प्लास्टिक जगात का आलं, याचा विचार करण्यापूर्वी प्लास्टिकपूर्व परिस्थिती कशी होती ते पाहू. १९५० सालाच्या सुमारास प्रत्येकाच्या घरात पितळेच्या ताट-वाट्या-स्वयंपाकाची पातेली असत. आंघोळीचं पाणी तापवण्यासाठी तांब्याचा बंब अथवा अॅल्युमिनियमचं पातेलं असायचं. आंघोळीसाठी तांब्याचं घंगाळ असे अथवा पितळेची बादली असे. घरातली सर्व प्रकारची भांडी तांबे, पितळ अॅल्युमिनियमची असत.

नंतर मात्र जगभरची लोकसंख्या झपाट्याने वाढू लागल्याने नैसर्गिक पदार्थ, खनिजे कमी पडू लागली. गरज ही शोधाची जननी असते. त्यामुळे अशा नैसर्गिक पदार्थांना पूरक पदार्थ शोधण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ आधीपासून करत होते. १८३१ साली स्टायरीन प्लास्टिक शोधाची हालचाल सुरू झाली होती तर १८३५ साली व्हिनाईल क्लोराईड (व्हिसी) तयार झालं होतं. १८५६ साली अलेक्झांडर पार्कस तर १९०७ साली लिओ बेकेलँड यावर काम करत होते. त्यांनी कच्च्या तेलापासून (क्रूड ऑइल) कृत्रिम पदार्थ शोधून काढला. बहुउपयोगी, अनेक रंगांत उपलब्ध असलेला, अनेक आकार घेऊ शकणारा, पावसात न भिजणारा, न चुरगाळणारा, गुंडाळता येणारा आणि घडी घालता येणारा असा पदार्थ त्यांना तयार करता आला. मात्र तो जास्त उष्णतेला न टिकणारा आणि कागद-कापडासारखा लवकर नष्ट न होणारा होता आणि तसाच तो आजही आहे. हळूहळू त्यावरही उत्तर शोधण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करीत आहेत. तो पदार्थ म्हणजे ‘प्लास्टिक’.

कच्चं तेल जमिनीखाली तयार होतं. समुद्रातही जे तेल मिळतं तेही पाण्याखाली जिथे जमीन असते त्या जमिनीखाली असतं. जमिनीखाली गाडले गेलेले वृक्ष, माणसांचे मृतदेह इत्यादी अनेक गोष्टींवर हजारो वर्षे प्रक्रिया होऊन तसेच जमिनीच्या वरच्या थरांचा दाब पडून आणि पृथ्वीच्या पोटातल्या जास्तीच्या तापमानाचा परिणाम होऊन, कच्चं तेल तयार होतं. हे तेल ज्या ठिकाणी मिळतं तिथल्या जमिनीतली खनिजं त्यात मिसळलेली असतात. कच्चं तेल, तेलशुद्धीकरण कारखान्यात आणून त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यातून आपल्याला पेट्रोल, डिझेल, केरोसीन, डांबर, एलपीजी वायू मिळतो. पेट्रोल व केरोसीनच्या दरम्यान ‘नॅफ्था’ नावाचा पदार्थ मिळतो. या पदार्थावर भट्टीत प्रक्रिया केल्यावर, इथेन व प्रॉपेन वायू मिळतात. आणि त्यावर अनेक रासायनिक प्रक्रिया केल्यावर, पॉलिव्हिनाईलक्लोराईड ऊर्फ पीव्हीसी ऊर्फ प्लास्टिक मिळतं.

‘प्लास्टिक’ अंतर्गत पीव्हीसी, पॉलिअमाईड (नायलॉन), टेरिलीन, फॉरमायका, मेलॅमाईन, सनमायका, बेकेलाइट, यासारखे कितीतरी अन्य पदार्थ येतात. यांचा उपयोग इलेक्ट्रॉनिक्स आणि रोजच्या वापरातल्या अनेक वस्तूंच्या निर्मितीसाठी केला जातो.

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org