच्या नेत्यांना वाटू लागली.

१९६४ साली अमेरिकाविरोधी निदर्शने, संप यांनी पनामात उग्र स्वरूप धारण केले आणि याचा फायदा घेऊन पनामाचा लष्करी अधिकारी ओमर टोरीजोस याचे हुकूमशाही सरकार पनामात सत्तेवर आले. या टोरीजोसने १९७० साली तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांच्याबरोबर करार केला. या करारान्वये अमेरिकी सरकार १९९९ साली पनामा कालवा आणि कालवाक्षेत्राचा ताबा पनामा सरकारकडे देईल असे ठरले. १९८१ साली टोरीजोसचा विमान अपघातात मृत्यू झाल्यावर लष्करी शासक मॅन्युएल नोरीगा हा हुकूमशहा सत्तास्थानी आला. या काळात पनामात सार्वत्रिक निवडणुका होऊन राष्ट्राध्यक्ष व इतर मंत्रिमंडळ नियुक्त होत असे; पण ते सर्व नामधारी होते. नोरीगा हा अमेरिकेची गुप्तचर संघटना सीआयएचा हस्तक होता. अमली पदार्थांचा चोरटा व्यापार करून धनवान झाला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश (थोरले) यांनी अमेरिकी सैन्य पाठवून राजधानी पनामा सिटी ताब्यात घेतली. नोरीगा पळून गेला. पुढे अमेरिकेने पनामात नागरी प्रशासन स्थापन केले.

करारात ठरल्याप्रमाणे, १९९९ साली अमेरिकी प्रशासनाने पनामा कालवा आणि कालवाक्षेत्र यांचे पनामा सरकारकडे हस्तांतरण केले. १ जानेवारी २००० पासून पनामा कालवा व संपूर्ण प्रशासन लोकनियुक्त सरकार स्वतंत्रपणे सांभाळते आहे. – सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Panama gained independence from colombia with the support of the united states akp

Next Story
कुतूहल : दूषित पाणी प्यायल्यामुळे प्राण्यांना होणारे रोग
ताज्या बातम्या