भाषासूत्र : कोडय़ात टाकणारे वाक्प्रचार

‘तुझ्यासारखे छप्पन्न पाहिलेत!’ हे वाक्यही आपल्याला कोडय़ात टाकते. एखाद्याला कमी लेखण्यासाठी हा वाक्प्रचार वापरतात.

प्रतिनिधिक छायाचित्र

– डॉ. नीलिमा गुंडी

भाषेमध्ये वाक्प्रचार तयार होण्याची प्रक्रिया एकसारखी नसते. त्या प्रक्रियेत अनेक घटक कार्यरत असतात. त्यामुळे काही वाक्प्रचार आपल्याला कोडय़ात टाकतात.

या संदर्भातील चपखल उदाहरण म्हणजे ‘ससेमिरा लागणे’ हा वाक्प्रचार होय. ससा आणि मिरे यांच्याशी त्याचा काही संबंध नाही. शब्दाची निर्मिती ही त्यातील अर्थपूर्ण गुंफणीतून होत असते, मात्र ससेमिरा हा शब्द त्याला अपवाद आहे. एका गोष्टीत हा शब्द एका अस्वलाने सांगितला आहे, त्यामुळे त्याला अर्थ असण्याची अपेक्षा करता येत नाही. या वाक्प्रचाराच्या घडणीमागील रहस्य मला ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्याकडून कळले. ससेमिरा या शब्दामागे एक गोष्ट आहे. ‘सिंहासनबत्तिशी’ या ग्रंथात ती गोष्ट आहे. ती अशी : एक राजपुत्र आणि अस्वल यांची मैत्री असते. मात्र राजपुत्र एकदा अस्वलाला फसवतो. तेव्हा अस्वल त्याला शाप देते, की ससेमिरा या शब्दाचे तुला वेड लागेल. जेव्हा या शब्दातील प्रत्येक अक्षराने सुरू होणारे चार श्लोक तुला कोणी ऐकवील, तेव्हा तुझी त्या शापातून सुटका होईल! याचा भावार्थ असा, की माणसाच्या अंतर्मनाला- सदसद्विवेकबुद्धीला आपल्या वागण्याची जाणीव असते. त्यामुळे वाईट वागल्यावर त्याची बोच मनाला अस्वस्थ करत राहते. हा वाक्प्रचार ‘एखाद्या गोष्टीचा सतत त्रास होणे’ या अर्थाने रूढ आहे. उदा. स्वातंत्र्यलढय़ात सहभागी झालेल्या देशप्रेमी मंडळींमागे पोलिसांचा ससेमिरा लागलेला असे.

‘तुझ्यासारखे छप्पन्न पाहिलेत!’ हे वाक्यही आपल्याला कोडय़ात टाकते. एखाद्याला कमी लेखण्यासाठी हा वाक्प्रचार वापरतात. छप्पन्न या संख्येमागील नेमका संदर्भ काय, असा प्रश्न येथे पडतो. छप्पन्न म्हणजे पुष्कळ असा आपण मोघम अर्थ घेतो. प्रत्यक्षात त्या शब्दाचे मूळ रूप लक्षात आले की अर्थ उलगडतो. छप्पन्न हे मूळ ‘षट्प्रज्ञ’ या शब्दाचे बदललेले रूप आहे. षट्प्रज्ञ म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष, व्यवहार आणि तत्त्वज्ञान या सहा गोष्टी जाणणारा! इतका आशयसंपन्न शब्द उपहासव्यंजक रूपात वाक्प्रचारात रूढ का झाला, हे कोडे उरतेच!

nmgundi@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Process of forming phrases in marathi language zws

Next Story
कुतूहल : रेशमी कोळीष्टक
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी