– सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com

लातविया या देशाच्या नावाची व्युत्पत्ती लॅतगालीयन या बाल्टिक जमातीच्या नावातून झाली आहे. बाल्टिक प्रदेशातल्या मूळच्या चार आदिवासी जमातींपैकी लॅतगालीयन या प्रबळ जमातीवरून प्रथम लातविजा हे या प्रदेशाचे नाव झाले. पुढे हेन्री या राजाने या नावाचे लॅटिनीकरण करून लातविया केले. प्राचीन काळापासून येथील आदिवासी जमातींचा व्यापार रोम आणि बायझंटाइन राज्यांशी चालत असे. विशेषत: या प्रदेशात तयार होत असलेले अंबर हे जीवाश्म रेझीन रोमन आणि इतर युरोपियन लोकांना विकून त्याबदल्यात मौल्यवान धातू आणि खडे हे लोक घेत. बाराव्या शतकाच्या अखेरीस पोपने लातविया आणि इतर बाल्टिक देशांतील मूर्तिपूजक प्राचीन धर्मीय लोकांमध्ये ख्रिस्ती धर्म प्रसारासाठी काही कॅथलिक मिशनऱ्यांना पाठविले. परंतु केवळ धर्माधिकाऱ्यांच्या उपदेशाने लातवियन लोक धर्मातराला तयार न झाल्यामुळे तिथे जर्मन धर्मयोद्धे अर्थात क्रुसेडर्स पाठवून सक्तीने धर्मातरे करण्यात आली. जर्मनांनी या प्रदेशात धर्मातराबरोबर अनेक जर्मन धनिक आणि सरदार लोकांना तिथे बसवून आपली हुकुमत स्थापन केली. तेरावे ते सोळावे शतक या काळात लातवियन प्रदेशावर प्रशियाच्या म्हणजे जर्मनीच्या राजाचा अंमल होता.

इ.स. १५५८ ते १५८३ या काळात युद्ध होऊन लातविया आणि एस्तोनियाच्या प्रदेशाचा ताबा पोलंड आणि लिथुआनियाच्या राजांकडे आला. सतराव्या शतकात पोलंड, स्वीडन आणि रशिया या तीन सत्तांमध्ये लातविया आणि एस्तोनियाचा ताबा घेण्यासाठी संघर्ष होत असे. पुढे सतराव्या शतकात पोलंड-स्वीडन युद्धात लातवियाच्या उत्तर प्रदेशाचा ताबा स्वीडनकडे आला. या काळात लातवियन लोकांमध्ये राष्ट्रीय भावना आणि लातवियन भाषेची अस्मिता मूळ धरायला लागली होती. याला अनुसरून स्थानिक धर्माधिकारी अर्नेस्ट ग्लक याने मूळच्या लॅटिन भाषेतील बायबलच्या जुन्या आणि नवीन करारांचे भाषांतर लातवियन भाषेत १६९० साली करून त्याच्या प्रती प्रचलित केल्या. या काळात लातवियन प्रदेशाचा मोठा भाग स्वीडनच्या ताब्यात होता तरी रशिया, पोलंड-लिथुआनिया राष्ट्रसंघ, स्वीडन यामध्ये त्या प्रदेशाचा ताबा घेण्यासाठी खदखद चालूच होती. या तीन सत्तांमध्ये १७०० साली सुरू झालेले युद्ध ग्रेट नॉर्दर्न वॉर हे पुढे दहा वर्षे चालले.